विचार निर्मीती आणि त्याचा वेग ह्या दोन्हीवर लक्ष केंद्रीत केले. एकानंतर दुसरा विचार, लगेच तिसरा चौथा विचार अशी एक प्रंचड रांगच सतत चालते. विचारांचे उत्पन्न होणे, भविष्यकाळातून लगेच वर्तमानाची रेखा पार करीत भूतकाळांत जाणे ह्या विश्लेशनासाठी वा समजण्यासाठी भिन्न बाबी आहेत. त्यांच्या वेगापुढे त्यांना विभागणे तसे अवघडच. योग सामर्थ्य व विचारांच्या उत्पत्तीकडे लक्ष केंद्रीत करण्याची प्रथम कला साध्य झाली पाहिजे. गेलेल्या विचाराला जावू देणे म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे हे आधी अवगत केले पाहिजे. त्याचक्षणी येणाऱ्या अर्थात उत्पन्न होणाऱ्या विचारावर सर्व शक्तीने लक्ष केंद्रीत करीत त्याच्या उत्पन्नावर रोख लावली पाहिजे. मनावर अर्थात विचारावर लक्ष केंद्रित करण्याची एक कला असते. एक योगीक असतो. सततच्या योग धारणेने वा प्रयत्नाने ही कला साध्य होते. विचारांचा प्रवाह थोडावेळ थांबविण्याचा प्रयत्न योग्य प्रयत्नानंतर साध्य होतो. हे अनुभवाने सांगता येते. येणाऱ्या विचाराला त्याच्या प्रवाहाला क्षणीक वा काही वेळेपर्यत थांबविणे म्हणजेच त्या विशिष्ठ वेळेत तुम्ही ‘विचार शून्य’ अशा एका स्थितीमध्ये काही वेळेसाठी जातात. गेलेला विचार दुर्लक्षीत करणे व येणारा विचार थोपवून धरणे म्हणजेच तुम्ही तुमच्यासाठीचा वर्तमानकाळातला रूंद करता आहात, वाढविता आहात. वर्तमान काळाला व्यापक करता आहात. हाच तो काळ जेथे न विचार न हालचाल न अस्तित्वाची जाण न प्रकाश न अंधकार. सर्वत्र शांततेचा भास होतो.
वर दिलेले वर्णन ‘वर्तमानकाळ’ हा तुमच्यासाठी निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे अथवा वर्तमानकाळाच्या सीमारेखा (काल्पनीक) रूंदावण्याचा प्रयत्न आहे. कारण ह्याच थोड्याशा काळामध्ये तुम्हाला त्या महान ईश्वराचे दर्शन घडणारे असमार त्यासाठीची ही वातावरण निर्मीती.
योग सामर्थ्य आणि प्राणायाम या क्रियांची शक्ती प्रचंड असते. शरीराच्या बाह्य तसेच आंतर हालचालींवर ताबा निर्माण करण्याची ही एक साधना आहे. परिणामी शरीर अर्थात इंद्रिये मन आणि बुध्दी (विचार) ह्या सर्वावर एकप्रकारे नियंत्रण करण्याची क्षमता ह्या साधनानी प्राप्त होते. ही साधना अत्यंत अवघड आहे. प्रचंड प्रमाणात केलेल्या प्रयत्नाने, नियमित दैनंदिन केलेल्या सरावाने आणि जाणीवपूर्वक अशा लक्षकेंद्रीत करण्यानेच साध्य होणारी असते. ही एक प्रकारची तपश्चर्या असते. कित्येक योगी ह्रदयाच्या, फूफ्फूसांच्या, आतड्यांचा होणाऱ्या नैसर्गीक अनैच्छीक हालचालींवरसुध्दा मर्यादीत ताबा मिळवू शकतात. हे फक्त योग साधनेमुळे, ह्याच तत्वाने मेंदूच्या हालचालींवर देखील मर्यादीत नियंत्रण करता येते. त्याच्या कार्यावर ऐच्छीक ताबा मिळवता येतो. हीच गोष्ट मेंदू अर्थात बुध्दी सतत करीत असलेल्या विचारावर मर्यादीत ताबा मिळवून त्याचे विचार उत्पन्नाचे कार्य थोडावेळ बाधीत करण्यात होवू शकते. ध्यान धारणा ही योगामधली सर्वश्रेष्ठ साधना समजली गेली. स्वत:ची ओळख जाणण्यासाठी ‘मी कोण आहे’ ‘self-realigation’ ईश्वर म्हणजे काय? जीवात्मा विषयीचे ज्ञान ह्या साऱ्या प्रश्नाची उकल केवळ ध्यानसाधनेमुळे होवू शकते.
परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जावून त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. पूजाअर्चा, पौराणीक ज्ञानकथा, देवस्थाने देवालयांच्या भेटी, भजनकिर्तन, नामस्मरण, मन-विचार आणि भावनांची शुध्दता, धार्मिक ग्रंथाचे वाचन, ध्यान साधनेचा सराव, त्या परमात्म्याच्या सगुण वा नंतर निर्गुण दिव्यतेची ओढ हे सारे मार्ग हलवले जात होते. संकल्प व दृढ निश्चयाला विश्वासाने सतत जागृत ठेवीत गेलो. वरील सर्व कार्यप्रणाली ही कर्मकांडाचाच एक भाग होती. हे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन होते. दाही दिशांनी भटकणाऱ्या चंचल मनाला एक दिशेने मार्गस्त करण्याचे प्रयत्न होते. लक्ष केंद्रीत करण्याचे त्या साधनेमध्ये सामर्थ्य होते. खऱ्या अर्थाने मला नितांत आनंद असिम समाधान व मनाची प्रचंड शांतता लाभली ती ध्यान योगानेच.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply