कंपनीची बहुतेक कार्यालये ही जरी शहरांपासून लांब असलीत तरी अतिप्रशस्त अशा जागांवर, निसर्गाच्या कुशीत प्रस्थापित केलेली असून आजूबाजूला हेतुत: निसर्ग जपून आपला कामगार अशा हिरव्यागार वातावरणामुळे सदैव टवटवीत राहिल ह्याचीही खबरदारी कंपनीने घेतलेली दिसून येते. नुसते वातावरणच जपलेले नसून, कामगारांच्या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवून, तेथें प्रत्येक गोष्ट त्यांना उपलब्ध होईल हे देखील कंपनीने पाहिलेले आहे. त्यामुळे झाले काय की एकदा का आपण कॅम्पसमध्ये पदार्पण केले की सगळ्या गोष्टी तेथें उपलब्ध असल्यामुळे कशाचीही उणीव भासत नाही व त्यामुळे सर्वस्वांचा विसर पडून आपण आपले काम जोमाने करू शकतो. हो, नाही म्हणायला उणीव भासते ती आपल्या घरच्यांची. ठीक आहे, हे जरी खरे असले, तरी आज माणसाला जी किंमत आहे ती त्याच्या आर्थिक सबलतेमुळे आणि त्याच्या समाजातील असणा-या स्थानामुळे, ह्या दोन्ही गोष्टींची येथे काळजी घेण्यात आलेली असल्यामुळे, आपण आपल्या नातलगांचा केलेला व त्यांनी आपला केलेला त्याग हा त्यामानाने फारच कमी पडावा. कारण, आज आपण आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थीदशेतून नुकतेच कुठे बाहेर पडलो आहोत आणि इथे तिथे न भटकता सरळ योग्य ठिकाणी आणि योग्य मार्गावर आहोत, हे ही नसे थोडके.
आपल्या सारख्यांचे, वय-वर्षे २५ ते ४५ दरम्यानच जी काही प्रगती होईल त्यावरच संपूर्ण आयुष्य अवलंबून असेल हे ध्यानात घ्यावयास हवे. आणि येथे तर काही जण वयाच्या २३व्या वर्षांपासूनच इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये दाखल झालेले. ना नोकरी शोधण्याची दगदग, ना धडफड. फक्त आपण साध्य केलेल्या साध्यावर लक्ष केंद्रित करून आपण आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहणे महत्वाचे. अशावेळी जर का आपल्यासारख्यानी आपला ह्या कंपनीमध्ये येण्याचा उद्देश्य सफल झाल्यामुळे येथेच आपली प्रगती साधण्याचा निर्णय घेतल्यास योग्यच नाही का होणार? मग त्यासाठी आपणाला आपल्या घरापासून, आपल्या नातलगांपासून लांब रहावे लागले तरी बेहत्तर असे का बरे समजू नये? असे जर का आपण ठरवून आपला निर्णय घेतलात तर मला वाटते येत्या पांच वर्षात आपण आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये, कंपनीमध्ये स्थिर होऊन एका विशिष्ट उंचीवर आलेले असाल आणि आज जी तुमच्या जीवाची घुसमट, घालमेल होतेय की मला माझे आई-बाबा मिळत नाहीत, माझे घर मिळत नाही, माझी भावंडे मिळत नाहीत, ती आपोआप दूर होईल. कशी दूर होईल? तर आपण आजपासून पांच वर्षांनी आजच्या पेक्षा आणखी जास्त पगार मिळवत असाल, आपली खर्चाची बाजू आजच्यापेक्षा थोडी जास्त असेल, परंतु आजच्या मानाने कमीच असेल, म्हणजेच आपली बचतीची बाजू आजच्यापेक्षा नक्कीच सुधारलेली असेल. बचत वाढल्यामुळे व पगारही जास्त असल्यामुळे, आपण आपल्या आई-बाबांना किंवा माता-पित्यांना, भाऊ-बंदाना तुम्ही जेथे असाल तेथें कधीही बोलावू शकाल, तुम्हाला आठवण झाल्यास तुम्ही रजा काढून स्वत: आपल्या माता-पित्यांना भेण्यासाठी कधीही आप-आपल्या घरी जावू शकाल आणि हे सर्व शक्य होईल जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल. मग मला सांगा हे बरे की आपण आपल्या माणसात राहून आपली प्रगती न होणे हे बरे?
असे म्हणण्याचे कारण इतकेच की, आज आपण पाहतो की विशेषकरून आपल्या मुंबईमध्ये दूरदूरवरचे, परक्या मुलुखातले लोक येऊन स्थिर झालेले आहेत. इतकेच नव्हे तर ते जीवनात यशस्वीही झालेले आहेत, नावारूपाला आलेले आहेत. त्यांनी आपली कर्मभूमी म्हणून मुंबईचा स्वीकार केलेला आहे. उदा. अमिताभ बच्चन. ते ही आपल्या आई-वडिलांपासून, नातलगांपासून, भाऊ-बंदांपासून आपल्या घरादारापासून खूप दूरवर आलेले आहेत, परंतु आज ते जीवनात सगळ्या गोष्टीनी जसे, आर्थिक, व्यावसायिक वगैरे यशस्वी असल्यामुळे हवे तेव्हा, हवे तेवढयावेळा आपल्या घरी-दारी, आपल्या मुला-माणसात जावू-येऊ शकतात. त्यांना कशाचेही बंधन नाही. कारण आज असलेली त्यांची आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक, मानसिक परिस्थिती आणि ही परिस्थिती त्यांना कशामुळे प्राप्त झाली? तर त्यांच्या आर्थिक, मानसिक, व्यावसायिक सबलतेमुळे. एवढेच नव्हे तर त्यांनी ह्या जोरावर जागोजागी आपली घरे-दारे निर्माण करून ठेवलेली आहेत. आज त्यांना कशाचीही ददात वाटत नाही, पडत नाही. त्यांना आज कशाचीही खंत नाही किंवा काही घालविल्याचे, हरविल्याचे दु:ख नाही. तसे पाहिले तर सुरुवातीच्या काळात जें काही त्यांनी घालविले, हरविले, ते त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर पुन्हा मिळविले आणि आज ते एक यशस्वी, आनंदी, सुखी व्यक्तिमत्व म्हणून आपले जीवन सुखात जगताहेत. त्यांनी जर तशी खटपट, धडफड त्यांच्या सुरुवातीच्या काळात केली नसती, त्यांनी जर घराबाहेर पडण्याची जोखीम उचलली नसती तर त्यांना हे आज शक्य झाले असते काय? तर ह्याचे उत्तर आपणास नकारार्थीच मिळेल. मी जें काही निरुपण वर दिलेले आहे ते मुंबईमध्ये भरभराटीला आलेल्या बॉलिवूड – चित्रपट व्यवसायाला आणि त्यामध्ये असणा-या व्यावसायिकांना विशेषकरून लागू पडते. त्याकाळी आणि आजही मुंबई ही चित्रपट उद्योगाची पंढरी आहे. त्यामुळे आजही आपण पाहू शकतो की ह्या क्षेत्रामध्ये नाव कमविण्यासाठी बाहेरून लोकं येतच असतात, आपले नशीब अजमाविण्याचे प्रयत्न करीतच असतात.
Leave a Reply