भक्तीयोगाचा राजदूत-भक्तीसिद्धांत सरस्वती ठाकूर या आपल्या गुरुंच्या आदेशाने वयाच्या सत्तराव्या वर्षी थेट विदेशात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लोकांमध्ये भगवद्भावना जागविण्याचे कार्य करणार्या श्रील प्रभुपाद यांच्याविषयी प्रस्तुत लेखात ऊहापोह करण्याचा माझा विचार आहे. साधारणपणे वयाची सत्तरी गाठलेला मनुष्य त्याला मिळत असलेल्या पेन्शनच्या पैशांवर आरामात आयुष्य व्यतित करतो. मात्र ए.सी. भक्तीवेदांत प्रभुपाद यांना आयुष्याच्या संध्याकाळी हे खडतर कार्य हाती घ्यावे, असे का वाटले, यासाठी त्यांना कोणी प्रेरणा दिली, गुरुंच्या आदेशाला शिरसावंद्य मानून प्रभुपादांनी केलेले कृष्णभक्तीच्या प्रसार-प्रसाराचे कार्य तरुणांना लाजविणारे असेच आहे. भारताचे अध्यात्मिक राजदूत म्हणून लौकिक पावलेल्या प्रभुपादांचा जन्म कलकत्ता येथे १ सप्टेबर १८९६ रोजी झाला. अभयचरण डे नाव असलेल्या प्रभुपादांचे वडिल गौर मोहन डे कापडाचे व्यापारी तर आई रजनीदेवी प्रेमळ आई आणि दक्ष गृहिणी होती. लहानपणीच प्रभुपादांना त्यांच्या वडिलांपासून कृष्णभक्तीची प्रेरणा मिळाली. पश्चिम बंगालमध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार असलेले श्रीचैतन्य महाप्रभूंची शिकवण श्रील सरस्वती ठाकूर नेहमी सांगत. ते म्हणत, श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि इतर कोणत्याही धार्मिक कृत्यांपेक्षा भगवान श्रीकृष्णांचा हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे या महामंत्राचा जप करणे कधीही चांगले. यातून प्रेरणा घेऊन प्रभुपादांनी अनंत अडचणींमुळे जराही न डगमगता थेट अमेरिकेत आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली. चंगळवाद आणि चैनीकडे वाहवत जाणार्या तरुणांना कृष्णभक्तीचे वेड लावणे ही तशी सोपी गोष्ट नाही. मात्र दुर्दम्य इच्छाशक्तीच या जोरावर प्
रभुपादांनी ही अशक्यप्राय बाब शक्य करून दाखविली. तरुणांनी त्यांच्या या कमालीच्या धैर्याची प्रेरणा घेण्याची खरी गरज आहे. दि.१३ ऑगस्ट १९६५ रोजी कलकत्त्याहून जलदूत या मालवाहू जहाजाद्वारे प्रवास करीत गुरुंचा आदेश प्रत्यक्षात आणला. जहाजावर त्यांना चक्कर येणे, ऊलट्या होणे आणि विशेषतः दोनदा
हृदयविकाराचा तीव्र झटका येणे अशा संकटांना सामोरे जाऊनही त्यांनी गुरुंना अभिप्रेत असलेले हे कार्य केले. प्रभुपादांनी दिलेली एकाकी झुंज आणि अमेरिकेत केलेले कृष्णभक्तीचे बीजारोपण हे भगवंतांचे अस्तित्व नाकारणार्या नास्तिक लोकांना फार मोठी चपराक आहे. श्रीमद्भगवतगीतेत सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांनीच एके ठिकाणी म्हटले आहे, की जो मला सर्वत्र पहातो, त्याला मी कधीही दुरावत नाही आणि तोही मला दुरावत नाही. माझ्या भक्ताचा कधीही पराजय होत नाही. म्हणूनच प्रभुपादांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी हे अवघड कार्य पार पाडले. प्रभुपादांना आणि त्यांच्या अलौकिक धैर्याला सादर दंडवत प्रणाम.
— बाळासाहेब शेटे
Leave a Reply