नवीन लेखन...

मी’ व ‘माझी प्रतिमा’



बालपणापासूनच नव्हे, तर तान्हेपणापासून आपल्याला आपले आई-वडील, आप्तेष्ट मंडळी- ‘आपण कसे असावे’ याबाबत काही ना काही सुचवत असतात, सांगत असतात. लहानपणी आपल्या भोळेपणाचे, साधेपणाचे, वेंधळेपणाचेदेखील गुणगान सुरू राहते. एकंदरित, आपण कुठल्या ना कुठल्या किंवा अनेक बाबतीत श्रेष्ठ आहोत, असे बहुतांश मुलांच्या मनावर बालपणापासूनच रुजवले जाते. पुढे स्वत:ला कळायला लागल्यावर आणि ‘अहम्’ची जाणीव फुलल्यानंतर तर स्वत:चे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व प्रत्येकाच्या मनात खोलवर बिबते. संस्कारक्षम वय संपेपर्यंत प्रत्येकाची ‘आपण कसेही असलो तरी खूप चांगले आहोत,’ अशी खात्री पटलेली असते. (चांगले म्हणजे कसे, हे अर्थातच प्रत्येकजण आपापल्या मर्जीनेच ठरवतो.) या वयापर्यंत प्रत्येकाने आपल्या मनात तयार केलेल्या स्वत:च्या आदर्शांच्या जवळपास पोहोचण्याची धडपडही सुरू केलेली असते.

तथापि श्रेष्ठत्व, अलगत्व, चांगुलपणा आणि आदर्शांनी भारलेल्या स्वत:च्या काल्पनिक आदर्श व्यक्तिमत्त्वास वास्तवात उतरवणे अत्यंत अवघड व दुर्गम असते. प्रत्यक्षात दुर्गुण मानल्या जाणार्‍या सर्व वासना व स्वार्थ मात्र निसर्गदत्त असल्यामुळे खचितच प्रत्येक व्यक्तीत असतातच. त्यामुळे जडणघडण होत असल्यापासूनच प्रत्येकाचे स्वत:चे प्रत्यक्ष रूप आणि आदर्श (काल्पनिक) रूप यांच्यात प्रचंड तफावत निर्माण होऊ लागते. ‘मी’चा अर्थ उमगू लागेपर्यंत प्रत्येकजण स्वत:च्या आदर्श रूपाच्या इतक्या प्रेमात पडलेला असतो, आणि प्रत्येकाच्या मनावर स्वत:चे आदर्श रूप इतके खोलवर बिबलेले असते, की ते ‘आदर्श’ रूप म्हणजेच ‘मी’- असे त्याला वाटू लागते. इतकेच नव्हे, तर जगानेदेखील आपल्याला ते ‘आदर्श’ रूपच मानावे, यासाठी तो धडपड करू लागतो.

थोडक्यात- कळत्या वयात आल्यावर प्रत्येकजण जगासमोर आपापल्या आदर्शांनुसार स्वत:ची प्रतिमा उभी करतो आणि कुणाचेही आपल्याकडे लक्ष असल्याचे जाणवले, की लक्ष देणयार्‍यावर आपली ती प्रतिमा ठसावी असा आटोकाट प्रयत्न

करू लागतो.

एकंदरित- स्वत:ला चांगले (आदर्श) मानण्याच्या प्रक्रियेत प्रत्येकजण

स्वत:च्या प्रतिमेलाच खरे मानू लागतो व आपण खरोखरचे कसे आहोत, याकडे पूर्ण दुर्लक्ष होते. या प्रक्रियेत आपल्या प्रतिमेची इतकी सवय होऊन जाते, की वास्तवातल्या स्वत:ला जगच नव्हे, तर तो स्वत:ही पाहू शकत नाही. एखाद्याला अपघाताने, चुकून कधी स्वत:चे खरे दर्शन घडलेच, तरी तो ‘तो मी नव्हेच’ म्हणत विश्वामित्री पवित्रा घेतो. उदा. एखाद्याला नशिबाने काही काळ लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली व नंतर उर्वरित आयुष्यभर कमी पगाराच्याच नोकर्‍या मिळाल्या, तर आपली पात्रताच कदाचित कमी पगाराची असावी, हे मान्य करणे तर सोडाच, तसा विचारही त्याच्या मनाला शिवू शकत नाही.

