आज ५ नोव्हेंबर.. आज मराठी रंगभुमी दिवस
१८४३ साली विष्णुदास भावे यांनी ‘संगीत सीतास्वयंवर ‘ नाटकाचा प्रयोग सदर करून मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. १५० हून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी रंगभूमीवर अनेक प्रयोग केले गेले ,आणि आजही अनेक नवे प्रयोग सातत्याने होत आहेत मा.विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये यांच्या हातात पडल्या. त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला. मराठी रंगभूमी स्थापनादिन प्रतिवर्षी ठिकठिकाणी साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची ’अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’ ही १९६० सालापासून ’विष्णुदास भावे गौरवपदक’ देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी या दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्यार ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री.काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, शरद तळवलकर, दिलीप प्रभावळकर,रामदास कामत, शं.ना. नवरे , फय्याज इमाम शेख, रत्नाकर मतकरी, अमोल पालेकर, महेश एलकुंचवार, डॉ.जब्बार पटेल आदींना मिळाला आहे. या वर्षीचा पुरस्कार मा. अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलेले ज्येष्ठ अभिनेते मा. जयंत सावरकर यांना मिळाला आहे. छोट्या मोठ्या कोणत्याही भूमिकेत असले तरी आपली अभिनयाची स्मृती रसिकांच्या मनात उमटवणाऱ्या जयंत सावरकर यांना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद सर्वांनाच झाला, यातच या व्रतस्थाला मिळालेली सन्मानाची पावती आहे. मराठी रंगभूमीचे संस्थापक विष्णुदास भावे यांच्या नावाने येत्या मराठी रंगभूमी दिनी, आज पाच नोव्हेंबरला सांगलीत वितरण होत आहे.या पुरस्काराने अभिनयाची साठी गाठलेले आणि सहस्रचंद्रदर्शनांकित अभिनेते असलेल्या सावरकर यांना त्यांच्या आयुष्यभराच्या भूमिकांना मिळालेली दाद आहे. त्यांचा हा नित्यनूतन उत्साह असाच राहो, हीच या पुरस्काराच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply