हिवाळा सुरु झाला कि मटार (वाटाणे)ची भाजी मोठ्या प्रमाणावर बाजारात येते. दिल्लीच्या ढाब्यांमध्ये सर्वत्र मटार-पनीर, आलू-मटार, आलू-मटार-गोभी ची भाजी दिसू लागते.
गेल्या रविवारी भाजी स्वस्त मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला. मटारच्या वरील सर्व भाज्या डब्यात नेल्या. आज सकाळी परांठा खाण्याची इच्छा झाली. साहजिकच आहे, सौने काही वेगळे म्हणून कांदे घालून मटार परांठा करायचा ठरविला. त्याचीच कृती खाली देत आहे.
साहित्य :
निवडलेले मटार २ वाटी
बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
बारीक चिरलेली कोथिंबीर -अर्धा वाटी
हिरवी मिरची -२-४ (इच्छेनुसार)
तिखट २-३ छोटे चमचे
जिरेपूड १ छोटा चमचा
मिरे पूड १ छोटा चमचा
हळद १ छोटा चमचा
आणि चाट मसाला (१ मोठा चमचा ) [चाट मसाला टाकला कि इतर मसाले टाकायची आवश्यकता नसते आणिक स्वाद हि मस्त येतो]
मीठ स्वादानुसार [ चाट मसाल्यातही मीठ असते, हे लक्षात ठेवावे]
तेल २ चमचे
कणिक चार वाटी परांठ्यांसाठी आणि देसी तूप किंवा तेल परांठ्यांना लावण्यासाठी.
कृती:
गॅसवर कढई ठेऊन २ चमचे तेल घालून, त्यात मटार आणि हिरवी मिरची परतून, २ मिनिटासाठी झाकण ठेऊन एक वाफ काढून घ्यावी. नंतर थंड झाल्यावर मटार मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. बारीक वाटलेल्या मटार मध्ये तिखट, जिरे, मिरे पूड, हळद , चाट मसाला, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून मिश्रण एकजीव करून परांठ्यांत भरण्यासाठी गोळे मळून घ्यावे. आता मळलेल्या कणकीची पारी बनवून त्यात त्यात वरील मिश्रणाचे गोळे भरून परांठा लाटून, तव्यावर चारीबाजूने तूप सोडून खरपूस भाजून घ्यावे.
ज्याना तूप कमी खायचे असेल त्यांच्या साठी – तव्यावर पोळीसारखा परांठा भाजून नंतर गर्मागरम परांठ्यावर थोडे तूप लाऊन गर्मागरम परांठा वाढवा.
टीप: तूपाऐवजी तेलही वापरल्या जाऊ शकते.
हा परांठा दही आणि हिरव्या चटणी सोबत मस्त लागतो. सौ. ने दही आणि आवळ्याच्या हिरव्या चटणी सोबत परांठा वाढला.
— विवेक पटाईत