24 ऑगस्ट 1971 रोजी भारतीय कसोटी संघाने ब्रिटिश भूमीवरील आपला पहिलावहिला विजय साकार केला. 1971च्या हंगामातील हा मालिकेतील तिसरा सामना केनिंग्टन ओवलवर 19 ऑगस्टला सुरू झालेला होता. यजमानांनी पहिल्या डावात 355 धावा केल्या होत्या. मग भारत 284 आणि पुन्हा पाहुणे 101. चंद्रा ऊर्फ भागवत चंद्रशेखर 18.1-3-38-6 !! 173 धावांचे आव्हान अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील संघाने चार गडी राखून गाठले. हा भारताचा इंग्लंडमधील पहिला मालिकाविजयही ठरला.
24 ऑगस्ट 1973 रोजी लॉर्ड्स मैदानावर नाबाद 150 धावा काढून एक फलंदाज निवृत्त झाला. धावफलकात त्याची नोंद नाबाद अशी आढळते. विज्डेनच्या वार्षिकांकात तो ‘पोटदुखी’मुळे निवृत्त झाला अशी माहिती मिळते. खरी बात मात्र औरच आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर तो 31 धावांवर नाबाद होता आणि अख्खी रात्र त्याने पोर्ट आणि ब्रॅन्डी पिण्यात घालवली होती. त्याच्या चित्तवृत्ती दुसर्या दिवशी फलंदाजीस उतरताना मद्यमय झालेल्या होत्या आणि आपण मैदानावरच उलट्या करू अशी शक्यता त्याला ‘त्या’ अवस्थेतही अस्वस्थ करीत होती. 8 बाद 652वर त्याच्या कर्णधाराने (रोहन कन्हाईने – हा आपल्या सुनील गावसकरांचा अत्यंत आवडता खेळाडू. त्यांच्या मुलाचे नाव रोहन त्याच्यामुळेच.) डाव घोषित केला. हे सर गारफील्ड सोबर्स यांचे सव्विसावे कसोटी शतक होते. बार्बडोस शासनाच्या एका संकेतस्थळावर या अवलिया खेळाडूचा सुंदर परिचय उपलब्ध आहे –
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply