माझ्या चारोळ्या …
उगाच समजू नका
मी प्रेमवेडा आहे
प्रेम कशाशी खातात
मला ठाऊक आहे …
प्रत्येक वर्षी संकल्प करतो
फक्त तिच्याच प्रेमात पडण्याचा
वर्ष संपता संकल्प असतो
ती सोडून प्रेमात पडण्याचा…
तुझ्या प्रेमात पडल्यापासून
माझा शीघ्रकवी झाला
फेसबुकवर माझ्या कवितांचा
पाऊस सुरु झाला…
आजही तुझी आठवण येता
मला स्वतः वर हसू येते
पण स्वतःवर हसत असताना
मला तुझी आठवण येते…
प्रेमभंग झालेल्या कित्येकांचा
बऱ्याचदा देवदास होतो
पण दारूला नाकारणाऱ्याचा
फक्त कवी होतो…
मी तिच्यावर प्रेम केले
तिने माझ्या कवितेवर केले
माझ्या कविता कामी आल्या
पण प्रेम वाया गेले…
कविता फक्त तुझ्यावर लिहिली
बाकीच्यांची तर कथा झाली
लेखांची तर तऱ्हाच निराळी
माझ्या प्रेमाची निबंधे झाली…
कविता कवी लिहतो
कविता कवी वाचतो
कविता कवी ऐकतो
कविता कवी जगतो..
त्या कित्येकींच्या आनंदासाठी
ती दुःखी राहिली
त्या चारोळ्याच राहिल्या
तिची कविता झाली…
तुझ्यासाठी वाया घालविलेले
दिवस आता कामी आले
त्या दिवसांतील प्रत्येक तासाचे
आता कवितेतील शब्द झाले…
नैतिकतेच्या सीमा ओलांडून कधीच
शिरलो असतो तुझ्या मिठीत
पण संस्कार आणि विचार
ठासून भरलेत माझ्या कुडीत…
माझ्यावर प्रेम करणारे
हजार खरे आहेत
तुझ्यावर प्रेम करणारे
सारे लबाड आहेत…
माझी वेदना आता
माझीच झाली आहे
माझ्या वेदनेची आता
कविता झाली आहे…
आदर्शांचे स्मारक असावे
पण प्रत्येकाच्या हृदयात
नाहीतर त्याच्या विचारांचे
स्मारक होते चौकात…
आदर्शांना आदर्श मानत
लहानाचा मोठा झालो
मोठा झाल्यावर मी
आदर्शांचा आदर्श झालो …
नैतिकता आणि अनैतिकता यामध्ये
अस्पष्ट रेषा असते
त्या रेषेचे नाव
दुर्दैवाने हल्ली प्रेम असते…
© निलेश बामणे
Leave a Reply