एका थोर विचारवंताचे पुस्तक वाचत होतो. दया ह्या गुणधर्मावर त्यांचे भाष्य मनाचा ठाव घेणारे होते. सर्व प्राणीमात्र जीवजंतू झाडे झुडपे वृक्षलता इत्यादी. ज्यांच्यामध्ये जीवंतपणाचे लक्षण असते त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये दयाभाव खोलवर रुजला असतो. ह्य़ाच भावनेमधून प्रेम जिव्हाळा सख्य ह्यांचे अंकूरण होत असते. समाधान तेथेच मिळते.
अचानक एक प्रसंग डोळ्यासमोर आला. गावाकडे जात असतांना, आमची गाडी नादुरुस्त झाली. रस्त्याच्या एका झाडाखाली जवळ जवळ पांच तास थांबावे लागले. मेकँनिकलला जाऊन आणणे व गाडी पूर्वपदावर आणण्यास वेळ गेला.
एका झाडाखाली सतरंजी टाकून शांत बसलो होतो. माझे लक्ष जवळच असलेल्या एका मुंग्याच्या वारुळाकडे गेले. अनेक छिद्रे असलेले वारुळ होते. त्यातून बरय़ाच मुंग्यांची जा ये चालू होती. जवळ जवळ तीन फूटांच्या परिघामध्ये त्यांची वरदळ सारखी चालू असलेली जाणवली. मुंग्या सर्व दिशांनी फिरताना दिसत होत्या. कांही ग्रुप एका मागोमाग एक चालत होते. तर कांही निरनिराळ्या दिशांनी फिरत होते. मार्गांत आपआपसांत भेटणारय़ा मुंग्या क्षणभर थांबून, भेटून आपल्या मार्गावर पून्हा पूढे जाताना दिसत होत्या. कोणता संवाद त्या करीत असतील ते समजण्यास मार्ग नव्हता. परंतु ह्याची जाणीव होत होती की त्यांचे प्रमुख ध्येय व कार्य भक्ष शोधणे, व ते सर्वानी मिळून खाणे. कांही का असेना, परंतु त्यांची ही सर्व धावपळ दोन तासाहून जास्त काळ मी बघत होतो. त्यांचे दुर्दैव असे की त्याना भक्ष मात्र हाती लागल्याचे दिसले नाही.
माझी नजर एका लांबलचक आळीवर पडली. ती देखील त्याच वाटेने चालली होती. कदाचित् ती तीचे आपले भक्ष शोधीत असावे. एका जागेवर गवताच्या अडोशाला तीची हालचाल एकदम थांबलेली जाणवली. तेथे चार पांच मुंग्या होत्या. त्या मुंग्यानी तीला घेरले. तीच्या अवयवाच्या निरनिराळ्या भागास मुंग्यांनी गच्च धरलेले जाणवले. सर्व मुंग्या त्या अळीवर तुटून पडल्या. आळी बेचैन झाली. स्वतःला वाचविण्यासाठी तीच्या अवयवाच्या पायांच्या हालचाली वाढल्या. दोन्ही आघाडीवर द्वंद्व सुरु झाल्याचे दिसून येत होते. मुंग्यानी तीला भक्ष केले होते. आळी मात्र त्यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसत होते.
माहीत नाही, मुंग्यांची कोणती भाषा, कोणत्या हांका, कोणता गंध, तेथे पसरला जाऊन, अनेक मुंग्या वारुळातून त्यांच्या सहकारय़ाना मदत करण्यास येत असल्याचे दिसले. त्या आळीभक्षाच्या भोवती खूप संख्येने जमू लागल्या. सर्व एकत्रीत होऊन त्या तडफडणारय़ा आळीला खेचून वारुळाकडे नेण्याचा प्रयत्ल करीत होत्या. त्याचवेळी आपला जीव वाचविण्यासाठी त्या आळीकडून जबरदस्त हलचाली होत असल्याचे जाणवले. ती उलट सुलट होऊन मुंग्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. ह्या दोन्ही भक्ष व भक्षक यांच्या द्वंद्वात मुंग्याचे पारडे जड झाल्याचे जाणवले. ती आळी एक व ह्या मुंग्या प्रचंड संख्येने. हे मी सारे गंभीरतेने बघत होतो. माझ्या मनातील भूतदया जागी झाली. जो मृत्युच्या खाईत पडला त्याला वाचविणे, हा विचार मनात आला. ती आळी दयेस पात्र असल्याची जाणीव झाली.
त्या मुंग्या व ती आळी दोघांच्या संघर्षात एकाची भक्षासाठी धडपड तर दुसरा भक्ष होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्नशील. हे चित्र दिसू लागले. मी चटकन उठलो. एक काडी घेऊन त्या आळीला सहज उचलले. त्या काडीचा स्पर्ष होताच, एखादे अनामीक संकट समजून सारय़ा मुंग्यांनी त्या आळीला सोडले व त्या मिळेल त्या दिशेने स्वतःचा जीव वाचवित सैरावैरा विखूरल्या गेल्या. मी त्या आळीला हलकेच थोड्याश्या अंतरावर, जवळपास कोणतीही मुंगी नाही, हे बघून सोडून दिले. त्या आळीचा जीव वाचविला असे समाधान व समज करीत पून्हा शांत बसलो.
कोणती भूमिका मी वठवली होती ह्या प्रसंगामध्ये ?.
एक नैसर्गिक ईश्वर रचित व निर्मीत जीवन चक्र चालू होते. माझ्या बुद्धीने, विचाराने व ऐकीव ज्ञानाने मी माझ्या विचारसरनीला मार्गदर्शन देत होतो. वारुळामधील अनेक मुंग्या त्यांच्या त्यांच्या जीवन चक्राला अनुसरुन एकत्र घर करुन रहात होत्या. भक्ष शोधण्यास बाहेर पडल्या होत्या. जगण्याचे प्रमुख साधन व गरज म्हणजे त्यांचे भक्ष. त्या सर्व दिशाने फिरुन ते मिळविण्याचा प्रयत्न करीत होत्या. जवळ जवळ दोन ते तीन तास त्यांच्या हाती कांही लागले नव्हते. हे मी बघीतले होते. हा काळ त्यांच्या आपल्या जीवनचक्रांत फार मोठा असू शकतो. त्यांच्या हाती कांहीच सापडले नव्हते. एक जीव सदा दुसरय़ा जीवावरच जगत असतो. हे तर निसर्गाचेच तत्व असते.
कुणी कस जगायच ? वा कसे मरायचे ? ह्या साठीची परिस्थिती निर्माण करण्याचे भाग्य वा दुर्भाग्य हे ज्याच्या त्याच्याच हाती ठेवलेले असते. त्यामुळे इतरानी त्याची खंत करण्याची वा त्यामध्ये दखल देण्याची मुळीच गरज नसते. ही ईश्वरी अपेक्षा असावी. परंतु बुद्धीप्राप्त, विचारविश्लेशन क्षमताप्राप्त मणूष्य प्रत्येक वेळी आपलेच सुत्र निर्माण करुन नैसर्गिक घडणारय़ा वा होऊ जात असलेल्या क्रियांमध्ये सहभागाचा विनाकारण ठेका दर्शवितो. माझी भूतदया, माझे प्राणी प्रेम हा त्यातलाच प्रकार तर नव्हे काय ? .
काय योग्य? व कोणते अयोग्य ? ह्याचाच विचर करीत मी बराच वेळ तेथेच बसलो. गाडी दुरुस्त होण्याची वाट बघत.
–डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply