(विशाल जाधवची (अभिनेता/दिग्दर्शक) मी घेतलेली मुलाखात, जी महाराष्ट्र २४ तासमध्ये प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र २४ तास, हे एक गुगल ऍप्स आहे. हे ऍप्स पाहण्यासाठी आपल्या ऍंड्रॉईड मोबाईलवरुन “महाराष्ट्र २४ तास” (इंग्रजी किंवा मराठीतून) टाईप करा किंवा या लिंकवर टिचकी मारा ः https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.bnm )
मुलाखत : विशाल जाधव (अभिनेता/दिग्दर्शक)
प्रश्न : विशाल, तुझ्या नवीन नाटकाविषयी सांग.
उत्तर : टल्लीन झाले सारे हे माझ्या नाटकाचं नाव आहे. मदन देशमुख ह्या माझ्याच मित्राने हे नाटक लिहिलंय. सध्याची परिस्थिती भ्रष्टाचार, आतंकवाद, अंधश्रद्धा या विषयावर भाष्य करणारं असं हे नाटक आहे. पण आम्ही ते विनोदि पद्धतीने दाखवतोय. मला असं वाटतं की लोकांना हसवत हसवत संदेश द्यायचा, तर लोकांना ते पचतं.
प्रश्न : मला वाटतं तुझं दिग्दर्शन असलेलं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. मग तु हेच नाटक का निवडलंस?
उत्तर : मघाशी म्हटल्याप्रमाणे हे नाटक माझ्याच मित्राने लिहिलंय. त्याने ही एकांकिका लिहिली होती. तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला आपण ही एकांकिका करुया. मी स्क्रीप्ट वाचली आणि त्याला म्हटलं की ही एकांकिका नाही, तर हे नाटक आहे. नंतर मग आम्ही ते नाटक पूर्ण केलं. आताच्या राज्यनाट्य स्पर्धेत उतरवलं, आम्हाला पहिल्या फेरीत दिग्दर्शन व नाटकासाठी दुसरा क्रमांक मिळाला आणि आता हे नाटक व्यवसायिक स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
प्रश्न : तुला जास्त काय करायला आवडतं अभिनय कि दिग्दर्शन?
उत्तर : दोन्ही.. पण अभिनय माझं पॅशन आहे.
प्रश्न : बरं…तर मग तु दिग्दर्शनाकडे कसा काय वळलास?
उत्तर : मी १ वर्षापूर्वी वर्कशॉप केला होता. काही स्कीट लिहिल्या, नाटकात अभिनय केला, हे करत असताना मला माझ्या बर्याच मित्रांनी सांगितलं की तुझ्याकडे दिग्दर्शकाची “नजर” आहे. वर्कशॉपच्या वेळी सुद्धा आमच्या सरांनीही सांगितलं की तु उत्तम दिग्दर्शक होऊ शकतो. पण आधी मी बर्याचदा हे टाळलं. पण नंतर मी असा विचार केला की इतके लोक म्हणत आहेत की मी दिग्दर्शन करु शकतो तर एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? तेव्हा मी ’सल’ आणि ’पारध’ या दोन प्रायोगीक नाटकांचं दिग्दर्शन केलं. त्यावेळेस मला चांगल्या प्रतिक्रीया आल्या आणि तेव्हाच मी ठरवलं की मी आता अभिनयासोबत दिग्दर्शनही करणार.
प्रश्न : तु किती वर्षापासून ह्या क्षेत्रात आहेस?
उत्तर : जवळ जवळ आठ वर्षे पूर्ण झाली.
प्रश्न : योगायोगाने ह्या क्षेत्रात आलास की हा पूर्वनियोजीत कट आहे?
उतार : हा..हा..हा.. पूर्वनियोजीत कट आहे आणि खर्या अर्थानं हा “कट”च आहे. मला लहानपणापासूनंच ह्या क्षेत्रात आयचं होतं. पण घरातून मला परवानगी नव्हती. मी सरकारी नोकरी करावी अशी सर्वांची ईच्छा होती. काही अंशी मी ती ईच्छा पूर्णही केली पण नाटक सोडलं नाही आणि आता हया माझ्या आवडत्या चंदेरी दुनियेत मी स्वतःला झोकून दिलंय. घरच्यांचा विरोध असूनही मी ह्या क्षेत्रात आलोय. म्हणून तु म्हणतोस त्याप्रमाणे हा पूर्वनियोजीत कट आहे.
प्रश्न : तुझा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री.
उत्तर : असा एखादा कुणी नाही. सांगणं थोडसं कठीण आहे. पण…. सिद्धार्थ जाधव आणि परेश रावल मला फार भाळलेत.
प्रश्न : तुझं आवडतं नाटक आणि चित्रपट
उत्तर : नाटक…..ऑल दि बेस्ट, सही रे सही, ती फुलराणी, कबड्डी कबड्डी, फायनल ड्राफ्ट हे सगळे नाटक मला फार आवडतात. ह्या नाटकांपासून मला स्वतःला बरंच काही शिकायला मिळालं.
चितपटाबद्दल म्हणायचं तर आताच्या काळातले “थ्री इडियट्स” आणि “मी शिवाजी राजे भोसले बोलतोय” हे माझे आवडते चित्रपट आहेत.
प्रश्न : तुला काय वाटतं, नाटक कसं असावं?
उतार : नाटक हे शिकवणारं असावं. लोकांना जागं करायचं आहे. पण हसवत हसवत संदेश देणारं नाटक असावं. ज्यामुळे मनोरंजनही होतं आणि प्रबोधनही.
प्रश्न : तुला वाचनाची आवड आहे असं मला कळलंय, तुझं आवडतं पुस्तक सांग.
उत्तर : ययाती आणि पु. ल. एक आठवण.
प्रश्न : तु अशा तरुणांना काय सांगू ईच्छितो, ज्यांना अभिनय म्हणजे सहज सोपं काम आहे असं वाटतं?
उत्तर : मला वाटत मी सुद्धा तरुण आहे… हा. हा..हा…. ओके.. चांगला प्रश्न विचारलास. मला वाटतं आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. तरुणांनी कमीत कमी ५ वर्षे थियेटर करावे. मग नंतर सिरियल, चित्रपट आहेतच. पण थियेटर इज मस्ट आणि शंभर प्रेक्षक खूश झाले व एक रसिक नाराज झाला तर आपलं काहीतरी चुकतंय असं समजावं.
प्रश्न : छान उत्तर दिलस, विशाल. महाराष्ट्र २४ तासच्या वाचकांना व देशवासियांना काय संदेश द्दावासा वाटतो?
उत्तर : महाराष्ट्र २४ तासच्या सर्व वाचकांना नवरात्रीच्या, दसर्याच्या आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या देशबांधवांनाही शुभेच्छा…आणि मी सर्वांना विनंती करतो की माझे “टल्लीन झाले सारे” हे नाटक आवर्जून पहा. त्याची प्रतिक्रिया आम्हाला कळवा. पर्सनली येऊन भेटा. आमचे काय चुकते? काय बरोबर आहे? याविषयी आम्हाला सुचना द्या. धन्यवाद…
तुलाही धन्यवाद आणि शुभेच्छा. तुझ्या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होऊ दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना.. धन्यवाद विशाल…
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply