नवीन लेखन...

मी, एक पुतळा

नमस्कार. मी या शहरातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यांनी घेरलेल्या प्रमुख चौकातील एक पुतळा. जिवंत असताना या देशातील जनतेच्या म्हणण्यानुसार मी खरंच महापुरुष होतो की नाही हे मला माहित नाही, पण आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दीनदुबळ्यांना त्यांच्या अमानवीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो. या कामाचा अवाका इतका मोठा होता की, मी जिवंत असेपर्यंत हे काम संपू शकण्यासारखं नव्हतं. माझ्या मृत्यूनंतर अनेकांना ‘महापुरुष’ होण्याची घाई झाल्यामुळे माझ्या जिवंत विचारांऐवजी माझे निश्चल पुतळे जागोजागी उभारणेच त्यांना जास्त सोईस्कर वाटले. माझ्या विचारांशी असलेल्या तथाकथित बांधिलकीची मोठ्या प्रमाणात जाहिरात करून अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या नावांनी राजकारणाची दुकानं थाटली. अनेक दुकानं म्हणजे जीवघेणी स्पर्धा आलीच व जीवघेणी स्पर्धा म्हणजे एकमेकाचे गळे कापणं हेही ओघाने आलंच!

माझ्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अनेक वर्षांमध्ये इकडे एकदाही फिरकण्याची इच्छा न झालेले एक नेताजी अपरात्री माझ्या दिशेने येताना दिसले आणि त्यांची माझ्यावरील निष्ठा बघून मला अक्षरश: गहिवरून आले. पण ते माझ्याजवळ पोहोचताच ती ‘निष्ठा’ नसून ‘विष्ठा’ आहे हे बघून मी हादरून गेलो. माझ्या काही लक्षात येण्याच्या आतच नेताजींनी त्यांच्या हातातील विष्ठेने माझा चेहरा माखून टाकला व क्षणार्धात ते अंधारात दिसेनासे झाले. पहाटे तरतरीत चेहऱ्याने मॉर्निंग वॉकला निघालेले ‘तेच’ नेताजी माझ्या पुतळ्याची अवस्था बघून प्रचंड संतापले आणि बघता बघता त्यांच्या कार्यकर्त्यांचा जमाव माझ्याभोवती जमला. माझ्या विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या दुसऱ्या एका नेत्याचे हे दुष्कृत्य आहे अशी बातमी अगदी सुनियोजितपणे पूर्ण शहरात पसरविण्यात आली व अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणारी दंगल पद्धतशीरपणे भडकवून मला विष्ठा फासणारे नेताजी अतीव समाधानाने त्यांच्या आलिशान बंगल्याच्या हिरवळीवर महागड्या व्हिस्कीचे घुटके घेत पुढील राजकीय डावपेचांची आखणी करण्यात गर्क झाले!

माझ्या पुतळ्यावरून झालेली पहिलीच दंगल ही परकीयांसाठी एक सुवर्णसंधी ठरली. अनेकांचे नाहक जीव घेणारी व असंख्यांचे संसार एका दिवसात उद्ध्वस्त करणारी ती दंगल शांत झाल्यानंतर एक दिवस माझी नजर माझ्या चौथऱ्याकडे गेली तर मध्यरात्री तिथे दोन परदेशी नागरिक गंभीर चर्चा करीत बसले होते. त्यांच्या हातात आपल्या देशातील पुतळ्यांच्या लांबलचक याद्या होत्या. पुतळ्यांच्या नावांसमोर त्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांचा तपशील लिहिला होता. कोणत्या पुतळ्याला केव्हा मानवीय विष्ठा, शेण किवा डांबर फासायचे, कोणत्या पुतळ्यांच्या गळ्यात चपला व जोड्यांचे हार घालायचे याची योजना तयार करण्यात ते गर्क झाले होते. चर्चेच्या शेवटी एक दुसऱ्याला अत्यानंदाने म्हणाला, ”या पुतळ्यांमुळे आपलं काम किती सोपं झालं. स्वार्थाच्या पोळ्या शेकण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांचा वापर अत्यंत निर्लज्जपणे जोपर्यंत होत राहील तोपर्यंत या देशात मनसोत्त* धुमाकूळ घालण्यास आपल्याला भरपूर संधी उपलब्ध आहे!”

परकीयांनी आमच्या वागण्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे म्हणूनच अगदी क्षुल्लक कारणावरून ते आमच्या देशात मोठ्या दंगली भडकवू शकतात. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ न निष्पाप नागरिकांना भडकवणारे स्थानिक नेते हे तर त्यांचे बिनीचे सरदारच! मी अंतर्मुख झालो असतानाच जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा पळणाऱ्यांना बघून आश्चर्यचकित झालो. एका नेत्याचे पोस्टर दुसऱ्या नेत्याने फ ाडल्यामुळे शहरात प्रचंड दंगल उसळली होती. त्या गदारोळात ते दोन परकीय नागरिक अचानक माझ्या दृष्टीस पडले. विलक्षण आनंदाने एक दुसऱ्याला टाळी देत म्हणाला, ”काल पुतळा, तर आज पोस्टर, तर उद्या आणखी काही. या देशात वर्षानुवर्षे हे असंच चालत राहणार!”

— श्रीकांत पोहनकर, पुणे

98226 98100

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..