दिवस पहिला आणि दुसरा
माझा ज्येष्ठ चिरंजीव अतुलच्या निमित्ताने ब-याच वर्षांनी मुंबईबाहेर आणि पर्यायाने महाराष्ट्राबाहेर जाण्याचा योग आला, त्यामुळे ब-याच नव-नवीन गोष्टीना व अनुभवांना सामोरे जाता आले.
माझ्याबरोबर माझा भाचा सूर्यकांत होता. छत्रपती शिवाजी टर्मीनसवरून दुपारी २.०० ची सी.एस.टी.-चेन्नई ट्रेन सुटली आणि त्याच क्षणापासून चेन्नई भेटीचे वेध सुरु झाले. ह्यापूर्वी पूर्वाश्रमीचे मद्रास आणि आताच्या तामिळनाडूबद्दल बरेच काही ऐकून होतो, त्यामुळे माझा चिरंजीव तेथे कसा राहत असेल आणि आता मी चाललो आहे तो तेथे कसा काय राहणार, ह्याबद्दल मनात जरा धाक-धुकच होती. परंतु माझा चिरंजीव सध्या राहत असलेल्या रूमवर राहावयाचे असल्याने रूमची शोधा-शोध मात्र करावी लागणार नव्हती.
माझा हा चेन्नई प्रवास साधारणपणे २७ तासांचा होता व गेली कित्येक वर्षे मी इतक्या लांबवरचा प्रवास केलेला नसल्यामुळे हे २७ तास कसे पार पडणार याबद्दल शंकाच होती. त्यात हा दक्षिणेकडचा प्रदेश अगोदरच मिळालेल्या ब-या-वाईट अशा ब-याच मत-मतांतरांमुळे मनात उगीचच घर करून बसलेला. परंतु चिरंजीवांना भेटण्याच्या निमित्ताने व आनंदात नवीन प्रदेश पहावयास मिळणार असल्यामुळे दुःखापेक्षा सुखच अधिक वाटत होते.
दुपारी ट्रेन सुटल्यानंतर रात्र होईपर्यंत भाच्याबरोबर इकडच्या-तिकडच्या गप्पा मारीत मारीत वेळ कसा निघून गेला हे कळलेच नाही. साधारणपणे ७.३० नंतर दौंड स्टेशन गेल्यानंतर काही पोलीस गाडीत आले व त्यांनी प्रत्येकाला आप-आपल्या बाजूला असणा-या खिडक्यांची बाहेरील बाजूस असणारी लोखंडी तावदाने बंद करून घेण्याचा सल्ला दिला. चौकशी करता असे समजले की मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून काही विघ्नसंतोषी समाजविघातक प्रवृत्तीचे लोक म्हणे गाडीवर दगडफेक करतात.
सूचना मिळताच सगळ्यांनी आपापली तावदाने भराभरा खाली ओढून घेतली. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की मी जेथे बसलो होतो त्याच्या डाव्या हाताकडील ते लोखंडी तावदान काही केल्या बंद होत नव्हते. माझा जीव टांगणीला लागला होता. मनात वाटत होते की जर हे तावदान बंद झालेच नाही तर? आणि खरोखरच जर का दगडफेक झाली तर मग पुढे काय? ह्या भीतीने मी अर्धमेला झालो होतो, भाचाही धास्तावला होता. काय करावे काही सुचत नव्हते. त्या खिडकीवरील प्रवाशास तावदान बंद करण्यासाठी मदत करावी म्हणून उठलो खरा, परंतु कसले काय आणि कसले काय माझा प्रयत्नही थिटा पडला आणि ते तावदान काही बंद झाले नाही. मनात पुन्हा एकदा भीतीची पाल चुकचुकली. आता करायचे काय? हा विचार करीतच होतो तेवढ्यात त्या प्रवाशाचा मित्र जो बाजूला बसला होता तो उठून तेथे आला आणि त्याने ते तावदान बंद करण्याच्या प्रयत्नास सुरुवात केली. बरीच झटापट केल्यानंतर त्यात त्याला यश आले आणि एकदाची ती खिडकी बंद झाली. तोपर्यंत त्या कम्पार्टमेंटमधील सगळ्या खिडक्या बंद झाल्या होत्या. डाव्या हाताकडील ती सगळ्यांना कसरत करायला लावणारी खिडकी देखील बंद झाल्यामुळे जीवात जीव आला आणि निवांत झालो. एक सुटकेचा नि:श्वास टाकला आणि मनातल्या मनात भगवंताचे आभार मानीत पुढील प्रवासास सिद्ध झालो.
Leave a Reply