एक माणूस स्वच्छतेचा फारच भोक्ता होता. मात्र त्याचा अतिरेक एवढा वाढला की, या स्वच्छतेच्या नादापोटी त्याला सगळ्या गोष्टी अमंगळ वाटू लागल्या. घरामध्ये दैनंदिन कामे करताना जी अस्वच्छता व्हायची तिलाही तो कंटाळला व एके दिवशी स्वतःचेच घर सोडून तो दुसऱ्या गावी गेला. परंतु तेथेही त्याला जिकडेतिकडे घाण दिसू लागली म्हणून तो जंगलात गेला. तेथे एका झाडाखाली बसला असता पक्ष्यांनी वरून त्याच्या अंगावर घाण केली. जंगलही घाण म्हणून तो मनुष्य नदीवर गेला. नदीतील पाण्याचा प्रवाह संथ होता म्हणून तो त्याच्यात पाय सोडून बसला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की, त्यातही घाण पाणी आहे व त्यामुळे आपले पाय खराब झाले आहेत.
जिथे जाईल तेथे घाण या कल्पनेने तो फारच वैतागला व जगण्यात काही अर्थ नाही म्हणून त्याने आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने होळी पेटविली. त्या होळीत तो शिरणार तेवढ्यात आजूबाजूला राहणारे काही लोक तेथे आले. त्यांनी त्या माणसाला विचारले की, हे काय चालले आहे? त्यावर तो माणूस म्हणाला, घाणीला वैतागून मी जीव देत आहे. त्यावर ते लोक म्हणाले, तू जाळून घेतले तर येथे किती घाण सुटेल? आम्ही जवळच राहतो. आम्ही जायचे तरी कोठे? तो मनुष्य पुन्हा वैतागला व म्हणाला, “या जगात सगळीकडेच घाण दिसते; मग मी एकट्याने मरून ही घाण दूर होईल असे वाटत नाही.”
त्याने थोडा वेळ विचार केला. जगात घाण जरी असली तरी इतर बऱ्याच गोष्टी चांगल्याही आहेत, असा विचार करून तो आपल्या घरी निघाला.
काही वेळाने जोरदार पाऊस सुरू झाला. सगळीकडे चिखल झाला. त्या चिखलातून तो वाट काढीत निघाला. त्यामुळे तो पुन्हा वैतागला होता. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि समोर त्याचे लक्ष गेले. आकाशात छान इंद्रधनुष्य तयार झाले होते. चिखलात थांबूनच इंद्रधनुष्य पाहताना त्याचे भान हरपून गेले होते. आता त्याला चिखलाचे काहीच वाटत नव्हते. कारण त्याने आपले मन कधीच स्वच्छ करून घेतले होते. त्या चिखलातच तो आनंदाने वाट तुडवित आपल्या घरी गेला.
Leave a Reply