जागतिकीकरण आणि आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रसारामुळे जग जवळ येत आहे हे आपण मान्य करुच. पण, याचं मुख्य कारण भाषेचं आदान प्रदान आहे हे ही विसरात कामा नये. कारण, भाषा हे एकमेव माध्यम आज जागतिक स्तरावरील अनेक क्रांती, अनेकविध व परिवर्तनांसाठी जितकं महत्वाचं मानलं गेलं तितकीच महत्त्वता आज भाषेतून होण्याच्या संपर्कालाही प्राप्त होतेय असं तज्ज्ञांच मत आहे. “ठेविले अनंते तैसेचि रहावे” हा दृष्टीकोन आज मागे पडून आज भाषेमुळे माणसं, माणसांमुळे देश आणि देशामुळे जग जवळ येण्याची प्रक्रिया जी शतकानुशतके वृद्धिंगत होत आहे हा सर्वस्वी भाषेचा आणि पर्यायाने मानवी शक्तीचा विजय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
जागतिक स्तरावरुन आज भारताकडे एक विकसीत देश म्हणून पाहिलं जातं आधुनिकतेच्या आणि यांत्रिकतेच्या युगातही आज सांस्कृतिकतेला महत्त्व देत आपण भाषेचं अफाट, अचाट सामर्थ्य अनुभवतोय. सांस्कृतिकतेच्या अनेक पैलुत भाषेचं बलस्थान इतकं श्रेष्ठ दर्जाचं आहे की, विकसनशील भारताकडे विकसीत भारत ही बघण्याची दृष्टी आज भाषेने जगाला बहाल केली याचाच अर्थ भाषेत किती प्रचंड ताकद आहे. अर्थात भारतीय संशोधकांकडुन जे जे म्हणून शोध लावले गेले किंबहुना संशोधन, परिवर्तन, बदल, बौद्धिकता, लोकांची मानसिकता आणि ओघाने येणारी आधुनिकताही भारताच्या उत्क्रांतीस पोषक ठरली हे ही मान्य करायलाच हवे.
भारतासारख्या बहुभाषिक, बहुप्रांतिक, वैविध्यपूर्ण देशाचं उदाहरण घ्यायचचं झालं तर भारताची लोकसंख्या १२० कोटींपेक्षा जास्त आहे. पु.लं.च्या भाषेत सांगायचच झालं तर त्यातील वेगवेगळ्या भाषेतील निरक्षरांची संख्या ४०% इतकी आहे भारतात १८ प्रमुख भाषा, ६००० बोली भाषा, ४५० जाती, ४५०० पोटजाती, १४०० प्रमुख दैनिक २६ प्रमुख वाहिन्या, ६०% पाणीक्षेत्र, १३% सुपीक जमिन या भौगोलिक स्थितीचा विचार करता त्यातील प्रत्येक भाषावर प्रांत आणि त्या त्या प्रातांत बोलली जाणारी भाषा यांचा ही विचार करणं अधिक गरजेचं आहे. आजमितीला सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणुन मराठी भाषेचं श्रेष्ठत्व आपण वाखणण्याजोगं आहे. मराठी भाषा ग्लोबल होऊ लागली आहे, भाषेला ग्लॅमर प्राप्त होत आहे. असं सर्वच स्तरातुन बोललं जात आहे. त्यासाठी भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती हितकारक नक्कीच असेल पण, आज महाराष्ट्रातुन सातत्याने निर्माण होणारे उदयाला येणारे साहित्यिक, समिक्षक, वाचक, प्रेक्षक वर्ग ही भाषेच्या होणार्या संवर्धनास, वाढीस, विकासास आणि परिवर्तनास उपमुल्य आहे. आज जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मराठी भाषा उभी आहे. आपली स्पर्धा कोणाशी आहे हे ही ती जाणुन आहे. पण, परदेशात रहाणार्या मराठी भाषिकांतही आपली भाषा टिकुन आहे याचा आनंद वाटतो. भाषेत होत असलेल्या परिवर्तनामुळे आज इंटरनेटसारख्या माध्यमवर देखील मराठी भाषेचं वर्चस्व अद्ययावत अद्यारुढ आहे आणि ते टप्याटप्याने ज्ञानाच्या कक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर रुंदावत आहे. “ज्ञानाच्या परिघावर उभा असलेला मराठी माणुस” या टिकेला सुद्धा उत्तर देईल अशी जागा आज मराठी भाषिक भाषेच्या माध्यमातुन निर्माण करत आहे.
आजचा मराठी चित्रपट, नाटक, कथा, कादंबरी, कविता यासारखं साहित्य, अनुवाद, भाषांतर, रुपांतराची प्रक्रिया, भाषेचा बाज, लहेजा, हरकत, मुरक्या, ढंग, शैली, वैशिष्ट्य दाखवणारं आजचं लोकसंगीत असो वा लोककला. सांस्कृतिकतेला एका सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवणारी आपली मराठी भाषा. ही उंची गाठत आहे, किंबहुना गाठण्याचा प्रयत्न करत आहे, ती आजची सर्वच लोककलाकार मंडळी. तान्हुल्याला अंगाखांद्यावर खेळवणारी आई आणि आपली मराठी भाषा यांतील साम्यच इतक्या श्रेष्ठ पातळीचं आहे की, वेदांनी, उपनिषदांनी ज्या भाषेचं वर्णन केलं ती आमची मराठी भाषा ज्ञानोबाराय, तुकोबारायांपासुन ते थेट शिवाजीमहाराजांचा काल असो वा पेशवेकाल असो भाषा ही आजतागायत आमच्यात नांदते आहे, आमच्यात रांगते आहे. याचा अभिमान तर आहेच. पण, आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनीच आपापल्यापरीने भाषेचा हा उंचावत असलेला ध्वज अधिकाधिक उंच उंच नेण्याचा प्रयत्न करुयात या शुभेच्छांसह ……………….. याच सदिच्छांसह ……………..
— प्रकाश बोरडे
Leave a Reply