पौराणीक कथा व कथासार वाचण्यानी मनाच्या धार्मिक वृत्तीना, ईश्वरी सानिध्याची ओढ लागली. ईश्वरी रूप मनामध्ये दृढ होवू लागले. सगुण इश्वरी साधना मनास आनंदी देईल, समाधान देण्यासाठी मदत करेल हा विचार दृढ झाला. अनेक सगुण रूपी ईश्वरांच्या प्रतिमांनी मनात एकच गर्दी केली. ऊँ नमो भगवते वासूदेवायन् महा ह्याचे भव्यतेमध्ये महाविष्णूची प्रतिमा डोळ्यापुढे आली. जय जगदंबेच्या स्वरूपात विश्वाची जगत जननी श्री. अंबामाता तीच्या सिंहरूप वाहन व आयुध्ये यांनी मन प्रसन्न होण्याचा अनुभव आला. श्री. गजानन, श्री. कृष्ण, श्री राम, श्री सुर्यनारायण अशा अनेक भव्य आणि दिव्य देवदेवतांचे प्रतिमामय वर्णनात्मक स्वरूप मनात तरंगु लागले. त्यांची अनेक कार्ये, शक्ती महत्व आणि कृपादृष्टी यांची वर्णने धार्मिक पुस्तक संग्रहामधून होवू लागली. त्याचा मनावर पगडा बसू लागला. सर्वांविषयी श्रध्दा निर्माण होवू लागली.
पुस्तकांच्या ह्या संग्रहामधून पौराणीक जगातून आधूनिक जगामध्ये येवू लागलो. आधूनिक जगाचा ईश्वरी मार्गदर्शनाच्या इच्छेने अभ्यास होवू लागला. थोर संत मंडळी, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. संत तुकाराम महाराज, श्री. संत एकनाथ महाराज श्री. संत नामदेव महाराज आणि चरित्रे व कार्य वाचले. ह्यांनी अशाच थोर संत मंडळींनी आपल्या ज्ञानांनी, भक्तीरसांनी आणि विशेष म्हणजे आपल्या उच्चतम मानवी वागणूकींनी जो समाजात आदर्श घालून दिला. भक्तीमार्गाच्या दिशांचे मार्गदर्शन केले ते मनाला खूपच आनंद व समाधान देणारे वाटले. अनेक देवदेवतांचे वर्णन व त्यांचे दिव्यत्व ह्याचे ज्ञान होवू लागले. परमेश्वराचे एक रूप, त्याचे सर्व ठीकाणचे अस्तित्व आणि तो सर्वशक्तीमान असल्याची जाणीव त्यांच्या लेखनातून, अंभगातून तीव्रतेने होवू लागली. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही एका देवाला समर्पीत व्हा, त्याच्यावरच आपली श्रध्दा, भक्ती अर्पण करा, त्याच्या एकाच सगुणरूपामध्येच त्या निर्गुण, निराकार परमात्म्याला बघा. त्या तुमच्या इष्ठ देवामध्येच तुम्ही त्याला जाणू शकाल. तुमचे प्रेम, समर्पण व भक्ती ही शेवटी जी प्रमुख देवता शक्ती असेल तीलाच मिळते. निरनिराळ्या सगुण देवतांच्या वर्णनामुळे चंचल मनाची जी संभ्रमावस्था होत असे तीला बंधन पडले. कोणता देव मोठा, कोणता महान, कोणता कृपावंत वा कोणता आपल्या भक्तीला पावेल ह्या वैचारीक वादळाची शांतता झाल्याचे वाटले. आता भक्ती व समर्पण भावना फक्त एकाच देवाच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प मनाने घेतला. माझे गुरू श्री शंकराचार्य जैरेस्वामी महाराज यांचे संकल्प मनाने घेतला. श्री शंकराचार्य जैरेस्वामी महाराज यांचे मार्गदर्शन झाले. त्यांची पाठ्यपुजाकरून आशिर्वाद घेतले. “तुझ्या कुळाची घराण्याची देवता कोणती?” अर्थात कुलस्वामी वा कुलस्वामिनी श्री. जगदंबा रेणुकादेवी आहे. त्यामुळे त्याच श्री जगदंबेचे सतत चिंतन करणे, तीची सदैव आठवण ठेवणे, तीचे नामस्मरण करणे आणि जी विविध देवता रूप आहेत त्या सर्वाना भक्तीपूर्वक फक्त त्या जगदंबेमध्येच असल्याचे समजणे, तीच्याच रूपांत, नावात सर्व देवतांचे दर्शन झाल्याचे समाधान मनात निर्माण करणे, हा उपदेश मिळाला. वैचारीक व्दिधा परिस्थीती एकदम नाहीशी झाली. माझी इश्वरी संकल्पना जी होती तीचे स्वरूप मी फक्त श्री जगदंबेच्या, फक्त एकाच देवतेमध्ये केद्रींत करू लागलो. तीचेच नामस्मरण व आठवण सतत राहील याची काळजी जाणीवपूर्वक घेवू लागलो. काही काळानंतर जगदंबेच्या नामस्मरणाची इतकी सवय होऊ लागली की इतर कोणत्याही देवतेचे नाव जवळ जवळ विसरले जावून फक्त “जय जगदंब” हेच मनात येवू लागले. कोणत्याही देवाच्या मंदीरामध्ये जर दर्शनाला जाण्याचा योग आला तर त्या देवतेच्या मुर्तीला श्रध्दापूर्वक अभिवादन करताना, त्याचे स्तुती श्लोक म्हणण्याऐवजी फक्त “जय जगदंब” म्हणत मी त्या देवतेच्या ठिकाणी श्री जगदंबाच असल्याची भावना व्यक्त करून नमस्कार करीत असे. असल्या वागण्याची प्रथम प्रथम मनात खंत व शंका येत होती. मन बहकले असावे असे वाटे. समोर श्री गजाजनाची वा श्री. शंकराची अथवा श्री विष्णूची , रामकृष्ण यांची मूर्ती बघत असताना, त्याना अभिवादन करीत असताना मी मात्र ‘जय जगदंब’ म्हणत असे. त्या त्या देवताना तीच्याच रूपात नमस्कार करीत असे. परंतू माझ्या मनाचा दृढनिश्चय आणि मी केलेला संकल्प मला सतत धीर देत होता.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply