रेल्वे स्टेशनलगतच्या पाऊल वाटेवरुन जात होतो. एका वयस्कर माणसाने माझे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या हातात मोठी प्लास्टीकची थैली होती. तो रेल्वेच्या मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचून, त्या थैलीमध्ये जमा करीत होता.माझी ऊत्सुकता जागी झाली. त्या माणसाला थांबवून मी चौकशी केली. अनेक प्रवाशी आजकाल पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. रिकाम्या झालेल्या बाटल्या चक्क रेल्वे मार्गावर फेकून देतात. हा त्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, भंगारच्या दुकानाला नेऊन विकत असे. त्याने सांगितल्या प्रमाणे, तो दुकानदार त्या बाटल्या, प्रति किलो प्रमाणे विकत घेतो. साधारण ११० ते ११५ बाटल्याना शंभर रुपये पर्यंत त्यांत उत्पन्न होते. टाकाऊ वस्तूंचे Recycle करुन पुन्हा त्याचा उपयोग केला जातो.
आपल्याकडे अशी अनेक धातू जसे तांबे, जस्त, लोखंड इत्यादी वस्तू टाकाऊ झाल्यास त्यानाही त्यांच्यापरी मोल असते. ते सामान्यजनाना मिळते. विकसीत झालेल्या परदेशांत ही संकल्पना नाही. भंगार खरेदी विक्री यांचे दुकान नसते. कोणतीही वस्तू नादुरुस्त झाली की ती पुन्हा वापरणे ही क्रिया तिकडे दिसून येत नाही. Use and Throw अर्थात वापरा आणि फेकून द्या. तेथील स्थानिक शासन अशा वस्तू एकत्र करुन त्याचे Recycle करीत. भंगारवाले वा मध्यस्ती नसल्यामुळे सामान्य माणसाना साऱ्या नादुरुस्त वस्तू चक्क टाकून द्याव्या लागतात. ह्या बाबतीत आपणाकडे बरे असते. असे म्हणावे लागेल. आपला विकसनशील देश आहे. गरीबी, बेरोजगारी, यांनी अनेक कुटुंबे हैराण झालेली आहेत. त्यामुळे हा भंगार व्यवसाय देखील गुंतवणूक व कामधंदा यांना पुरकच आहेत.
कांही दिवसांत मी ती घटना विसरुन गेलो. सकाळची वेळ होती. मी फिरावयास गेलो होतो. अचानक एक अनामिक इसम माझ्या समोर उभा राहून, खाण्यासाठी दोन तीन रुपये मागू लागला. त्याच्या कपड्यावरुन, अवतारावरुन तो कदाचित् भिकारी असावा. असे वाटले. तशी त्याची शरीर प्रकृती बऱयापैकी होती. परंतु परिस्थितीने गांजला असावा. बाहेर गांवचा दिसत होता.
मला एकदम कांही दिवसापुर्वी रेल्वेमार्गावर प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करणाराची आठवण आली. ” मी तुला दहा रुपये देतो. पण त्यासाठी तुला एक काम करावे लागेल.” तो एकदम तयार झाला. काम धंद्याच्या शोधांत होता. काम मिळत नव्हते. हतबल झालेला वाटला. परक्या ठिकाणी असल्याची जाणीव होती. ” चल मज बरोबर. मी तुला एक काम देतो.” तो मज बरोबर येऊ लागला. जवळच असलेल्या रेल्वेस्टेशनच्या परिसरांत आम्ही आलो. मज जवळ सामान आणण्यासाठी कांही पिशव्या होत्या. त्यातील एक मोठी पिशवी मी त्याला दिली.
मला रेल्वेमार्गांत कांही रिकाम्या प्लास्टीकच्या बाटल्या दिसल्या. त्याला त्या जमा करण्यास सांगीतले. ह्याच प्रमाणे सभोवतालच्या परिसरातील पडलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करुन आणण्यास सांगितले. मी तेथे एका दगडावर बसून त्याच्या हालचालीकडे बघत होतो. त्याला हे अपरिचित असावे असे वाटले. पण आपणास दहा रुपये मीळणार ह्या आशेने तो त्या बाटल्या जमा करु लागला. अर्धापाऊण तासाने तो परत आला. त्याने जमा केलेल्या बाटल्या घेऊन आम्ही जवळच असलेल्या भंगारच्या दुकानांत गेलो. एकूण ५६ बाटल्या जमा केल्या गेल्या होत्या. दुकानदाराने त्याचे ५० रुपये दिले. मी ते पैसे त्या वेळी त्याच्या हातीं ठेवले. दहा रुपयांची अपेक्षा मनी बाळगुन असलेल्या त्या माणसाला, हाती पन्नास रुपये मिळतांच त्याचे डोळे भरुन आलेले जाणवले.
खरा आनंद त्याला झाला होता, ते एवढे पैसे मिळाले म्हणून नव्हे. तर असे पैसे कसे कमवावे ह्याचे अत्यंत साधे मार्गदर्शन मिळाले ह्याबद्दल. परिस्थितीने तो गांजला होता. सामाजीक घडी त्याला उदरनिर्वाह करण्यास अक्षम झाली होती.
खाण्यासाठी त्याला इतरासमोर हात पसरण्याची वेळ आली होती. अचानक भाकरीसाठी अर्थात जगण्यासाठीचा एक मार्ग त्याला मिळाला. त्याच्या आशा पुलकित झाल्या होत्या. मला अभिवादन करीत तो निघून गेला.
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply