अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ? इत्यादी प्रश्नाना फारसे लक्ष दिले जात नाही. दैनिक भावना जागृत करणाऱ्या धार्मिकतेचे कवच धारण करणाऱ्या, ह्या साऱ्या कथा आहेत. फक्त आनंद देणाऱ्या, करमणूक करणाऱ्या व काही मधून निती अनितीचा मुलायमा देणाऱ्या वाटतात. त्या फक्त ऐकावयाच्या, बघावयाच्या, असतात. शक्यतो त्याचे रसग्रहण वा तात्पर्य करण्याचा कुणी विचार करु नये.
तरी देखील कांही कथा ऐकताना, प्रसंगाची उकलन करताना, बघताना, मन विचलीत होते. सर्व कथा संग्रह थोर ऋषीमुनी, धर्मपंडीत, विद्वान, यांच्या विचार ज्ञानातून बाहेर आलेला. त्यामुळे त्याला आपल्या सारख्या सामान्यजनानी मान्यता देणे भागच पडते. रामायण कथा मधल्या अनेक कथा ऐकल्या. महान थोर गौतम ऋषीपत्नी आहिल्येची कथा समोर आली. थोडक्यांत जे सार वर्णन केले गेले ते असे. गौतम ऋषी पत्नी पतीवृता साधवी आहिल्यासह आश्रमांत रहात होते. देवलोकीचा राजा इंद्र ह्याची वक्रदृष्टी आहिलेवर पडली. त्याने चंद्राची मदत घेऊन दुष्टपणा करुन आहिल्येला फसविले. तिचा उपभोग घेतला. ऋषीना हे कळताच त्यानी दोघाना शाप दिला. आहिल्या शिळा होऊन पडली. श्रीरामाच्या पदस्पर्शाने ती कालांतरानंतर पावन झाली. कथानक सर्वसाधारणपणे असेच घडू शकते. अनेक प्रसंगात अशा गोष्टी झालेल्या आज तागायत दिसतात. त्यांत वेगळेपणा फारसा नाही. एक बाब मात्र माझ्या वैयक्तीक मनाला खटकली. कथानकांत देवराजा इंद्र याला गोवण्याचा प्रयत्न केला. स्वर्ग मृत्यु पाताळ ही आपली संकल्पना. स्वर्ग हा देवलोक. सर्व ३३ कोटी देवांचे अस्तित्व समजले गेलेले असे विश्व. आम्ही सर्व मृत्युलोकातील मानव. आपणास निसर्गानेविचार विवेक आणि समज ह्याचे वरदान दिलेले आहे. ह्याच्याच क्षमतेने आम्ही सर्व सृष्टीचे विश्वाचे मुल्यमापन करीत असतो. निसर्ग आहे तसाच असतो. प्रत्येक मानव आपल्या क्षमतेनुसार ज्ञान विचारानुसार त्याचे विश्लेशन करतो. ह्यातच निर्माण झाले ते काव्य, ग्रंथ संपदा, ज्ञान सागर. व्यक्ति तितक्या प्रकृती, तितके विचार ह्या सत्य धबधब्यातून अनेक विवीध प्रवाहाचे उगम झाले.
मानवाने देव योनीला सन्मानाचे स्थान दिले. आदर दिला. श्रेष्ठत्व दिले. कारण त्यांच्यामध्ये होती भव्यता, दिव्यता. एक वेगळीच उर्जा शक्ती, निर्मीती व संहार करण्याची क्षमता. ज्याचा विचार मानव करु शकत नाही. ते कार्य करण्याची योग्यता त्याना प्राप्त झालेली आहे. आम्ही देवाना भजतो, पुजा करतो, त्यांचे गोडवे गातो. ते याचसाठी की त्याची आमच्यावर कृपा द्दष्टी व्हावी. आमच्या संसाराचा गाडा व्यवस्थीत चालावा.
देव योनी मधील देवतानी मानवाला नेहमी सहाय्य केलेले आहे. संकटाचे निवारण केले आहे. संकट आणली वा कोणतेही दुष्कृत्य केलेले नाही. म्हणूनच सर्व ३३ कोटी देवता आम्हास आदरणीय आहेत. इंद्र तर ह्या सर्व देवांचा राजा समजला गेला आहे. तो पर्जन्याचा, पाण्याचा अर्थांत सर्व जीवांचा आधिष्ठाता मानला जातो. म्हणूनच सर्व मानव प्राणी त्याला महान आदर देत त्याच्या कृपेसाठी पूजन करतात.
अशा महान आदरणीय देवांने पृथ्वीवर येऊन, आपला देव योनीतील अस्थित्व विसरुन, त्यांच्यापेक्षा अत्यंत भिन्न अशा मानव योनीतल एका स्त्रीशी प्रेमचाळे करणे, हे मनास मुळीच पटणारे नाही. हे केंव्हाही शक्य होऊ शकत नाही. कदाचित् येथे १ अहिल्लेचे महात्म दाखविण्याचा विचार असावा, २ इंद्राचे अवमुल्ल्यन करण्याचा उद्देश असावा, ३ श्री. रामचंद्रांचे देवत्व उजळण्याचा प्रकार असावा, अथवा इतर कोणते तरी.
तसेच कित्येक पुराणातील कथा, सत्यता ह्याच्या कल्पनेत टिकत नाहीत असे केंव्हा केंव्हा वाटते. विद्वान व ज्ञानी लोकांनी ह्यावर अभ्यास करुन ह्या कथामध्ये जो विक्षीप्त वाटणारा प्रसंग असेल तो काढून त्या कथांची गोडी कायम ठेवीत दुरुस्त्या सुचवाव्यात. जे चालत आले तसेच चालू द्या. आपण त्यांत बदल करणारे कोण ही भूमिका नसावी. काळ बदलत आहे, जग बदलत आहे, तसाच कथानकामध्ये मनास न पटणारा भाग काढून टाकल्यास सर्व सामान्याना आनंदच वाटेल. मात्र ते करताना अधुनिकतेतील वेगळी विक्षीपता नसावी. ही सद् इच्छा.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply