मिर्झा गालिब हे सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नी मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. मा.गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.
गालिब यांच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिब यांनी परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते.
गालिब यांच्या च्या कवितांचा परिचय सेतू माधव पगडी, वसंत पोतदार आणि विद्याधर गोखले आदी मराठी लेखकांनी करून दिला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी तर ’गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ हा ग्रंथ लिहिला असून रसिकांना शब्दागणिक तो समजावा म्हणून गालिब यांच्या कवितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ देऊन त्यांनी गालिब जाणत्या वाचकांपर्यंत पोचविण्याची अपूर्व धडपड केली आहे. मा.मिर्झा गालिब आणि मा. गुलजार यांचं एक अनोखं नातं आहे. गालिबचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे. गालिबच्या जगण्याचा श्वास त्याची शायरी होती. त्याचा मनोज्ञ वेध गुलजारांनी या चरित्रात घेतला आहे. त्याचा मराठी अनुवाद अंबरीश मिश्र केला आहे.
मिर्झा गालीब यांचे १५ फेब्रुवारी १८६९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकीपिडीया
Leave a Reply