नवीन लेखन...

मराठी- इंग्रजाळलेली की मराठमोळी ?

 

माझिया मराठीची परि बोलू किती कौतुके।

परि अमृतातेतही पैजा जिंके ।।

असे रसपूर्ण वर्णन असणार्‍या मराठी भाषेने आपला हक्काचा दिवस २७ फेब्रुवारीला साजरा केला. या निमित्ताने का होईना पण अनेक इंग्रजी भाषिक महाराष्ट्रीय लोकांनी मराठीचे गोडवे गायले. अनेक वृत्तपत्रांनी तर संपूर्ण पुरवण्याच या भाषेसाठी देऊ केलेल्या. खुद्द मराठी भाषेलाच स्वत: ‘सेलिब्रिटी’ झाल्यासारखं वाटलं असेल.

२७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिन’ यानिमित्ताने कार्यक्रम आखण्यात, चांगले मराठी लेखन करण्यात अनेक संस्था, वृत्तपत्रे गेले अनेक दिवस कार्यरत होती. मराठी भाषेबद्दल नेमकं लोकांना काय वाटतं, इंग्रजी शाळेत जाणारी मुलं मराठीत बोलतात?, मराठी भाषा ही आपली मायबोली असूनही तिला वाचवण्यासाठी खटाटोप करावा लागतो, हे असं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा ध्यास एका नामवंत वृत्तपत्राने घेतला. चकाचक आणि ‘हायफाय’ मराठीत बोलायचं तर त्यांनी ‘सर्व्हे’ केला होता म्हणे. त्यांनी विचारलेले प्रश्न हे खास तरुणाईसाठी होते. उदाहरण द्यायचंच झालं तर लॉरेल आणि हार्डी प्रमाणे मराठी साहित्यात अजरामर झालेली विनोदी जोडगोळी कोणती? किंवा तुम्ही इमेल करताना, सोशल नेटवर्किंग साइटवर मराठीत टायपिंग करता का?..काही उत्तरं ही खरंच धक्कादायक होती. या माणसाला मराठी बनवलं तरी कोणी? असा मनस्ताप होणारी. तर काही, हीच तरुणाई उद्याच्या मराठीच्या उज्वल भविष्याचं प्रतिक आहेत, असं मानाने सांगू अशी.

हिंदी किंवा इंग्रजी मधल्या एखाद्या कादंबरीचं नाव घेतल्यावर, त्याचा लेखक कोण असं विचारलं तर क्षणार्धात आजची पिढी त्या लेखकाचं नाव सांगते. एवढंच काय, तर त्या लेखकानी लिहिलेल्या इतर पुस्तकांच्या नावाची यादिही सांगू शकते. पण मराठीतलं हे हे गाजलेलं पुस्तक कोणी लिहिलं, असा प्रश्न केला की मात्र यांची गाडी अडते. ऐकिवात आलेली चार-पाच लेखकांची नावं जिभेवर येतात आणि यातलाच एक कोणीतरी असेल असा निष्कर्ष काढून विषय संपवला जातो.

हे झालं साहित्यिक नगरीतलं. पण दूरदर्शनही काही याला अपवाद नाही. इथेही सगळा सावळाच गोंधळ. आम्ही मराठीला वाचवतो, मराठी भाषेला जपतो, असं घोकून घोकून ओरडणारेही आपल्या मालिकेत, सिनेमात, कार्यक्रमात तोडकं-मोडकं मराठी येणार्‍या आणि अस्खलितपणे ‘स्टायलिश’ इंग्रजी शब्दांची साथ त्याला देऊन इंग्रजाळलेली मराठी बोलणार्‍या नायक-नायिकांनाच प्राधान्य देतात. आम्ही मराठी ‘इंडस्ट्रीला’ ‘ग्लॅमरस’ बनवतो हा त्यामागचा ‘यू एस पी’ अर्थात ‘मराठीला इथे विकलं जातं.’

हे आहे का मराठीचं उज्वल भविष्य?, अशी जपतो आपण आपली मराठी भाषा? या प्रश्नांची उत्तरं ‘हो’ असेही देणारे खूप असतील आणि ‘नाही’ म्हणणारेही तेवढेच.

साहित्यिक विश्व असो, दूरदर्शन असो किंवा इतर कोणतंही क्षेत्र, मराठी भाषा मनापासून जपणारी मंडळी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, परंतू तीही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढीच. या हाताच्या बोटांवर आपल्याला सामील व्हायचंय. फक्त तरुण पिढीला दोष देऊन काहीच फायदा नाही. कारण ‘जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही’ असं म्हणणारे आपणंच रसदार, अमृततुल्य अशा आपल्या मराठी भाषेला महाराष्ट्रातच डावललं जाताना बघून, काहीच करु शकत नाही. दोष द्यायचा तरी कोणाला?, आपण एकटे काय करु शकतो? काहीच नाही, असं म्हणत हाताची घडी अन् तोंडावर बोट असं सर्रासपणे म्हणायला आता आपण शिकलो आहोत.

दोन अनोळखी मराठी व्यक्ती बसमध्ये एकमेकांशेजारी बसल्यावरसुद्धा ‘आपण कुठे उतरणार’ यापेक्षा ‘आप कहॉं उतरेंगे’ यात धन्यता मानतात. मराठीला आजकाल मागणी कुठे आहे, असं म्हणत आपल्याच मुलांना इंग्रजीमध्येच पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करतात. फाईव्ह स्टार हॉटेल, विमानतळ अशा ठिकाणी गेल्यावर मराठीत बोलणं म्हणजे आम्ही अगदीच अशिक्षित अशी गैरसमजूत करणार्‍यांची आपल्याकडे तर अजिबात कमी नाही.

ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराजांनी खर्‍या अर्थाने ‘ग्लॅमरस’ बनवलेल्या आपल्या मराठीला सोन्याचा मुलामा चढवतो अस सांगून सोन्याचं पाणी लावण्यात काय अर्थ आहे. ही आपणंच स्वत:ची केलेली फसगत नाही का?

काय करायचं हे ठरवणं आपल्या हातात. घातलेली हाताची घडी जर आपण सोडवू शकत नसलो तर मराठी भाषेबद्दल काहीएक बोलण्याचा आपल्याला हक्कच नाही.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कविवर्य सुरेश भटांनी लिहिलेल्या कवितेतील या सुंदर ओळी आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. चला मग ध्यास घेऊया मराठी भाषेचा. मराठी भाषेची संस्कृती पुढे चालवूया. फक्त मराठी भाषा दिनालाच मराठीचे पुरवणीभर गोडवे गाण्यापेक्षा रोज अभिमानाने शुद्ध मराठमोळ्या मराठीत संवाद साधूया आणि अभिमानाने सांगूया, हो ! आम्ही मराठी आहोत. आम्ही ‘महाराष्ट्रियन्’ नाही, आम्ही ‘महाराष्ट्रीय’ आहोत.

— धनश्री प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..