आजचा कार्यक्रम होता चिरंजीवांच्या ऑफिस कॅम्पसला भेट देणे. त्यामुळे ११ वाजता बाहेर पडलो आणि बस आणि रिक्षा करीत कॅम्पसला पोहोचलो. परवानगीचे सोपस्कार पूर्ण करून आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि आतील इमारती आणि आजूबाजूचे वातावरण पाहून मन एकदम खुष झाले. माझा भाचा तर एवढा खुष झाला की म्हणायला लागला की मला जर अशी कंपनी मिळाली असती तर मी ती कधी सोडलीच नसती. बाहेरील कंपन्यांमध्ये कसे प्रकार घडतात, कशाप्रकारे कामगारांना हाताळण्यात येते, कशाप्रकारचा त्रास असतो इत्यादिबद्दल तो ही के.पी.ओ. मध्ये कामाला असल्यामुळे त्यानेही थोडक्यात माहिती दिली.
अगोदरच म्हटल्याप्रमाणे येथील वातावरण फारच विलोभनीय होते. काय तो परिसर? काय त्या इमारती? काय ती रंगसंगती? सगळेच कसे, आपण कोठेतरी विदेशात असल्यासारखे वाटावे इतके सुंदर दृश्य होते ते. प्रशस्त रस्ते, लांबवर असलेल्या इमारती आणि त्या गाठण्यासाठी जागोजागी ठेवलेल्या सायकली. कोणतीही सायकल घ्या आणि चालू पडा आपल्या इप्सित स्थळी जाण्यासाठी.
चौकशी करता असे कळले की या कॅम्पसमध्ये जवळ जवळ १० हजारांवर कामगार आहेत. त्यांच्यासाठी आहे मोठे कॅफेटेरिया. एकावेळेस हजारो कामगार बसू शकतील अशी व्यवस्था केलेली. कॅफेटेरियाचे तीन भाग होते. जेवणाचे तसेच खाण्या-पिण्याचे निरनिराळे प्रकार उपलब्ध असल्यामुळे आपण एखाद्या स्टार हॉटेलमध्ये तर नाही ना बसलो आहोत, असा सतत भास होत होता. हे एकच कॅफेटेरिया नव्हते तर पुढे आणखीही अशाच प्रकारचे दुसरे कॅफेटेरिया देखील होते. तेही प्रशस्त होते.
एका इमारतीमध्ये स्टोरस् होते तसेच स्क्वाश कोर्ट, बॉलिंग अॅली, टेबल-टेनिस, स्वीमिंगसाठी स्वीमिंग पूल, आईसक्रीम पार्लर, केक शोप, व्यायाम करणां-यासाठी ही मोठी जिम्नेशियम होती. तर दुस-या इमारतीमध्ये इंग्लिश पिक्चरमध्ये दाखवितात तसे कित्येक ऑटोमॅटीक मशिननी भरलेली कपडे धुण्यासाठी भली मोठी लोन्ड्री होती. येथे पूर्वी धुण्यासाठी टाकलेले कपडे ठेवून जाण्याची सोय उपलब्ध नसल्यामुळे बरीच गर्दी असायची, परंतु आता आपण सकाळी कपडे तेथें धुण्यासाठी टाकून, घरी जाताना संध्याकाळी परत घेण्याची सोय केल्यामुळे तितकी गर्दी नसते. आणि ते सगळ्यांना सोयीस्कर देखील होते, त्यामुळे फक्त शनिवार, रविवारसाठी देखील थांबण्याची गरज भासत नाही.
अशाप्रकारे दोन तीन तास मजेत घालवून, मनसोक्त फिरून व येथील आठवणी मनात साठवून व तेथेच जेवण घेवून आम्ही नंतर तीनच्या सुमारास बाहेर पडलो ते मरीना बीचवर जाण्यासाठी. त्यासाठी ऑफिसच्या बाहेर येताच रिक्षा उभेच होते, त्यांतील एक रिक्षा पकडून तेथूनच पुढे ब-याच अंतरावर असणा-या परमूर या लोकल रेल्वेच्या स्टेशनात गेलो. येथून जवळ जवळ एक तासावर मरीना बीच होते. त्यामुळे भर दुपारी बीचवर नको म्हणून चेन्नई एगमोर या अलीकडच्या स्टेशनात उतरलो. तेथून रिक्षा पकडून आम्ही जवळच असलेल्या एक्सप्रेस अवेन्यू या मॉलमध्ये वेळ घालविण्यासाठी गेलो. तेथें थोडे फिरल्यावर तेथून मरीना बीचवर जाण्यासाठी बाहेर पडलो. रिक्षावाल्यास विचारणा केली असता ते काहीतरीच भाडे सांगू लागले. कोणी १०० रुपये सांगत होते, तर कोणी ८० रुपये सांगत होते. शेवटी एकजण ५० रुपयांना तयार झाला. हे सांगयचे कारण इतकेच की रिक्षावाले मग ते मुंबईमधील असोत किंवा चेन्नईमधील असोत, इथून तिथून सारखेच. ते प्रवाशांच्या अज्ञानाचा फायदा उठविण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. रांगड्या भाषेत सांगायचे तर लुटायला बसलेत. आतमधील गल्यागल्या पार करून ज्यावेळेस रिक्षा मेन रोडवर आली त्यावेळेस कळले की अरे आपण तर चेन्नई सेंट्रल स्थानकापासून जवळच होतो व मरीना बीचही तेथून जवळच आहे.
रीक्षावाल्यांकडून दोन गोष्ठी समजल्या त्या म्हणजे मरीना बीचला दोन ठिकाणांवरून प्रवेश घेता येतो. एक म्हणजे युनिवरसिटी जवळील मार्गाने व दुसरा मार्ग म्हणजे गांधी मार्ग. ह्या अगोदरच म्हटल्याप्रमाणे हे मरीना बीच आशियातील सगळ्यात मोठे असे बीच आहे. येथे बीचवर जाताना मला आपल्या गिरगाव चौपाटीची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. बीचसमोरील रस्ता तसाच प्रशस्त. तशीच पोलिसांची वर्दळ. ठराविक जागेवरूनच रस्ता ओलांडून पलीकडे बीचवर जाण्यासाठी पोलिसांचे असलेले मार्गदर्शन इत्यादी इत्यादी. परंतु आपल्या चौपाटीपेक्षा कितीतरी पटीने मोठी असणारी ही चौपाटी होय, तर चौपाटीसमोरील रस्ता हा गिरगाव चौपाटीपेक्षा कितीतरी लहान.
Leave a Reply