येथे एक नमूद करावेसे वाटते कि ह्या तरुणाईतल्या मुलांचे तसेच त्यांच्या पालकांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच. आत्ताच कुठे ही मुले आपले बी.ई.चे शिक्षण संपवून बाहेर पडतात न पडतात तोच त्यांना आय.टी. क्षेत्रात नोकरी मिळाल्यामुळे व मुंबईमध्ये त्यांच्या कंपनीची (इन्फोसिस) ऑफिसेस नसल्यामुळे त्यांना आवडो अथवा न-आवडो मुंबई म्हणा, पुणे म्हणा किंवा नागपूर म्हणा आपले राहते घरकुल सोडून, आपल्या आई-वडिलांना सोडून, आपल्या प्रिय बंधू-भगिनींना सोडून, नातेवाईकांना सोडून ट्रेनिंगसाठी व नोकरीसाठी चेन्नई, मैसूर, बेंगलोर, पुणे, हैदराबाद अशा ठिकाणी यावेच लागते. तसे पाहिले तर ह्या मुलांनी आयुष्य असे किती पाहिले? आत्ताच तर त्यांच्या आयुष्याची खरी सुरुवात झालेली असतांना त्यांना आपल्या घरापासून, माता-पित्यांपासून, भावंडापासून, नातेवाईकांपासून लांब राहावे लागत आहे हे विचार मनात येताच आम्हा माता-पित्यांनाही मनातून दु:ख होतच असते. परंतु वर म्हटल्याप्रमाणे ही मुले स्वावलंबी होताना पाहून, स्वत:चे योग्य निर्णय घेताना पाहून पुढच्याच क्षणाला वाटते की नाही हीच ती वेळ आहे ह्या मुलांनी आपल्या आयुष्यात पुढे जाण्याची, आपल्या आयुष्याचे सोने करण्याची. ह्याच वेळेला जर त्यांनी व पर्यायाने आम्ही पालकांनी थोडेसे कठोरपण नाही घेतले, थोडेसे बंध नाही ढिले केले, त्यांच्यावर विश्वास नाही टाकला, त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी नाही साथ दिली, तर त्यांचे पुढील भविष्य कसे उभारेल? ते मोठे कसे होतील? आपल्या आयुष्यात उंची कशी गाठतील? आणि भविष्यात नावारूपाला कसे येतील?
त्यांच्या मनातील अशाप्रकारची घालमेल पाहताना व याचेच निरुपण करताना दुस-या दिवशीच्या त्यांच्याबरोबरच्या चहापान करण्याच्या दरम्यान त्यांना हेच समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करीत होतो. काही जणांना वाटत होते की त्यांचा बॉन्डचा कालावधी संपला की त्यांना पुण्याला (कारण मुंबईला त्यांच्या कंपनीची ऑफिसेस नसल्यामुळे) ट्रान्स्फर नाही मिळाली तर ते ही कंपनी सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेणार होते. त्यावेळेस हे ऐकून मला मनस्वी दु:ख झाले, त्याला कारणेही अनेक होती, आणि तीच त्यांना समजावून सांगण्याचा मी तेव्हा प्रयत्न देखील केला, त्यातीलच काही मुद्दे येथे मांडीत आहे –
पहिल्या प्रथम त्यांचे व त्यांच्या आई-वडिलांचे आभार मानले ते ह्यासाठी की अगोदरच म्हटल्याप्रमाणे या सगळ्यांनी आप-आपल्या मुलांच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो किती धाडसाचा आणि योग्य होता. दुसरे असे की हे जरी खरे असले तरी आज माझ्यासमोर असणा-या या मुलांनी देखील आपल्या माता-पित्यांसारखे धैर्य दाखवून ह्या कंपनीची ऑफर स्वीकारली, हे देखील वाखाणण्या जोगेच नव्हे काय?
आज तसे पाहिले तर आय.टी. क्षेत्रामध्ये ज्या नाव घेण्यासारख्या कंपन्या आहेत त्यातील ब-याच वर असणारी, त्यांची निवड झालेली, अशी ही एक कंपनी आहे – इन्फोसिस. जागतिक स्तरावरील आई.बी.एम., अॅपल सारख्या कंपन्यांबरोबरच स्पर्धेत असणारी भारतातील क्रमांक दोनची ही कंपनी, आज विशेषत्वाने कशासाठी जर प्रसिद्ध आहे तर ती तिच्या कार्यालयीन संस्कृतीमुळे. श्रीयुत नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सौ. सुधा मूर्ती यांच्या संयुक्त कल्पनेतून साकारलेली, आणि आपल्या पुण्यातच मुहूर्तमेढ रोवलेली, आपल्याबरोबर असणा-या आपल्या कामगारांचा कुटुंब म्हणून स्वीकार करणारी, त्यांच्या हिताचे निर्णय घेणारी, त्यांना आपल्या फायद्यात सामावून घेणारी अशी ही कंपनी मिळणे हे ही आपण आपले भाग्य का समजू नये?
Leave a Reply