लहानपणापासूनच प्रभाकर पणशीकर यांचा ओढा नाट्यक्षेत्राकडे होता. त्यांचा जन्म १४ मार्च १९३१ रोजी मुंबईतल्या गिरगांव येथील फणसवाडीत झाला.शाळेत असताना विविध व प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. इककेच नाही तर ती नाटके गिरगावातील गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे तरूणपणीच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. .पणशीकरांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण कला शाखेतुन मुंबईतल्या विल्सन महाविद्यालयातून पूर्ण केले.
१३ मार्च १९५५ ह्या दिवशी “राणीचा बाग” नाटकाद्वारे मा.प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. नाट्य वर्तुळात मा.प्रभाकर पणशीकरांना “पंत” या नावाने ओळखले जात असत; वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांच्या “नाट्यनिकेतन” या संस्थेत प्रवेश केला आणि “कुलवधू”,“भूमिकन्या सीता”,“वहिनी”,“खडाष्टक” अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
पुढे मो.ग.रांगणेकरांशी काहीकारणास्तव मतभेद झाल्यामुळे “नाट्यनिकेतन” मधून प्रभाकर पणशीकर बाहेर पडले आणि “अत्रे थिएटर्स” मधून “तो मी नव्हेच”या नाटकाचे प्रयोग सादर करू लागले. या नाटकात तो मी नव्हेच, असं म्हणत लखोबा लोखंडेने काही वर्षांपूर्वी बऱ्याच जणांना गंडा घातला होता. त्यातील विविध व्यक्तिरेखा साकारत मा.प्रभाकर पणशीकर यांनी जवळपास साऱ्यांनाच चकित केलं होतं. आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर ह्यांच्या मदतीने मा.प्रभाकर पणशीकरांनी १९६३ साली “नाट्यसंपदा” या संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले लिखीत “अमृत झाले जहराचे” आणि वसंत कानेटकर ह्यांचे “मोहिनी” ही दोन नाटके “नाट्यसंपदे”ने रंगमंचावर आणली. पण दुर्दैवाने ही नाटके फार काळ चालली नाहीत. मात्र त्यानंतरच्या “मला काही सांगायचंय” आणि “इथे ओशाळला मृत्यू” ह्या नाटकांच्या निर्मितीने “नाट्यसंपदे”ला व्यावसायिक यश आणि अमाप ख्याती मिळाली. “इथे ओशाळला मृत्यू’मधील औरंगजेब साकारताना ते नमाज पढायला शिकले. या नाटकात औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेला मिळालेली दाद ही पणशीकरांच्या अभिनयकौशल्याला होती. “अश्रूंची झाली फुले’ नाटकामध्ये पणशीकर यांनी साकारलेले प्रा. विद्यानंद आणि आधी डॉ. काशिनाथ घाणेकर व नंतरच्या टप्प्यात रमेश भाटकर यांनी साकारलेला “लाल्या’ ही अभिनयाची जुगलबंदी रसिकांना अनुभवता आली. या नाटकाच्या गुजराती भाषेतील प्रयोगातदेखील त्यांनी भूमिका साकारताना जणू आपण जन्माने गुजराती आहोत असेच सिद्ध केले. नाट्यसंपदेच्या “कट्यार काळजात घुसली” संगीत नाटकाने तर इतिहास घडवला; तर १९७० मध्ये “तो मी नव्हेच” चे हक्क “नाट्यसंपदे”ने विकत घेऊन पुढे ह्या नाटकाचे मा. पणशीकरांनी दोन हजार पेक्षाही अधिक प्रयोग केले. पंतांनी आणखीन ज्या नाटकांमध्ये अभिनय केला ती नाटकं म्हणजे “अश्रुंची झाली फुले”,“थँक यु मि. ग्लाड”,“जेव्हा गवताला भाले फुटतात”,“भटाला दिली ओसरी”; तर “संगीत मदनाची मंजिरी”,“संगीत सुवर्णतुला”,“अंधार माझा सोबती”,“किमयागार”,“पुत्रकामेष्टी” या सारख्या गद्य व संगीत नाटकांची निर्मिती केली. याशिवाय पणशीकरांनी मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही आपल्या अभिनयाची प्रतिभा दाखवुन दिली.नाटकांसोबतच ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका आणि आकाशवाणीसाठी असंख्य नाट्यवाचने केली. पणशीकरांनी नाट्य तसंच चित्रपट क्षेत्राला दिलेल्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांने सन्मानित कराण्यात अले होते. यामध्ये महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे “महाराष्ट्रभूषण पुरस्कार”,“विष्णुदास भावे सुवर्ण पदक”,“राजेश्री शाहू सुवर्ण पदक”,“नाट्यगौरव सुवर्ण पुरस्कार”,“संगीत नाटक अकादमी पुरस्कार”,“नटसम्राट बालगंधर्व स्मृति पुरस्कार”,“नटश्रेष्ठ केशवराव दाते पुरस्कार”,“डॉ.काशिनाथ घाणेकर स्मृति पुरस्कार”,“नटवर्य दत्ताराम पुरस्कार”,“आचार्य अत्रे पुरस्कार”,“कलाश्री पुरस्कार”,“उत्तुंग पुरस्कार”,“महाराष्ट्र गौरव पुरस्कार”,“जागतिक मराठी परिषद पुरस्कार”,“मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति पुरस्कार”,“नटसम्राट नानासाहेब फाटक स्मृति पुरस्कार”,“सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार”,व “महाराष्ट्र शासनाचा पहिला जीवन गौरव पुरस्कार”असे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या जीवन गौरव पुरस्काराचे ‘प्रभाकर पणशीकर पुरस्कार’ असे नामांतर करण्यात आले. मा. प्रभाकर पणशीकर यांचे १३ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्रभाकर पणशीकर यांची नाटके
मोहिनी, मदनाची मंजिरी, अमृत झाले जहराचे, सुवर्णतुला, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू. कट्यार काळजात घुसली, इथे ओशाळला मृत्यू, मला काही सांगायचंय, वीज म्हणाली धरतीला, संत तुकाराम, तो मी नव्हेच, विकत घेतला न्याय, महारामी पद्मिनी, लागी करेजवा कटार (हिंदी), होनाजी बाळा, बेईमान, प्रश्नक नाजूक आहे, तो राजहंस एक, त्या कातरवेळी, तीन लाखांची गोष्ट, थॅंक यू मि. ग्लाड, तुझी वाट वेगळी, राजसन्यास, भटाला दिली ओसरी, पुत्रकामेष्टी, मी मालक या देहाचा, निष्पाप, अवनु नानल्ला (कानडी-तो मी नव्हेच), जिथे गवतास भाले फुटतात, किमयागार, घर अण्णा देशपांडेंचं.
Leave a Reply