ज्या सगुण ईश्वरी स्वरूपाची कल्पना तुमच्या मनात पक्के घर करून असेल तर कदाचित तसेच तुम्हास दिसू शकते वा जाणवू शकते. भाव तसा देव म्हणतात, त्याप्रमाणे परंतू हा प्रयत्न अपूर्ण असाच ठरणारा असेल. तुम्हास असत्याच्या दालनात नेणारा असेल. तुमचे सगुण ईश्वराबद्दलचे ज्ञान आणि त्याचे इच्छीत दर्शन हेच मग तुमचे ध्येय बनते. ईश्वराला जाणण्यापेक्षा त्याच्या दिव्यत्वाला अनुभवने, त्याच्याशी काही क्षणासाठी का होईना तादाल होणे, एकरूप होणे हे अंतीम ध्येय असावे. कारण जाणणे ह्यात कल्पनाविलास व ज्ञान ह्याचे योगदान असेल. ती अनश्चीततेबद्दलची जाण असेल. परंतू त्याला अनुभवने हा सत्याचाच शोध असेल. निर्गुण, निराकार आणि दिव्या शक्तीमध्ये मिसळून जाणे. एक नितांत आनंद, कल्पनातील अनुभव जीवनाचे अंतीम सत्य.समोर कुणीच नसते, तरी जणूकाही सर्व असते. त्यापेक्षा जास्त नसते. सर्वत्र केवळ आनंद, समाधान, शांतता. काय हवय तुम्हाला ह्या पेक्षा जास्त. ह्याचाच शोध बोध तुम्ही आपल्या प्रयत्नाने, तपश्चर्येने घेत होतात. मला फक्त त्या शांततेचा शोध होता,वेध होता, तगमग होती. सारे मिळाल्याप्रमाणे भासत होते. संपूर्ण समाधान. हेच जर सगुण रूपाने मला प्राप्त झाले असते. इष्ट देवतेचे दर्शन झाले असते, इच्छीत इश्वरी रूप माझ्या दृष्टीला पडले असते, तर माझ्या आनंदापुढे इच्छेच्या वा वासनांच्या रूपांत अपेक्षा निर्माण झाल्या असत्या. समोरचा दिसणारा भासणारा सगुण ईश्वर हा जरी भव्य दिव्य असला तरी तो माझ्याच स्वरूपाचा असता, मला त्याच्याशी भावनीक संवाद करण्यामध्ये आनंद वाटला असता. एक रूची निर्माण झाली असती. कुणालाही भेटल्यानंतर मग तो संत महात्मा का असेना होणारा संसारीक संवाद ही नैसर्गीक क्रियाच बनते. मला ते टाळता आले नसते. आणि तशा तथाकथित सगुण ईश्वरी दर्शनाची सत्यता प्रश्नाकींत राहीली असती. त्या मिळणाऱ्या आनंदाला समाधानाची साथ मिळाली नसती.
मला माझ्याच कल्पनेनुसार ध्यान धारणेमध्ये जो ईश्वरी वा दिव्य म्हणा हवे तर अनुभव आला त्याचे वर्णन करणे, मिळालेल्या आनंदाचे समाधानाचे मोजमाप करणे केवळ अशक्यच ठरणारे असेल. फक्त एक झाले तो अप्रतिम मनाच्या शांततेचा क्षण पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य म्हणजे त्या नितांत आनंद अनुभवाचा, जाणीवेचा पुढे काही वा कोणता प्रवास असू शकेल हा विचारच नष्ट झाला. जे मिळाले, जाणले वा अनुभवले ते अंतीम सत्य आहे. हा विचार दृढ झाला. ह्याहून दुसरे आणखी काही नाही. हेच ते ईश्वरी दर्शन, अंतिम ध्येय, एक नितांत आनंद, समाधान आणि मनाची खरी शांतता. ह्याच विचारात धन्यता पावलो. कुलस्वामिनी श्री.रेणुका देवी आणि गुरू जेरे स्वामी यांचे आभार मानले. त्यांना साष्टांग दंडवत.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply