नवीन लेखन...

मैत्रीण

(पात्र: ताई: उमेश ची मोठी बहिण, उर्मी: उमेशची बायको, उमेश)

उर्मी: वन्स, तुम्ही समजवा न उमेशला, तुमच ऐकेल तो. मी पुष्कळ प्रयत्न केला माझं ऐकतच नाही. एकच रट लाऊन बसला आहे, पहिले मुलगा पाहिजे, मुलीचं नंतर बघू. वन्स, लग्नानंतर पहिल्यांदा गर्भार राहिली आहे मी. पहिले मुलगी झाली तर काय झालं. मी त्याला म्हंटले, पुन्हा गर्भात मुलगी आली तर मी नाही म्हणणार नाही गर्भपाताला. भावाला बहिण पाहिजेच. मग बहिण मोठी असेल तर काय फरक पडतो.

ताई: पुष्कळ फरक पडतो, तुला माहित आहे, बाबांनी माझ्यासाठी इंजिनिअर मुलगा बघितला. सालंकृत कन्यादान केल, सव्वा लाख हुंडा दिला वर २० तोळे सोन ही. त्याच वेळी उमेशला इंजिनीरिंग मध्ये अडमिशन साठी २ लाख पाहिजे होते. वडिलांनी नकार दिला. त्याच इंजिनीअर व्हायचं स्वप्न, स्वप्नच राहिलं. तू, तुझ्या जिद्दीपायी त्याच्या होणाऱ्या मुलाचं स्वप्न ही भंग करणार का? कदाचित त्याला मुलगी नकोच असेल. कालच उमेशचा फोन आला, होता. तुला समजवायला सांगितल आहे. तुला इथे सोडून, तो वात्सल्य क्लिनिक मध्ये गेला आहे, अपॅाइंटमेन्ट घेण्यासाठी.

उर्मी: ताई मोठ्या आशेने मी इथे आले होते, पण तू सुद्धा, तुला पटतयं का, हे?. मी गर्भपात करणार नाही, माझा पक्का निश्चय आहे.

ताई: तुझ्या या जिद्दीपायी उद्या उमेशने तुला सोडून दिले तर तू काय करेल? आधी आपल्या आई-बाबांना विचार या बाबतीत.

उर्मी: (काहीच बोलत नाही)

ताई: तू त्यांना विचारल असेलच. त्यांनीही तुला म्हंटल असेल, उगाच बाऊ करू नको, शुल्लक गोष्टीचा. अरे, संपूर्ण आयुष्याची कमाई खर्च करून त्यांनी तुझे लग्न लाऊन दिले. पुन्हा मुलगी, शुल्लक कारणावरून माहेरी आली, त्यांना कसं चालेल?

उर्मी: मी नौकरी करेन, कुणी आसरा नाही दिला तर एकटी राहेन. पण गर्भपात करणार नाही.

ताई: मूर्खासारखे बडबड करू नकोस. हे जग लांडग्यांनी भरलेल आहे, एकट्या स्त्रीला लोक फाडून खातात. असला विचार डोक्यात मुळीच आणू नको.

उर्मी: (मोठ्याने) ताई, तुला कळत कसं नाही, चार महिन्याची गर्भार आहे मी. तिची हालचाल पोटात जाणवते. रात्री स्वप्नात येऊन बोलतेय ही. कालच रात्री स्वप्न बघितल, ती विहरीत पडली आहे, आई वाचवा म्हणून हाक मारतेय. मी हात पुढे केला, सगळं पुसट झाल. दचकून उठले. घामाघूम झाले होते. मी कसं मरू देऊ आपल्या पोटच्या पोरीला. तुला कसं कळणार ताई, ज्याच्यावर वेळ येते. तोच सांगू शकतो. नुसत्या गर्भपात शब्द म्हंटला तरी अंग शहारून येत. मनाला किती यातना होतात तुला कसं कळेल.

(काही क्षण शांतता, ताई सोफ्यावर ठेवलेल्या बाहुली कडे बघते. हळूच अलगद बाहुलीला कडेवर घेते, पुन्हा उर्मी कडे वळून)

ताई: उर्मी ही बाहुली बघ, अक्षय सहा महिन्याचा होता, तेंव्हा घेतली होती. खेळणं म्हणून. (चेहर्यावर हास्य आणत). तुला आमच एक गुपित सांगू, अजून कुणालाच नाही माहित. तुलाच सांगते, ही बाहुली नाही, माझी छकुली आहे. (बाहुली कडे बघत) आहे नं ग राणी, मी किती धांटरट आहे, तुझी दुधाची वेळ लक्षातच नाही राहिली. सॉरी हं, बघ कोण आलंय आपल्या कडे, तुझी मामी आली आहे, गुड मार्निंग म्हण तिला. गुड मार्निंग मामी! (बाहुलीचा हात हलविते). उर्मी, आपण नंतर बोलू, छकुलीला भूक लागली आहे.

ताई सोफ्यावर जाऊन बसते आणि बाहुलीला मांडीवर घेऊन तिला पाजायचे नाटक करते. उर्मी स्तब्ध होऊन एकटक पाहतच राहते. ती भांबावून गेली आहे, काय बोलावे तिला काहीच कळत नाही. काही वेळ काही वेळ शांतता.

ताई: (बाहुलीशी) पोटोबा भरलं वाटत, राणी साहेब झोपा आता आम्हाला जरा कामच बोलायचं आहे, तुझ्या मामीशी.

(ताई बाहुलीला अलगद सोफ्यावर निजवते).

ताई: झोपली एकदाची, उर्मी तुला माहित आहे, कालच स्वप्नात आली होती. म्हणाली कशी, आई एवढचं प्रेम होत माझ्यावर तर मला का मारलं. तिला कसं सांगणार, किती दुबळी आणि असहाय होते मी. वाचवू नाही शकले तिला. म्हंटल, छकुली, अपराधी आहे तुझी, तुला पाहिजे ती शिक्षा कर मला. ती काय म्हणाली, सांगू! आई, मी तर सुटले, मुक्त झाले, पण तू जन्मठेप भोगते आहे. तुझी दशा पाहून मला ही चैन मिळत नाही. या बाहुलीत माझा ही दम घुटमळतो. लवकर ये नं. उर्मी, तिला त्रास होत ग. पण मी कशी जाऊ संसार सोडून. नवरा आहे, पोटचा गोळा अक्षय आहे, त्यांच्या साठी जगावं लागणार. रोज रात्री गळ्यातगळे घालून आम्ही रडतो ग. झोपेच्या गोळ्या घेते आजकाल. या जगात स्त्रियांना भोग भोगावेच लागतात…

(ताई रडू लागते, उर्मी जवळ जाऊन ताईच्या खांद्यावर हात ठेवते. काय बोलावं तिला काहीच कळत नाही आहे, तेवढ्यात दारावरची वेळ वाजते, ताई डोळे पुसत, दरवाजा उघडते, उमेश आत येतो)

उमेश: (उर्मीकडे पाहत) काय म्हणता बाईसाहेब!

उर्मी: (काही क्षण चूप राहते), जशी, तुमची इच्छा.

उमेश: आनंदाने, देटस लाईक अ गुड गर्ल. (ताई कडे पाहत) मला माहित होत, ताई ही तुझ जरूर ऐकेल. थेक्स. (उर्मीकडे पाहत) तुझ्या जिद्दी मुळे आधीच उशीर झाला, आज सर्व निपटले पाहिजे

ताई: चहा घेणार का?

उमेश: नंतर कधी, आज आधीच उशीर झाला आहे, चल उर्मी निघू या.

उर्मी: ताई येते हं(तिचा चेहरा भावशून्य आहे, एखाद्या कसाई कडे जाणार्या गाई सारखा) दोघ बाहेर पडतात, ताई दरवाजा बंद करते.

ताई: (बाहुलीला हातात उचलत) छकुली, एक आनंदाची बातमी सांगू का तुला, तुझी मामी, तुझ्याच सारखी बाहुली आणायला गेली आहे. छान, मस्त, मैत्रीण भेटणार आहे तुला, खेळण्यासाठी, हा! हा! हा!……..

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..