मराठीला आधुनिक ज्ञानाचे व व्यवहाराचे समर्थ माध्यम बनविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला त्याचा हा भाषिक स्वधर्म जपावाच लागेल, असे महाराष्ट्र राज्य मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांनी सांगितले
बोलीभाषेचा मराठीवर झालेला परीणाम याबाबत माहिती देतांना न्या. चपळगांवकर यांनी सांगितले की आपल्याकडील बोलीभाषांना त्यांची स्वताची अशी एक परंपरा आहे. अनेक बोली भाषांची मर्यादा कुठे संपते आणि प्रमाण भाषा कुठे सुरु होते हे आपल्याला माहित नाही बोली व प्रमाण भाषेचा जवळचा संबंधआहे. साचले पणाने कोणतीही बोलीभाषा वाढत नाही.
आपल्याकडे असलेल्या बलुतेदारांचे स्वत:चे व्यवहारात शब्द होते. ते बोलीभाषेपुरतेच मर्यादित राहिले. त्यांचा प्रमाण भाषेत वापर केला तर भाषा वृद्धींगत व समृद्ध होईल.
इंग्रजी माध्यमात इंग्रजी येते हा गैरसमज आहे.माध्यमाने केवळ सहज साध्य होते असे नाही. मातृभाषेतून शिकल्यास प्रगती जास्त होते असा माझा विश्वास आहे. जगाच्या स्पर्धेत उभे राहण्यासाठी इंग्रजी येणे आवश्यक आहे.पण याचवेळी आपल्या मातृभाषेचा विसर पडता कामा नये हे माझे मत आहे.
जागतिकीकरणामुळे प्रचंड वेगाने फैलावणारे आधुनिकीकरण एका नव्या संस्कृतीला पोसून बळकट करीत आहे. आपल्यासमोर प्रश्न आहे तो इंग्रजीच्या बहिष्काराचा नाही, तर मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा तेव्हा इंग्रजीचा पूर्णत: त्याग न करता मराठी कशी सुप्रतिष्ठित करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे.
आधुनिकीकरणाच्या नावाखाली मराठी भाषेवर येत असलेले हे हद्दपारीचे संकट दूर करायचे असेल तर पुढील उपाययोजनांचा गंभीरपणे विचार करून मराठी अस्मितेचा ध्वज उंचावता येईल. . आजचे जग हे माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रचंड क्रांतीचे आहे, य चे भान ठेवून या क्षेत्राचे ज्ञान मराठीमध्ये आणण्याचे प्रयत्न करावेत. या क्षेत्रामध्ये मराठीची परिभाषा घडविण्याची नितांत आवश्यकता आहे. सरकारी पातळीवर यासाठी मोठा निधी उभारून तंत्रज्ञानधिष्ठित ज्ञानाला मराठी ग्रंथांचा आकार मिळावा. या क्षेत्रातील नवा विचार मराठीत करता आला पाहिजे. हे करायचे असेल तर काटेकोर, निश्चित अर्थवाही आणि गुंतागुंतीच्या संकल्पना यथार्थपणे व्यक्त करणारी मराठी घडविता आली पाहिजे. तरच मराठी नवविचारांची गंगोत्री बनेल व तिला ज्ञानभाषा म्हणून प्रतिष्ठा प्राप्त होईल.
मराठी भाषेचा अपेक्षित विकास न होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण शिक्षणाच्या माध्यमाच्या प्रश्नाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष होय. महाराष्ट्रात प्राथमिक स्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत शिक्षणाचे माध्यम मुख्यत: मराठी राहील, याविषयी आपण आग्रही असले पाहिजे. यासंदर्भात शासनानेही महत्त्वाची भूमिका बजावायला हवी. मराठी माध्यमांच्या शाळांमधला इंग्रजीचा आणि इंग्रजी शाळांमधला अध्यापनाचा दर्जा सुधारायला हवा. मराठी माध्यमांच्या शाळांमधले इंग्रजीचे अवास्तव भय दूर करण्यासाठी उत्तम अध्यापकांची नेमणूक करावी. विज्ञान-तंत्रज्ञानाचे शिक्षणही मराठीतून उपलब्ध व्हावे. यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर द्यावा. शेवटी मराठी ही प्रमुख ज्ञानभाषा झाल्याशिवाय सर्वसामान्य मराठी समाजाचे जीवन उन्नत होणार नाही हे सत्य आहे.
