मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली.
शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
— सुरेश भट
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.
सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ. स. ७३९) येथे आहे. श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. हा शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.
श्री चामुंडराये करवियले ।
श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।
या प्रकारे त्या शिलालेखात उल्लेख आढळतो.
कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा केला जातो.
— Laxmikant Pelmahale
Leave a Reply