शासकीय कार्यालयं, पुरातत्व विभाग आणि कोर्टात मोडी लिप्यांतराची वारंवार गरज भासत असते. इतर क्षेत्रामधे करिअर करता करता मोडी लिप्यांतरामुळेही स्वयंरोजगार मिळवता येतो. मराठी भाषेवर प्रभुत्त्व असलेल्यांना हे क्षेत्र खुणावतंय. मध्यंतरी ठाण्याच्या कोर्टात काही कामानिमित्त जाणं झालं, तेव्हा तिथे एक तरुण भेटला. केमिकल इंजिनीअरिंगचा हा ओळखीचा विद्यार्थी इथे काय करतोय, या प्रश्नाने मनात कुतूहल निर्माण झालं. फावल्या वेळात मोडी लिपीतल्या मजकुराचं देवनागरीत लिप्यांतर करण्याचं काम करतो, हे कारण त्याने सांगितल्यानंतर थक्क व्हायला झालं.
सरकारी कार्यालयं, पुरातत्त्व विभाग आणि कोर्टात अशा प्रकारची कामं निघतच असतात, त्यामुळे या क्षेत्रात लिप्यांतराची वारंवार गरज भासत असते. पण मोडी लिपीच्या जाणकारांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने या क्षेत्रातील कामांना मर्यादा येत आहेत. या ठिकाणाहून आपल्याला अधून-मधून बोलावणं येत असल्याचं तो तरुण सांगत होता. बारावीची परीक्षा झाल्यावर हौस म्हणून त्याने मोडी लिपी प्रचारक संस्थेचा काही आठवड्याचा कोर्स केला होता. तो परीक्षाही उत्तम मार्काने पास झाला होता. आज, या क्षेत्रात काम करून शिक्षणाला पूरक पैसे मिळवता येत असल्याचं त्याने सांगितलं.
अवघ्या जगाला आज मंदीने ग्रासलंय. भल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्याही या परिस्थितीपुढे माना टाकत असल्याने उच्चपदस्थांच्या नोकऱ्याही संकटात आल्या आहेत. अशा वेळी या तरुणाने शोधलेला हा स्वयंरोजगाराचा मार्ग खूपच प्रशंसनीय वाटला. याकडे अद्यापि कुणाचं फारसं लक्ष गेलेलं नसावं.
मोडी ही तशी प्राचीन भारतीय लिपी आहे. देवगिरीच्या महादेव आणि रामदेवराव यादव यांच्या कारकीदीर्त १२६० मधे हेमाडपंत महामंत्री होता. त्याने वेगवान लिहिण्याच्या गरजेपोटी या लिपीचा स्वीकार केला, त्यानंतर त्याचा प्रसार झाला असं संशोधकमानतात. हेमाडपंताने लंकेतून ही लिपी आणली, असंही काही जाणकारांनी म्हटलंय.
मुंबईतील काहीमंडळी एकत्र येऊन मोडी लिपीचे वर्ग चालवतात. कोणताही तरुण या प्रशिक्षण वर्गातून शिकून लिप्यंतरासाठी तयार होऊ शकतो. मराठीचा उत्तम जाणकार काही महिन्यातच हे प्रशिक्षण पूर्ण करू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला. या कामासाठी दैनंदिन जीवनातील केवळ काही तासच खर्च करावे लागतात. मोबदल्याची रक्कम बऱ्यापैकी रोख आणि त्वरित मिळते. भाषेत रस असल्यास लिप्यंतरही सहज जमू शकतं. देवनागरीत प्रत्येक अक्षर सुटं असतं आणि ते लिहिताना प्रत्येक वेळी लेखणी उचलावी लागते. त्यामुळे लिहायला वेळ लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी हेमाडपंताने देवनागरीतली अक्षरं मोडून जलद लिहिता येईल, अशी मोडी लिपी शोधून काढली. विसाव्या शतकापर्यंत ही लिपी प्रचारात होती. पेशवे दप्तर संपूर्णपणे मोडी लिपीतच आहे. मोडी लिपित चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणं प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला.
तंजावरला मराठ्यांचं राज्य होतं. तिथे अशी मोडी लिपीतली अनेक कागदपत्रं दुर्लक्षित आहेत. त्यांचं वाचन, लिप्यांतर करण्याचं काम हे एक प्रकारे समृद्ध इतिहास जतन करण्यासारखं आहे. इंग्रज अधिकाऱ्यांच्या मोडी लिपीतील सहीची बरीच कागदपत्रं पाहायला मिळतात. मिशनऱ्यांची पहिली मराठी पुस्तकंही मोडीतच आहेत. लिप्यंतराचं काम पैसे मिळवून देणारं आहेच, शिवाय त्यातून भाषिक ज्ञान आणि समाधानही मिळतं.
मूळातच भाषेची आवड, भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची तयारी आणि वेगळं काही करून दाखवण्याची इच्छा असलेल्या तरुणांना हे क्षेत्र करिअरसाठी उत्तम आहे.
— राजेश खिलारी
Leave a Reply