एटीएम मशीनमधून हवी तेव्हा आणि हवी तिथे रोख रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली. याच धर्तीवर अनेक ठिकाणी विविध प्रकारची व्हेंडिग मशीन्सही आढळून येतात. अशा परिस्थितीत प्रत्येक घराची मुलभूत गरज असलेले दूध हवे तेव्हा का मिळू नये असा प्रश्न समोर येतो. कॉर्पोरेटजगतातील नवतेचे अनुकरण करत दुग्ध व्यवसायानेही अलीकडेच कूस पालटत एटीएम तंत्राचा अंगीकार केला आहे. या तंत्राचा खास वेध.काही वर्षांपूर्वी आपल्याला बँकेत न जाता पैसे काढता येतील असे कुणी सांगितले असते तर त्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. परंतु तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीचा प्रभाव बँकिग क्षेत्रावरही दिसून आला आणि ‘एटीएम’ची (ऑटोमेटेड टेलर मशीन) संकल्पना अस्तित्वात आली. साधारणत: खेळण्याच्या पत्त्यांच्या आकाराचे प्लॅस्टिकचे एक कार्ड या मशीनमध्ये घालून ठराविक क्रमांक दाबला की आपल्याला बँकेतील खात्यातून हवी तेव्हा रक्कम काढता येऊ शकते. ही संकल्पना प्रचंड लोकप्रिय झाली आणि हल्ली बँकेच्या शाखेत जाऊन पैसे काढणे मागासलेपणाचे लक्षण मानले जाते. याच धर्तीवर काही ठिकाणी सुटे पैसे देणारे मशीन बसवण्यात आले. या मशीनमध्ये नोट टाकल्यानंतर त्याच किमतीचे सुटे पैसे बाहेर येतात. एड्सबद्दल जनजागृती करताना कॉन्डोमचा वापर करावा असे सांगितले जाते. अनेकांना सर्वांसमोर औषध विक्रेत्यांकडून कॉन्डोम मागण्यास लाज वाटते म्हणून कॉन्डोम देणारे मशीनही तयार करण्यात आले. परदेशात डॉलरची नोट टाकल्यावर तेथील स्थानिक चलन देणारी मशीन्स विमानतळासारख्या ठिकाणी बसवलेली आढळतात. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या कृषीप्रधान देशात दूध विकत घेण्यासाठी रांगा लावाव्या लागणे हे विरोधाभासी चित्र दिसून येते. अगदी चहा-कॉफीचीही व्हेंडिग मशीन्स उपलब्ध असताना दुधाचे व्हेंडिग मशीन का नसावे असा प्रश्न अनेकांच्या म
त येऊ शकेल. असाच विचार करून अकलूज येथील शिवामृत दूध संघाने स्वयंचलित यंत्राद्वारे दुधाचे वितरण करण्याची संकल्पना प्रत्यक्ष राबवली.महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारे राज्य म्हणून ओळखले जाते.
पूर्वी प्रत्येक
शेतकर्याकडे छोट्या-मोठ्या प्रमाणात दुभती जनावरे असत. आजही हे चित्र मोठ्या प्रमाणात दिसते. सहकाराने या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सहकारी तत्त्वावरील दूध संस्था उभारण्यात आल्या. त्यातून दुधाचे संकलन आणि वितरण ही प्रक्रिया अधिक व्यापक प्रमाणात राबवली जाऊ लागली. शिवाय काळाची गरज ओळखून या व्यवसायाने काही महत्त्वपूर्ण पावलेही टाकली.आपल्याला हव्या त्या प्रमाणात दूध उपलब्ध व्हावे म्हणून वेगवेगळ्या आकारात पॅकिंग करून विक्री सुरू झाली. अशी विक्री विविध दुकानांमधून होऊ लागल्याने ग्राहकांची चांगली सोय झाली. असे असले तरी यापुढचा टप्पा गाठणेही महत्त्वाचे होते. शिवाय विविध ठिकाणी पिशवीतून दूध उपलब्ध होत असले तरी त्याचा कालावधी तसा मर्यादित असतो. ही त्रुटी लक्षात घेऊन ग्राहकांना 24 तास सकस आणि ताजे दूध उपलब्ध होणे ही गरज प्रकर्षाने पुढे आली. विशेषत: दवाखान्यातील रुग्ण, लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांना दुधाची कधीही आवश्यकता भासते. त्यांना त्या-त्या वेळी ताजे दूध उपलब्ध होणे गरजेचे ठरते. हे लक्षात घेऊन दुधाचे स्वयंचलित यंत्राद्वारे वितरण करण्याची संकल्पना पुढे आली. शिवामृत दूध संघाने युएसटी या तंत्रज्ञानाच्या आधारे दुधाचे स्वयंचलित यंत्र तयार करून वितरणाचा प्रयोगही यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे युएसटी तंत्रज्ञानामुळे या यंत्रातून मिळालेले दूध उकळण्याची गरज नसते. शिवाय या यंत्रात वेगवेगळ्या आकारातील पॅकिंगनुसार दूध ठेवले जाते. त्यामुळे आपल्याला हव्या त्या प्रमाणात त्याची खरेदी करणेही शक्य होते.
>एटीएमसारखे असलेले हे स्वयंचलित मशीन 24 तास सुरू ठेवणे शक्य आहे. त्यामुळे आता ग्राहकांना पाहिजे तेव्हा दुधाची खरेदी करता येईल. यातील दूध पॅकिंग केलेल्या तारखेपासून 30 दिवसांपर्यंत चांगले राहते. याचाही ग्राहकांना चांगला लाभ घेता येईल. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या यंत्राद्वारे दूध विक्रीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सुरूवातीला अनेकांनी कुतुहल म्हणून याकडे पाहिले. नंतर ते प्रत्यक्ष खरेदीचा आनंद घेऊ लागले. गुजरातमध्ये अशी काही यंत्रे बसवण्यात आली आहेत. पण, त्या यंत्राला सतत वीजपुरवठा करावा लागतो. दिल्लीतील मदर डेअरी या संस्थेनेही असे प्रयोग केले होते. त्यांनी तयार केलेल्या यंत्रात ग्राहकांनी पैसे टाकायचे आणि आपल्याजवळील भांड्यात दूध घ्यायचे अशी ही पद्धत होती. मात्र, ग्राहकांनी दूध खरेदी केल्यावर नलिकेत काही दूध शिल्लक रहायचे. दोन ग्राहकांमध्ये बऱ्याच तासांचा कालावधी लोटला तर नळीतील दूध खराब होत असे. या त्रुटी लक्षात घेऊन या नवीन यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. सुरूवातीला राज्यातील एक लाख लोकवस्ती असलेल्या ठिकाणी अशी यंत्रे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना अशी यंत्रे चालवण्यास देण्याचाही मनोदय आहे. दूध सहज उपलब्ध करून देणार्या एका यंत्राची किंमत केवळ दोन लाख दहा हजार रुपये असून याला 24 तासात फक्त दोन युनिट वीज लागते. विशेष म्हणजे या यंत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या 32 वस्तू ठेवण्याची सुविधा आहे. त्यामुळे या यंत्राद्वारे दुधाबरोबरच अन्य दुग्धजन्य उत्पादने, चॉकलेट, बिस्कीट आदींचीही खरेदी करता येईल. यातील दूध अधिक काळ टिकत असल्यामुळे सतत बदलावे लागत नाही. परिणामी, दुधाच्या वाहतूकदरात बरीच कपात होते. त्याचाही आर्थिक फायदा संबंधित संस्थांना होणार आहे. ग्राहकांनी रक्कम टाकून दुधाची ख
रेदी केल्यानंतर काही रक्कम शिल्लक रहात असेल तर ती परत मिळण्याचीही सुविधा या यंत्रात आहे. शिवाय हे यंत्र बनावट नोटा स्वीकारत नाही. अशा या बहुगुणी आणि बहुपयोगी दूधवितरण व्यवस्थेमुळे ग्राहकांसाठी चांगला पर्याय निर्माण झाला आहे. शिवाय कृषीक्षेत्रातील महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणूनही याकडे पहायला हवे. गेल्या काही दिवसांमध्ये दुधामधील भेसळीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. रात्री उशिरा दूध डेअरीमधून दुधाचे टँकर बाहेर पडल्यानंतर पहाटे त्यांचे वितरण होण्यापूर्वी अनेक प्रकारची भेसळ केली
जाते. अशा प्रकारची भेसळ या यंत्रामुळे टाळता येईल. विशेष म्हणजे डेअरी आणि
ग्राहक यांच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा मध्यस्थ नसल्यामुळे ‘डायरेक्ट टू कस्टमर’ पद्धतीतून या दुधाचे वितरण होईल.(अधिक माहितीसाठी संपर्क : 9922934040)
— ओंकार काळे
Leave a Reply