गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी नकोत, असे मत प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमधील प्रशासकीय मॉडेलही आपल्याला मान्य नसल्याचे सांगत सेन यांनी मोदी यांचा तीव्र विरोध केला आहे.
नरेंद्र मोदी तुम्हाला पंतप्रधानपदी हवे आहेत का, असे विचारले असता, “मला ते नको आहेत”, असे सेन
यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सांगितले. “एक भारतीय म्हणून मला नरेंद्र मोदी माझे पंतप्रधान म्हणून नको आहेत. अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटावे, यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत”, असे सेन यांनी या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सांगितले.
मुळात प्रश्न असा आहे की या वृत्तवाहिनीला हा उद्योग करायची गरजच काय होती? हे सेनसाहेब एवढे कोण लागून गेले की त्यांच्या मताला एवढं महत्त्व द्यावं?
नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर इतक्या काळात हे अमर्त्यबाबू कुठे होते? ते सध्या कुठे वास्तव्याला आहेत? त्यांचा उद्योग, पोटापाण्याचा व्यवसाय काय? हे असे प्रश्न सामान्य माणसाला आता पडायला लागलेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना आणि रुपयाचा भाव पडत असताना यांनी त्यासाठी सरकारला काही सल्ला दिल्याचं देशातल्या गरीब बिचार्या जनतेला कधी दिसलंच नाही. आता अचानक मर्कटावतार धारण केलेल्या या अमर्त्यबाबाला एकदम गुजरातच्या दंगली आठवाव्यात आणि त्याबद्दल मोदींना धारेवर धरावं, पण अजूनही पडझड होत असलेल्या अर्थव्यवस्थेला कुठे ठिगळं लावता येत आहेत का याकडे त्यांचं दुर्लक्ष व्हावं हे समजण्याच्या पलिकडचं आहे. आणि समजायचंच असेल तर एकच समजू शकतो की कोणत्यातरी राज्याच्या राज्यपालपदाचं गाजर यांना दाखवलं गेलं असणार आणि त्यामुळे हे आता राजभवनाची स्वप्न बघत असणार!
आता यांची मुक्ताफळं बघूया !
“मी याला मान्यता देणार नाही. हे रेकॉर्ड खूप चांगले आहे, असे मला वाटत नाही. अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटण्यासारखी स्थिती यावे, असे आम्हा भारतीयांना वाटत नाही. २००२ च्या जातीय दंगली नियोजित होत्या यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखे वाटू नये. मला वाटते हे भयानक रेकॉर्ड आहे. अशा प्रकारचे रेकॉर्ड असलेले भारताचे पंतप्रधान नसावेत”, असे सेन यांनी म्हटले आहे.
आपण मान्यता देता की नाही यावर सेनबाबू या देशाचा पंतप्रधान ठरणार नाही. मोदी असोत की मनमोहन सिंग… की अगदी राहूल गांधी, मुलायम अथवा लालूप्रसाद…. निवडणूकीत मतदान करणार्या भारतीय मतदार नागरिकांना जो हवा असेल तोच भारताचा पंतप्रधान होईल. तुम्हाला विचारलंय कोणी? एका चॅनेलवाल्या पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर तुम्हाला स्वत: किंगमेकर असल्यासारखं वाटलं की काय? बरं तुम्ही या देशाचे नागरिक आहात का आणि इथे मतदान तरी करता का हे या देशाच्या गरीब बिचार्या नागरिकांना माहितही नाही.
२००२ च्या दंगलींवर आपण बोलता. त्याचं रेकॉर्ड भयानक आहे असंही आपण म्हणता. मग या देशात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आतापर्यंत ज्या काही दंगली झाल्या त्याबद्दल आपले मत काय हे तरी एकदा देशाला कळू द्या. आसाम, बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, केरळ यासारख्या राज्यात दंगली झाल्याच नाहीत?
सेनसाहेब, आज एवढ्या वर्षांनी तुम्हाला भारताचा एवढा कळवळा का आलाय हो? इतकी वर्षे भारतात दहशतवादी बॉम्बस्फोट घडवून आणताहेत. मुंबई, बंगलोर, हैदराबाद, पुणे येथे बॉंबस्फोट झाले तेव्हा तुमच्या डोळ्यावर झापडं लागली होती? गोधरा हत्याकांड, अक्षरधाम हल्ला, अमरनाथ यात्रेकरूंवर होणारे हल्ले याकडे सेनबुवांचे लक्ष गेलेले दिसत नाहीय. दिल्लीत इंदिराजींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत जवळपास ३००० शीख मारले गेले. त्या वेळचा दिल्लीचा मुख्यमंत्री आपल्याला आठवतो तरी का? देशात इतर अनेक ठिकाणे अनेक जातीय दंगली झाल्या, त्या त्या वेळचे मुख्यमंत्री आपल्याला आठवतात तरी का? २००२ च्या दंगलीचा हवाला देवून मोदी नकोत अशी मागणी करताना हा तथाकथित अर्थतज्ज्ञ एखाद्या राजकारण्याच्या भूमिकेत शिरतोय. आता या सेनसाहेबांनी स्वत:च निवडणूक लढवावी म्हणजे त्यांनाच पंतप्रधान बनण्याचा दावा करता येईल.
एखादी गोष्ट किती ताणायची त्यालाही काही मर्यादा असतात हे नोबेल पारितोषिक विजेत्या माणसाला कळू नये? १०-१२ वर्षापूर्वी झालेल्या घटनांना विसरून, नव्याने जातीय सलोखा निर्माण करायचा, राष्ट्र उभारणीत योगदान द्यायचे, की राजकारण्यांसारखे एकमेकांच्या झिंझ्या उपटत बसायचे एवढी साधी अक्कल सेनबाबू आपण आणि आपल्यासारखे बुद्धीवादी वापरत नाही हेच या देशाचे दुर्दैव आहे.
चॅनेलवाल्यांचं एकवेळ समजू शकतो. कोंबड्यांची, बैलांची लागते तशीच माणसांची झुंज लावण्याचे त्यांचे उद्योग नेहमीचेच आहेत. देशाच्या दुर्दैवाने आज अनेक चॅनेलवाले पत्रकार न्यायाधिशाच्या थाटात कार्यक्रम करत असतात. त्यांचा अजेंडा फक्त टीआरपी वाढवणे एवढाच असतो. तुम्हाला नको त्या विषयावर नको त्या वेळी, नको त्या ठिकाणी बोलते करुन त्यांनी तुम्हाला झुंज लावलेल्या कोंबड्यांच्या किंवा बैलांच्या पंगतीत आणून ठेवलं हे पण तुम्हाला कळलं नाही… कसले तुम्ही नोबेल पारितोषिक विजेते ?
भाजप, कॉंग्रेस, समाजवादी, मार्क्सवादी वगैरेवाले झक मारोत… कोणालाही देशाची काहीही पडली नाही. पण आपल्यासारखे तथाकथित विचारवंतसुद्धा त्याच मार्गाने तोंडसुख घेतात तेव्हा हे आपल्यासारख्या बुद्धीवाद्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचं प्रतिक आहे असं आता भारतीय जनता समजायला लागेल.
भारतात सध्या आपले क्षेत्र सोडून दुसर्याच्या क्षेत्रात बोलण्याची चढाओढ सर्वत्र लागली आहे. एवढंच नाही तर आपले क्षेत्र सोडून दुसर्या क्षेत्राचे आपण फार मोठे जाणकार आहोत असे दाखवायचीही चढाओढ या देशात आहे. राजकारणी क्रीडा क्षेत्रावर बोलत असतात आणि क्रिडा संघटनाही चालवतात, कलाकार राजकारणावर काहीही बोलत असतात. राजकारणी साहित्य मेळाव्यांचे तारणहार बनतात आणि खेळाडू राजकारणाच्या आखाड्यात येउन संसदेतील मौनीबाबाही बनतात. समाजातील प्रत्येकाने आपल्या क्षेत्राच्या आणि स्वत:च्या अकलेच्याही मर्यादा जाणून बोलणे-वागणे आवश्यक आहे नाहीतर समाजाची दिशाभूल होवू शकते.
अमर्त्य सेन हे एक नामवंत अर्थतज्ज्ञ आहेत असे देश समजतो. त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा सामान्य भारतीयांना कळले की या नावाचा कोणीतरी माणूस भारतीय आहे. गरीब भारतीयांची खरंतर अपेक्षा आहे की यांच्या अनुभवाचा उपयोग भारताची विस्कटलेली आर्थिक घडी नीट कशी होईल, रुपयाचे अवमुल्यन कसे थांबविता येईल, जगात भारताची घसरलेली आर्थिक पत कशी सुधारेल ह्यावर उपाय शोधून काढण्यासाठी होईल. दुर्दैवाने यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही फायदा झाला नाही.
आतापर्यंत नोबेल पारितोषिक मिळालेल्यांची यादी बघितली तर त्यात सगळी थोर विचारांची माणसं दिसतात. मात्र अमर्त्य सेन यांनी या पारितोषिकाची शान घालवली…. आणि स्वत:बद्दल गरीब भारतीयांच्या मनात असलेली आदरपूर्ण भावनाही धुळीला मिळवली आहे.
निम्मा भारत आज उपाशी आहे. उरलेल्यातला निम्मा अर्धपोटी आहे. उरलेल्यातला निम्मा जेमतेम भाकरी कमावतोय आणि संसार रेटतोय. त्याच्याही उरलेल्यातला निम्मा सुखवस्तू आहे आणि त्याच्या एक दशांश बुद्धीजीवी, राजकारणी, व्हीआयपी वगैरे सदरात बसतो ही आज स्थिती आहे.
अमर्त्य सेन साहेब, आम्ही तुम्हाला मोठे अर्थतज्ज्ञ आहात असे समजत होतो. कदाचित असालही आपण फार मोठे अर्थतज्ज्ञ. पण आपण उगाचच भलत्या विषयात – ज्यामध्ये आपला काही अधिकार आहे असे दिसत नाही – हात घातलाय. आता हा हात निखार्यात घातलाय की शेणात हे आपल्यालाच माहित. कदाचित भाजून निघेल किंवा माखून निघेल.
नको त्या विषयवार बोलण्यापेक्षा देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे लक्ष दिले तर बरे होईल..
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply