नुकत्याच एका बातमीने संपूर्ण मुंबईकरांना हादरुन सोडले. डासांची संख्या प्रचंड झालेली आहे. सर्वत्र मलेरीयाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मृतांची संख्याही खूप वाढलेली आहे. सर्व अधुनिक वैद्यकिय शास्त्र आपल्या शक्तिनीशी त्याचा प्रतिकार करताना दिसला. कांही दिवस यश, वा कांही दिवस अपयश अर्थात रोगाचा फैलाव जास्त झाल्याचे कळून येते. जागतीक आरोग्य संघटना
( World Health Organization ) हीने देखील मलेरीयाच्या प्रसारा बद्दल चिंता व्यक्त केली. आपल्यापरी मदतही देवू केली.
जगावर राज्य कुणाचे ? जो तो आपणच श्रेष्ठ असून आपलीच जगावर सत्ता चालते. ह्या एका विचारांत, अर्थात भ्रमात असतो. परंतु कित्तेक प्रसंग वा घटना अशा घडतात की त्यावेळी सर्व समुदाय हतबल झालेला जाणवतो. तेव्हांच प्रश्न पडतो की येथे राज्य कुणाचे ?
आफ्रिकन सफारीमध्ये गेलो होतो. सर्व कडेकोट तयारीनिशी होतो. बंद गाड्या, हत्यारबंद रक्षक सारे सारे मदतीला. प्रचंड व भयान वाटणारय़ा जंगलात शिरलो. आमच्या भिरभिरणारय़ा नजरा सर्व दिशेने बघत होत्या. त्या जंगलाचा राजा बघताना जेवढी उत्सुकता होती, तेवढीच प्रत्येकाच्या मनांत भिती देखील होती. झाडीत दूर अंतरावर त्या सिंहाची हलचाल दिसली. गाड्या थांबल्या. त्या प्रचंड शक्तिधारी सिंहाला बघून तो त्या जंगलाचा राजा आहे, ह्याची जाणीव झाली. त्याला आमने- सामने प्रतिकार करण्याची हिम्मत कोणत्याही मानवात असेल असे वाटत नाही.
आफ्रिकेत अनेक प्राण्यांचे बरय़ाच संख्येने कळप बघण्याचा योग आला. सिंहाचे, वाघाचे, हत्तीचे, गेंड्यांचे, हरिणांचे, झेब्र्यांचे, जिराफाचे, हिप्पोपोट्यामसचे, मगरीचे, सर्प अजगराचे, इत्यादी. हे कोणत्या प्राणी संग्रहालयांमध्ये नव्हे तर जंगल तलाव ह्या निसर्गरम्य परिसरांत. अगदी स्वैर, स्वतंत्र आणि निर्बंधरहीत, त्यांच्या त्यांच्या समुदायात वावरताना. आपापल्या कळपांत. प्रत्येक कळप स्वतःचे राज्य बाळगुन होता. खा, प्या, मजा करा. निसर्गाने जे देवू केले त्याचा आनंद लूटीत जगा. जीवनचक्रामध्ये संधर्ष झाला, धडपड करण्याची वेळ आली, तर तेही करा. बळी जा. नष्ट व्हा. परंतु तुम्हीच निर्माण केलेल्या सभोवतालच्या जगाकडे बघत डोळे मिटा. मी एक राजा म्हणून जगलो, ह्या भावनेत ह्या जगाचा निरोप घ्या.
समुद्रातील सहल करताना प्रचंड मोठ्या अशा व्हेल वा शार्क माशाच्या केवळ उसळी मारण्याच्या दर्शनाने सर्वजण हादरुन गेलो होतो. आम्हाला पूर्ण कल्पना आली की त्या जलमय वातावरणांत साम्राज्य जलचर प्राण्यांचेच असते. त्यांच्या समुहाचा एक राजा नसतो. तर प्रत्येकजण राजाच असतो. संघराजा म्हणा हवेतर. प्रत्येक प्राणी राजाच्या भूमिकेत वावरत असतो. जो शक्तिमान असेल तोच तथाकथीत राजा समजला जातो.
साम्राज्य कुणाचे ? ज्याची सत्ता सर्वत्र चालते, ज्याला सर्वजण भिऊन असतो त्याची. मानवासहीत सर्व प्राण्यांचा आढावा काढला तर त्यांची त्यांची सत्ता सिमीत असल्याचे, जाणवते. तो त्या प्रदेशाचा वा भागाचा वा वातावरणाचा राजा झालेला आहे हे कळते. परंतु आपला विभाग पार करुन, आपल्या शक्तिचे प्रदर्शन वा सत्ता जगभर कुणालाच स्थापित करता आलेली नाही.
फक्त एकच जीव ह्या जगांत असा आहे की तो आपली आबाधीत सत्ता हजारो वर्षापासून संपूर्ण जगावर गाजवित आलेला दिसतो. आणि तो म्हणजे मच्छर वा डास ( Mosquito ) ज्याला आपण क्षुल्लक प्राणी समजतो. अनेक जीवजंतू, किटाणू, आहेत. परंतु त्यांचा फैलाव मर्यादेत असतो. सर्वत्र नसतो. कांही प्रयत्न्याने नामशेष केले गेले आहेत. मच्छर वा डास ( Mosquito ) २ मात्र जगभर पसरलेला आपली सत्ता आणि धास्ती बाळगुन आहे. कदाचित् हस्यास्पद असेल. परंतु एक सत्य आहे. त्याच्या पासून पूर्ण बचाव करण्यांत माणसाला अजून यश मिळालेले नाही.
एक गमतीशीर वैज्ञानीक इतिहास आठवतो. ज्या जीवरोग शास्त्रज्ञाने प्रथम मच्छर वा डास
( Mosquito ) यांच्यामुळे उत्पन्न होणारय़ा रोगाचा शोध लावला, त्यानी याला मलेरिया
( Malaria ) असे नांव दिले. मराठीत याला आपण हिव-ताप म्हणतो.
त्या शास्त्रज्ञाची प्रथम अशी कल्पना झाली की डासामुळे सर्वत्र हवा दुशीत होते. त्याचा फैलाव सर्वत्र पसरतो. म्हणून त्याने त्याला डासामुळे होणारी दुषीत हवा अर्थात MAL- AIR संबोधिले. त्याचेच नंतर Malaria असे नांव प्रचलीत झाले.
खरे म्हणजे डासामुळे रक्त दोष होतो. हवेचा नव्हे. हवा हे जीवनाचे प्रमुख अंग, सर्वत्र पसरलेली. ते जीवन उध्वस्त करण्याची क्षमता बाळगणारे हे डास असतात. त्यांच्यामुळे होणारय़ा तापाला कदाचित् व्यापक अर्थाने व दूर दृष्टीने त्याला मलेरिया वा दुशीत हवा म्हटले असावे. असे हे मच्छरांचे साम्राज्य.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply