पत्रकार, संपादक, साहित्यिक, कवी, इतिहासकार, संशोधक, विनोदकार, वादग्रस्त लेखक अन् अतिशय सर्जनशील, संवेदनशील माणूस… खुशवंतसिंग यांची ही विविध रूपे. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१५ रोजी पाकिस्तानात असलेल्या हदली येथे झाला.तब्बल सात दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लेखक तसे विरळेच. खुशवंतसिंग त्यांपैकी एक. वृत्तपत्रांतील स्तंभ असो वा कादंबरी; किस्से असोत की चुटके… प्रत्येक माध्यमांतून ते मैफल रंगवत होते आणि रसिक त्यांचा आस्वाद घेत होते.
खुशवंत सिग यांचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी आपल्या जन्मगावी घेतले. त्यानंतर लाहोर, दिल्ली आणि लंडनमधून शिक्षण पूर्ण केले. ‘बार अॅट लॉ’ झाल्यावर १९३९ ते ४७ या दरम्यान लाहोर हायकोर्टात त्यांनी वकिली केली. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी परराष्ट्र खात्यात नोकरी स्वीकारली. सरकारने त्यांची वार्तांकन सहाय्यक या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर लंडनच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून आणि युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांनी काम पाहिले. नभोवाणी मंत्रालयाच्या योजना नियतकालिकाचे संपादकत्व त्यांनी काही वर्षे सांभाळले. सरकारी नोकरीनंतर त्यांनी अध्यापनाकडे मोर्चा वळविली आणि अमेरिकेतल्या प्रिस्टन विद्यापीठात प्राध्यापकी केली. त्यांच्या कर्तृत्वाला खरा बहर आला, तो त्यांनी ‘बेनेट कोलमन अँड कंपनी’च्या ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या साप्ताहिकाचे प्रमुख संपादकपद स्वीकारल्यावर. त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा हे मासिक म्हणजे फक्त उच्चभ्रू वर्तुळासाठीच असणारे असा समज होता; पण हा समज त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने बदलून टाकला. सामान्यांपर्यंत पोहोचले तरच ते यशस्वी होईल, असे त्यांचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी मासिकात अनेक बदल केले. हे बदल यशस्वी ठरले आणि मासिकाचा खप ६५ हजारांवरून चार लाखांवर पोहोचला. ‘विथ मॅलिस टू वर्ड्स वन अँड ऑल’ हा त्यांचा साप्ताहिक स्तंभलेख अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्घ होत असे व तो वाचकप्रियही झाला होता. वाचणाऱ्याला मजा येईल, असे त्यांचे लेखन असे. त्या काळात असणारी संपादकाची प्रतिमा त्यांनी संपूर्ण बदलली. सहजतेने कोणालाही भेटणारे, पदाची आढ्यता न बाळगता काम करणारे आणि सहज संवाद साधणारे अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्यासोबत काम करणारेही सहज संवाद साधू शकायचे, हेही त्यांचे मोठे वैशिष्ट्य होते. संपादकीय पान म्हणजे फक्त बुद्धिजीवी लोकांचे ही प्रतिमाही त्यांनी मोडून काढली. सामान्य माणसाला काय वाटते, त्याच्या काय अपेक्षा आहेत यापासून पत्रकारिता दूर जाऊ नये यासाठी ते झटत असत. अर्थात त्यांच्या कारकिर्दीतील अनेक विधाने वादग्रस्तही ठरली. इंदिरा गांधींशी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी घरोबा असतानाही त्यांनी कधी कुठलीही एकच राजकीय बाजू घेतली नाही. आपल्या विधानांवरून उठलेली वादळेही ते खुशीने स्वीकारत असत. खुशवंतसिंग यांनी त्यांच्या लेखणीचा पट्टा चौफेर फिरवला. राजकारण, समाजकारण, प्रेम, इतिहास, भाषांतर, लघुकथा, शीखांचा इतिहास अशा सर्व प्रांतात त्यांनी मुशाफिरी केली आहे. स्त्रियांविषयीचे अत्यंत उघड श्रृंगारिक वर्णन, तिरकसपणा आणि नर्मविनोदीपणा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय. त्यांना देशाविषयी प्रचंड अभिमानही होता. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी ‘ट्रेन टू पाकिस्तान’ ही कादंबरी खूप गाजली. फाळणीच्या दरम्यान घडलेल्या घटनांची आणि फाळणीच्या परिणामांची कहाणी त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये मांडली आहे. हातोहात खपलेल्या या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. या पुस्तकाला गोव्ह प्रेस अॅवॉर्डही मिळाले. तिचे कथानक वापरून पुढे ‘ट्रेन टू पाकिस्तान’ हा चित्रपटही निघाला, ‘द हिस्ट्री ऑफ शीख्स’ या पुस्तकाचे तीन खंड त्यांनी लिहिले. ही पुस्तके विश्वसनीय कागदपत्रे आणि पुराव्यांवर आधारलेली आहेत. या पुस्तकांत शिखांचा सचित्र इतिहास देण्यात आला आहे. मात्र, त्यांनी लिहिलेले रणजितसिंग यांचे चरित्र व्यक्तिपूजक आणि अवास्तव महती गाणारे असल्याची टीका झाली होती. त्यांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. हातातले पेन वृद्धत्वामुळे गळून पडत होते; पण मनातील उत्साह कायम होता. ‘द सनसेट क्लब’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या वयाच्या ८०व्या वर्षी प्रसिद्ध झाले; पण ८० व्या वर्षीही त्यांनी जगण्याविषयी, राजकारणाविषयी आणि समाजाविषयी इतके भरभरून लिहिले आहे की थक्क व्हायला होते. त्यामुळेच ९८व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी निवृत्तीनंतर कसे जगावे हे सहजतेने लिहिले आहे. या ९८व्या वाढदिवशी ते म्हणाले होते, ‘पुढे नेण्यासाठी माझ्यापाशी खूप थोडे उरले आहे; पण आठवून पाहावे आणि त्यात रमावे असे खूप काही मी जमवले आहे. आयुष्याच्या जमा खात्यावर ८० पुस्तके, कादंबऱ्या, लघुकथा, आत्मचरित्र, इतिहास, पंजाबी आणि उर्दूत केलेली भाषांतरे आणि अनेक निबंध आहेत. वयाच्या ९८व्या वर्षीही ते लिहित होते. प्रतिभेचे लेणे घेऊन आलेले मा.खुशवंतसिंग सर्व माध्यमांतून त्याचा आविष्कार घडवत गेले. म्हणूनच लोकप्रियतेची उंची त्यांना गाठता आली. मा.खुशवंतसिंग यांचे २० मार्च २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
खुशवंतसिंग यांची ‘द कंपनी ऑफ विमेन’ ही एक वादग्रस्त कादंबरी.
एका उद्योगपतीचं बिनधास्त आत्मवृत्त..खुशवंतसिंगांच्या बेधडक शैलीतून…
चैतन्य प्रेम विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्त शरीरसंबंध ठेवून त्यांच्या सहवासात अहोरात्र बुडलेल्या एका कामपिसाट उद्योगपतीचं हे बिनधास्त आत्मवृक्ष आहे. खुशवंत सिंग यांनी हे सारे उष्ण अनुभव आपल्या लेखणीच्या साहाय्यानं यात जिवंत केले आहेत.
Leave a Reply