नुकताच बर्याच वर्षांनी सांगलीला कॉलेजमध्ये गेलो. त्या पवित्र वास्तूला नमस्कार केला आणि मन भूतकाळात गेले.
सन १९७८. शिक्षक, सरकारी कर्मचार्यांच्या संपामुळे त्या वर्षी परीक्षा उशीरा म्हणजे मेमध्ये झाल्या होत्या. दहावीचा रीझल्ट लागल्यानंतर अॅडमिशन कुठे घ्यायची याची चर्चा आम्हा मित्रांमध्ये सुरु होती. मला ८४ टक्के मार्क्स मिळाले होते त्यामुळे मी सायन्सला जावे असा सल्ला सर्वांनी दिला. (त्याकाळी एवढ्या कमी मार्कांवर मी शाळेत पहिला व मिरजेत दुसरा आलो होतो!) पण पुढे कंपनी सेक्रेटरीचा कोर्स करायचा ठरविल्यामुळे कॉमर्सला जायचे नक्की होते. माझा पहिलीपासूनचा जिवश्च कंठश्च मित्र मिरज कॉलेजला जाणार असल्याने व प्रवासाचे अंतर कमी असल्याने तिथे जावे का असा विचार चालू होता. पण त्याचवेळी माझ्या वडिलांचे स्नेही श्री. तानवडे सरांनी आग्रह धरला की माझ्या करीयरच्या दृष्टीने मी चिंतामणराव कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा. ते त्यावेळी कॉलेजात अधीक्षक होते. त्यांनी वडिलांना सांगितले की आमच्या कॉलेजात शैक्षणिक दर्जा तर उच्च आहेच पण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आमचे कॉलेज उत्कृष्ट आहे. शेवटी मी चिंतामणराव कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेतला. गंमतीचा भाग असा कि माझ्या त्या मित्रानेही पुढील वर्षी याच कॉलेजात प्रवेश घेतला!
कॉलेज सुरु झाले आणि पहिली वक्तृत्व स्पर्धा भरविली गेली. मी आणि माझा आणखी एक मित्र अशा दोघांनी, भाग घेऊन तर बघू, म्हणून नावे दिली. श्री. सी. एन. लिमये सरांनी अतिशय आपुलकीने प्रोत्साहन दिले. त्यात मला उत्तेजनार्थ पारितोषिकही मिळाले! (बहुधा उभे राहून काहीतरी बडबडल्याबद्दल!)
त्यानंतर मात्र पुढची पाच वर्षे कॉलेजने मला जे दिले ते शब्दात वर्णन करता येणे कठीण आहे. वक्तृत्व स्पर्धांसाठी तर लिमये सर नेहमी मार्गदर्शन करायचे पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्यानिमित्ताने विविध
विषयांवरच्या पुस्तकांशी झालेली ओळख हा
खूप महत्वाचा अनुभव होता. आमच्या कॉलेजची लायब्ररी हा माझ्या अभिमानाचा विषय होता. परवा सांगलीला गेल्यावर लिमये सरांनी मुद्दाम मला आताची लायब्ररी दाखवली आणि खरं सांगायचं म्हणजे मी हरखूनच गेलो. माझ्या वेळच्या लायब्ररीपेक्षा ती कितितरी अधिक पटीने सुसज्ज झाली आहे. आताचे कॉलेजचे विद्यार्थी खरंच भाग्यवान. वाटलं, पंधरा दिवस मुद्दाम सवड काढून सांगलीला रहावं आणि फक्त लायब्ररीत वाचनात गुंगून जावं.
खरं सांगायचं म्हणजे या लायब्ररीशी माझं खूप जवळचं नातं होतं. कंपनी सेक्रेटरीच्या कोर्सचं भूत मानगुटीवर असल्याने एफ. वाय. पासून मी इंग्रजी माध्यम घेतलं होतं. तेव्हा शिकवण्याचे माध्यम तसेच पुस्तकेदेखील फक्त मराठीतच उपलब्ध होती. मग वर्गात न बसता मी लायब्ररीत जाऊन मराठी पुस्तके घेऊन त्याचे इंग्रजी भाषांतर करून नोट्स काढणे असे उद्योग करु लागलो. त्यामुळे आपोआपच बरोबरच्या मुला मुलींमध्ये मी स्कॉलर (की बावळट?) असल्याचा गैरसमज पसरला (आणि तो अजुनही कायम असावा अशी मला दाट शंका येते.) झाकली मूठ सव्वा लाखाची, दुसरं काय?
या वर्गात न बसण्यावरून आठवण झाली. टी. वायला असताना रोटरी क्लबने “आउटस्टॅंडिंग स्टुडन्ट ऑफ द इयर” अशी स्पर्धा घेतली होती. त्यात मला दुसरे बक्षीस मिळाले. अभिनंदन करताना लिमये सरांनी outstanding means student who stands out of the class असा चिमटाही काढला!
वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, बंद पडलेला वॉलपेपर इनामदार बाईंच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरु करुन तीन वर्षे चालवणे, शेवटच्या वर्षी “झेंडे पाटील महाविद्यालयात गंगू अंबू विठा” ही सादर केलेली एकांकिका- आठवणी तर कितीतरी आहेत. पण अगदी आजही लिमये सर, चव्हाण सर व इनामदार बाईंचं मला नावाने ओळखणं, सध्याचे प्राचार्य डॉ. कंदलगांवकर सर यांनी, मी जणु काही त्यांचा सर्वात आवडता विद्यार्थी आहे, अशा तर्हेने माझ्याशी आपुलकीनं वागणं आणि कोणत्याही व्यावहारिकतेचा स्पर्श नसलेली माझ्या मित्रांनी, मी दूर असूनसुध्दा, अगदी आजतागायत जपलेली निखळ मैत्री (याचं संपूर्ण क्रेडिट त्यांनाच जातं) हीच माझ्या दृष्टीनं महत्वाची शिदोरी आहे.
— कालिदास वांजपे
Leave a Reply