मालती पांडे यांच्या घरात संगीताचे वातावरण होते. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९३० रोजी झाला.
लहानपणापासूनच गाण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मालतीबाईनी त्रिवेदी सर व नाशिकचे भास्करराव घोडके यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. किशोरवयातच त्या गाण्याच्या बैठकी करू लागल्या.महाविद्यालयात असताना ”घराबाहेर ”या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्यामुळे प्रभातच्या ”आगे बढो”साठी सुधीर फडके यांनी मालती बाईना बोलावले.
”वेद मंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम”,”पुढचे पाउल पुढेच टाका”,”त्या तिथे पलीकडे”,हि त्यांची चित्रपटातील गीते खूप गाजली. मालती पांडे यांनी आपल्या आत्मकथनात लिहिले आहे कि ”त्या तिथे पलीकडे ”हे गीत लतादीदींना इतके आवडले कि एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी ते गायिले होते.
कोलंबिया कंपनीने त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. राजा बढे व संजीवनी मराठे यांचे काव्य तर संगीत होते ”गजाननराव वाटवे यांचे. ”ये पिकवू अपुले शेत मंजुळे”,”आला स्वप्नांचा मधुमास” अशी ती दोन गीते होती. ”कुणीही पाय नका वाजवू”,”वळणावरून वळली गाडी”ही वाटवे यांनी स्वरबद्ध केलेली तर ”खेड्यामधले घर कौलारू”,”या कातर वेळी ”हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली. आजही त्यांचे ”या कातर वेळी” हे गीत मनाला वेड लावते. लपविलास तू हिरवा चाफा हे गाणे मा.प्रभाकर जोग यांनी १९६० मा. मालती पांडे यांच्या कडून गाऊन घेतले. गदिमा यांच्या या गाण्याने सगळ्यांना त्या वेळी वेड लावले होते. त्या गाण्यातील फुलुनी राहणे,चोरा तुझिया मनी चांदणे, चोर ही जाणे चंद्र ही जाणे, केली चोरी खपेल काय, ही कडवी मनाचा ठाव घेतात. ”लपविलेल्या हिरव्या चाफ्याचा गंध ”आजही मनामनात दरवळतो आहे. घरात संगीताचं वातावरण असलं की आपसूकच सुरांचे संस्कार मनावर होत असतात.
संगीत वारसा घरातल्या किमान एकाकडे तरी येत असतो तसेच मालती पांडे यांच्या बाबतीत. गायीका प्रियांका बर्वे ही मालती पांडे-बर्वे यांची नात. तिने सागरिका म्युझिक ‘प्रेमाला’ या अल्बमसाठी, ‘मला सासू हवी’ या मालिकेचं शीर्षकगीतंही गायले आहे. ‘रमा माधव’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘मुक्काम पोस्ट धान्होरी’, ‘गोंदण’ या सिनेमांमध्ये ती गायली आहे. ‘डबलसीट’, ‘बाइकर्स अड्डा’ या सिनेमांसह तिचे काही अल्बमही लवकरच येणार आहेत. गझल, नाटय़गीत, पाश्र्वगायन, लावणी असे सगळेच संगीताचे प्रकार तिच्या आवडीचे आहेत. सिनेमा, मालिकांसोबतच प्रियांका बर्वे ने संगीत नाटकांमध्येही काम करते. राहुल देशपांडे यांच्यासोबत ती ‘मानापमान’, ‘संशयकल्लोळ’ या संगीत नाटकांसाठी ती काम करते.
मालती पांडे यांचे २७ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
लपविलास तूं हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का?
प्रीत लपवूनी लपेल का? ॥धृ.॥
जवळ मनें पण दूर शरीरें
नयन लाजरे चेहरे हंसरे
लपविलेंस तूं जाणुन सारें
रंग गालिंचा छपेल का? ॥१॥
क्षणांत हंसणे, क्षणांत रुसणें
उन्हांत पाऊस, पुढें चांदणें
हें प्रणयाचें देणें घेणें
घडल्यावांचुन चुकेल का? ॥२॥
पुरे बहाणे गंभिर होणें
चोरा, तुझिया मनीं चांदणें
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे
केली चोरी छपेल का? ॥३॥
गायिका : मालती पांडे
गीतकार : ग. दि. माडगुळकर
संगीत : प्रभाकर जोग
Leave a Reply