प्रदीर्घ काळ लठ्ठ मिळकत व यशस्वी असणाऱ्यांबद्दल तर काय सांगावे? त्यांना तर ती मिळकत, यश हे आपल्या खर्‍या कुवतीचे, खर्‍या चेहर्‍याचे भक्कम पुरावेच वाटतात. उच्चपदस्थ, यशस्वी व्यक्तींना त्यांच्या चलतीच्या काळात मिळालेले सत्कार, लोकांनी दाखवलेली आपुलकी, वलयांकितांच्या लाभलेल्या ओळखी, सुंदर व्यक्तींनी, भिन्नलिगीयांनी, चाहत्यांनी त्याच्यावर वाहिलेली स्तुतिसुमने या बाबी आपल्याला आपल्या चांगुलपणामुळेच मिळत आहेत, असे मनोमन वाटत असते. आपले पद, यश, सौंदर्य हे फार फार तर आपले ‘प्रोफाईल’ आहे, आपला खरा व पूर्ण चेहरा नव्हे, हे त्यांना उमगत नाही. उदा. एखादी व्यक्ती श्रेष्ठ गायक असेल तर ती व्यक्ती ‘माझे फक्त गायन चांगले आहे, बाकी स्वभावाने किवा माणूस म्हणून मी क्षुद्र आहे,’ असे जगाला सांगत नाही व तिला स्वत:लाही तसे वाटत नाही. ज्या बाबतीत आपण यशस्वी आहोत, तेवढ्याच भागाची व तीच आपली ओळख प्रत्येकजण जगाला करून देत असतो आणि तशी ओळख करून देताना त्या ओळखीच्या पुढे ‘…आणि मी अतिशय चांगला माणूस आहे,’ हे वाक्य अध्याहृत असते. प्रत्येक आत्मचरित्रात लेखकाची स्वत:ची यशोगाथा व इतरांचे आलेले वाईट अनुभव यांचेच कथन असते. त्या लेखकाच्या स्वत:च्या वाईट वर्तनाबद्दल मात्र दुसर्‍या लेखकाच्या आत्मचरित्रात उल्लेख असतो. पण त्या दुसऱ्या आत्मचरित्रातही पुन्हा त्या लेखकाच्या स्वत:च्या वाईट वर्तनाचा उल्लेख नसतोच. त्यात पुन्हा त्याची यशोगाथाच असते. असे हे चक्र !

स्वत:च्या चेहर्‍याला- प्रोफाइलला- ‘मेकअप्’ करण्यासाठी जी विविध प्रसाधने (कॉस्मॅटिक्स) वापरली जातात, त्यात सर्वात महत्त्वाचे आणि सार्वत्तिक वापरात असलेले प्रसाधन म्हणजे ‘तात्त्विक (लॉजिकल) समर्थन’ हेच आहे. शारीर चेहर्‍यावरील खड्डे व मुरुमांसाठी जसे ‘फाऊंडेशन’ वापरले जाते, तसेच व्यक्तिमत्त्वाच्या चेहर्‍यावरील गैरकृत्यांना, अनैतिक वर्तनाला तात्त्विक (लॉजिकल) समर्थनांचा लेप प्रत्येकजण लावत असतो. भावनात्मक दुखापत, अपमान वगैरेंचा सूड किवा व्यावहारिक चतुराई इत्यादी समर्थने आपल्या गैरकृत्यांसाठी प्रत्येकजण अत्यंत सहजगत्या देतो. ‘सगळेच पैसे खातात! आपण न खाल्ल्याने काय होणारेय?’, ‘आपण चांगल्यापाशी चांगले आणि वाईटाशी वाईट आहोत, काय ?’, ‘वेळ-प्रसंग पाहून कधी कधी खोटं बोलणं अपरिहार्य असतं, बाबा अशा तर्‍हेची वाक्ये फेकून मल्लिनाथी करत, विजयी मुद्रेने बहुतांश लोक फिरत असतात. अशा लॉजिकमुळे चेहेर्‍यावरील खड्डे बुजवून सगळेजण पूर्णत: आत्मसमाधानी होतात. आणि ही वाक्ये ऐकणारेही तसाच ‘मेकअप्’ करून वावरत असल्यामुळे त्यांचाही अशा समर्थनांच्या ‘फाऊंडेशन क्रीम’बद्दल काही आक्षेप नसतो. उलट, त्यांनाही आपल्यासारखाच कुणीतरी समदु:खी सापडल्याचा आनंद होतो. त्यामुळे आपला ‘मेकअप्’ एकदम पर्फेक्ट आहे आणि ‘मेकअप्’ करणे हे अनिवार्य आहे, अशी सर्वांचीच खात्री पक्की होत जाते. स्वत:चा चेहरा पाहण्याची कुणालाही गरज वाटेनाशी होते.

‘प्रत्येकाचा खरा चेहरा मुळात कुरूपच असतो का?’ या प्रश्नाचे उत्तर अर्थातच ‘नाही’ असेच आहे. मूळचा चेहरा सुंदर किवा कुरूप असा काहीच असत नाही, तर तो नैसर्गिक असतो.

निसर्ग अथवा नैसर्गिक गोष्ट ही कधीही सुंदर, कुरूप अशी असतच नाही. ती फक्त नैसर्गिक असते आणि ती नैसर्गिक असणे, हेच तिच्या सौंदर्याचे

लक्षण असते. ही बाब समजून न घेता आपल्या खर्‍या नैसर्गिक ‘स्वत:’पेक्षा वेगळा अशी आदर्श प्रतिमा बनवल्यावर त्या आदर्शापुढे मात्र खरा चेहरा साहजिकच निस्तेज, फिकट आणि खडबडीत भासू लागतो आणि जितकी ‘मेकअप्’ची पुटे जास्त, तितका खरा चेहरा नकोसा वाटू लागतो. इतकेच नव्हे, तर खरा चेहरा उघड होऊ नये म्हणून प्रत्येकजण ‘मेकअप्’च्या थरानुक्रमे विपर्यस्त, संपादित, काल्पनिक वा खोट्या माहितीचा आधार घेऊ लागतो. मग अपरिहार्यपणे आपला खोटेपणा, नैसर्गिक सहज-साधेपणा टाकून देऊन स्वत:भोवती कडेकोट कुंपण घालून अपारदर्शक बनतो व हळुहळू बंदिस्त, हिणकस आयुष्य स्वीकारतो. मग आधीचा खोटेपणा प्रकट होऊ नये म्हणून आणखी एक खोटेपणा करण्याचे दुष्टचक्र सुरू होते आणि यासाठी हिंसा किवा नवनवीन युक्त्या, साधनांची गरज प्रत्येकाला भेडसावू लागते- जी भागवण्यात प्रत्येकाच्या दिनचर्येचा व बुद्धीचा बहुतांश भाग व्यापला जातो.

मोकळ्या हवेतील फुलझाडांना, छोट्या रोपांना जर सतत बंदिस्त ठेवले तर त्या रोपांची पाने-फुले पिवळी पडतात व रोगट होतात. तद्वतच सतत जगापासून बंदिस्त राहण्याने असा ‘मेकअप्’ केलेल्या माणसांचा मूळचा नैसर्गिक, साधा चेहरा सुरकुतू लागतो, मुरुमाळू लागतो. त्यांचे मन रोगट बनते. मूळचा दिलखुलास स्वभाव अधिकाधिक कुटिल, अनैतिक बनत जातो. त्यानंतर मात्र स्वत:चा चेहरा पाहणे म्हणजे वास्तवात मुरुमाळलेला, विद्रूप चेहरा पाहणे ठरते; जे कुणालाही सहन करणे अशक्य आहे. परिणामत: बहुतांश लोक आपला चेहरा स्वत:हून पाहण्याच्या प्रयत्नालाच नकार देतात. आणि समजा, नाइलाजाने पाहावा लागलाच, तर तो खरा चेहरा ज्यात दिसेल तो आरसाच फोडतात किवा शोकविव्हल होऊन भग्न होतात. स्वत:च्या व्यक्तिमत्वाच्या खर्‍या चेयार्‍याबाबत या तीनही प्रतिक्रीया धोकादायक व हिंसात्मकच आहेत. कारण तीनही बाबतीत चेहरा तसाच विद्रूप राहतो आणि स्वत:शी किवा दार्शनिकाशी हिसा करण्याचे आणखी एक पातक त्यांच्या नावे जमा होते.

अनेकजण ‘आपल्याला एखादा मोठा रोग जडल्याचे उघडकीस येईल’ या भीतीने पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाऊन ‘टेस्ट’ करून घेणेच नाकारतात. अशा व्यक्तींना त्यांचा रोग लक्षात येईपर्यंत रोगाने आक्राळविक्राळ रूप धारण करून सारे शरीर व्यापलेले असते. त्यानंतर डॉक्टरवर आगपाखड करून किंवा स्वत:चे कपाळ बडवून काहीही उपयोग होत नाही. कारण परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. आपल्याला जडलेला ‘रोग’ न कळणे- ही अत्यंत धोकादायक स्थिती असते. उलट, रोगाचे निदान होणे, ही सुदृढतेची पहिली पायरी असते. तद्वतच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चेहरा नैसर्गिक, सुंदर करण्यासाठी आधी स्वत:चा चेहरा विद्रूप आहे, हे उमगणे अपरिहार्य आहे. तथापि, तसे जाणवल्यावर सामान्यांना खचून जाण्याचा, तसेच प्रतिष्ठाग्रस्तांनी, यशग्रस्तांनी आरसा फोडण्याचा धोका आहे; ज्यामुळे त्यावरील उपायाचा मार्गच नष्ट होईल. म्हणून स्वत:चा चेहरा पाहण्यापूर्वी हे समजून घेतले पाहिजे की, ‘मेकअप्’ हा विद्रूपतेवरील उपाय नसून ‘मेकअप्’ हे विद्रूपतेचे ‘कारण’ आहे.

चेहर्‍यावरील खड्डे, मुरूमे नष्ट करण्यासाठी त्यामागील रोग नष्ट करणे आवश्यक आहे. तथापि, या सर्वांहून महत्त्वाची बाब नीट समजून घेतली पाहिजे की, स्वत:चा विद्रूपपणा पाहणे नैसर्गिकतेच्या/ सौंदर्याच्या वाटचालीतील पहिले पाऊल आहे आणि म्हणूनच स्वत:चे विद्रूपत्व जाणवण्याचा क्षण अत्यंत मंगल आहे.

— भालचंद्र हादगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..