आज ३० नोव्हेंबर.. आज मराठीतील नामवंत लघुकथालेखक वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे यांची पुण्यतिथी.
बापूसाहेब चोरघडे यांचा जन्म १६ जुलै १९१४ रोजी झाला. बापूसाहेब चोरघडे यांची पहिली लघुकथा कथा ‘अम्मा’ १९३२ साली जन्माला आली, आणि प्रसिद्धही झाली. हळूहळू त्या काळातील गाजलेल्या वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले. ते दोन वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते. महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता. एम.ए. झाल्यावर वामन चोरघडे यांना वर्ध्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्याच सुमाराला स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. अनेक तरुणांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली, त्यात चोरघडेही होते. त्यांना दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवभाई देसाई अशा व्यक्तींचा सहवास घडला. विचारांना नवी दिशा मिळाली. आचारांत बदल घडला. तेव्हापासून घेतलेलें खादीचें व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावलें. वामन चोरघडे हे नेहमी खादीचा कुडता, पायजमा अशा स्वत: धुतलेल्या स्वच्छ पांढर्याव-शुभ्र वेषातच असत. वामनरावांना व्यायामाची आवड होती. एखाद्या पहेलवानासारखी त्यांची शरीरयष्टी होती. स्पष्ट व शुद्ध उच्चार, वाचनामुळे समृद्ध झालेली भाषा, अभ्यासामुळे आलेली विचारांची श्रीमंती आणि प्रचंड आत्मविश्वास यामुळे चोरघडे एक वक्ते म्हणूनही त्यांच्या काळी गाजले. स्वातंत्र्य दृष्टिपथात आलें त्यावेळी त्यांना बंदिवासातून मुक्ती मिळाली आणि गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वर्ध्याच्या गोविंदराम सकसेरिया वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले, १९४९ साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य झाले आणि तिथूनच चोरघडे प्राचार्य म्हणून १९७४ साली निवृत्त झाले. त्याकाळी महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात रामकृष्ण पाटील होते. वामन चोरघड्यांवर त्यांनी मानद अन्नपुरवठा अधिकारी म्हणून जबाबदारी टाकली. त्यांनी ती उत्तम प्रकारे निभावली. पुढे काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. मा.वामन चोरघडे यांचे ३० नोव्हेंबर १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
Leave a Reply