. जागतिकीकरणाबरोबर इंग्रजीचे महत्त्व प्रचंड वाढलेले आहे, हे सत्य आपल्याला नाकारून चालणार नाही, म्हणून केवळ मराठीच हवी असा अट्टहास धरणे योग्य ठरणार नाही. या संदर्भात पहिली मातृभाषा आणि दुसरी इंग्रजी भाषा हे धोरण राबवावे किंवा कै. यशवंतराव चव्हाणांनी सुचवलेली त्रिसूत्री भाषेची संरचना स्वीकारावी. परंतु प्रथम स्थान हे मराठीलाच असावे.
आधुनिकीकरणातील नवसंस्कृतीचा प्रभाव दूरदर्शन, आकाशवाणी व वर्तमानपत्रांवरही मोठ्या प्रमाणावर पडलेला दिसतो. या तीनही माध्यमांतून बिनदिक्कतपणे इंग्रजीमिश्रित मराठीचा वापर होतो आहे. मराठीचा हा इंग्रजी अवतार सामाजिक अभिसरणाचा मोठा अडथळा आहे. या तीनही माध्यमांमुळे मराठी माणसांच्या आस्वाद प्रक्रियेवरच आक्रमण झाले असून त्याची आस्वादाची कास मराठमोळी भाषाच बदलली आहे. हा प्रकार बंद केला पाहिजे.
राज्याचे भाषा भवन होणे आवश्यक आहे. मराठीला ज्ञानभाषा करायची असेल तर ताज्या ज्ञानाचे मराठीकरणहोणे गरजेचे आहे.. मराठीतील चांगले वाड्मय अन्य भाषांमध्ये आहे पण अन्य भाषांमधील चांगले वाड्मय मात्र मराठीत नाही. उत्तम वाड्मय समकालीन वाड्मय भाषांतरीत झाले तर आपल्या वाड्मयाचा दर्जा नक्कीच वाढेल अन भाषा विकसित होईल.
जगात ६५०० भाषा आहेत. त्यापैकी बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठीचा क्रमांक १५ वा आहे. संगणकावर मराठीचा वापर होतो आहे. आज मराठीसाठी युनिकोडचा सार्वत्रिक वापर होतो आहे. सर्वशासकीय कार्यालयांमध्ये यंत्रणा व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. संगणकाचे प्रशिक्षण हे प्रशिक्षण न रहाता यामध्ये गती व वेग असणे आवश्यक आहे.
भाषा असो देश असो हा केवळ भूतकाळाच्या अभिमानावर जगत नाही भविष्यासाठी परिश्रम करणे महत्त्वाचे आहे. भाषेचा व्यवहारात आग्रह धरला पाहिजे. स्वत: उत्तम मराठीत बोलले पाहिजे. आपण मराठीची किंमत वाढवली पाहिजे.
समाजाच्या प्रगतीत भाषा अडथळा ठरत नाही. त्यामुळे भाषेबरोबरच आपला विकास होणार आहे हे । लक्षात घ्यावे आपल्या स्वत:च्या प्रगतीबरोबरच महाराष्ट्राची प्रगती होणार आहे हे निश्चित.
आधुनिकतेचा सर्व आशय पेलण्याचे समर्थ बळ आपल्या भाषेला मिळावे, असे प्रत्येक मराठी भाषकाला वाटत असेल तर आपला जीवनव्यवहा र निखळ मराठी भाषेमध्ये व्यक्त करण्याचे साहस त्याला दाखवाव.. शेवटी भाषा ही एक सामाजिक संस्था असते. मराठीला आधुनिक ज्ञानाचे व व्यवहाराचे समर्थ माध्यम बनविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला त्याचा हा भाषिक स्वधर्म जपावाच लागेल, मराठीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी! मराठी केवळ अभिमानाचा नव्हे तर, वर्तनाचा, जगण्याचा, अनुभवाचा विषय झाला पाहिजे. बेधडक सर्व ठिकाणी येईल त्या मराठीत बोला. ही भाषा तुमची आहे. ती तुम्हालाच वाढवायची आहे.
(‘महान्युज`च्या सौजन्याने)
— टिम मराठीसृष्टी
Leave a Reply