नवीन लेखन...

मोरू.

आधी पहाट झाली मग सकाळ झाली. रात्रभर गार वार्‍याने शहारलेली झाडं, सकाळी फ्रेश झाली. जंगल जागं होऊ लागलं. झाडं डोलू लागली. पानं सळसळू लागली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. तर, पिल्लांनी खाऊसाठी किरकिर सुरू केली. इकडे तिकडे लोळत पडलेले प्राणी उभे झाले. उभे राहून झोपणारे प्राणी जागे झाले. त्यांनी दोन पाय ताणून आळस देत अंग चाटायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या अंगाला अंग घासत त्यांची पिल्लं त्यांना म्हणाली,’ऊंभूक लागली ना’त्याचवेळी जंगलातला मोर उठला. लांडोर उठली.पिसारा सावरत मोराने बाजूला वाकून पाहिलं.त्याला आपलं पिल्लूच नाही दिसलं! मोर घाबरला!! त्याने जोरात लांडोरीला हाक मारली,’मियाँ मियाँ अगं,ये इकडे लवकर.पटपट पळत पळत ये.’

लगाबगा लगाबगा लांडोर आली. लांडोर वैतागून म्हणाली,’काय झालं सकाळी सकाळी ओरडायला? जरा पिसं साफ करत बसले होते.. तर….तिला थांबवत मोर भीत भीत म्हणाला,’अगं, आपला मोरू कुठे दिसत नाही. हे पिल्लू रात्री झोपेत कुठे गेलं कळत नाही?ठहे ऐकल्यावर लांडोर भलतीच घाबरली!!

तिनं आजूबाजूला.. वरती खालती.. झाडांच्या मागे पुढे.. झुडपांच्या पाठी..नदीच्या काठी टकाटका पाहिलं.तिला आपलं पिल्लू कुठेही नाही दिसलं! तिला कळेना, हे असं कसं झालं?

लांडोर घाबरून म्हणाली,“अहो,आपला मोरू गेला कुठे? दिसत नाहीए! मला बाई काळजी वाटते. कुठं जायचं होतं तर सांगून नाही का जायचं? आता मोरूला कुठे-कुठे शोधायचं? आता उगाचच भलते सलते विचार मनात येतात.” भीतीने आईची चार पिसंच गळून पडली!!

मोर तुरा हलवत म्हणाला,“हॅ! घाबरतेस काय? चल आपण शोधूया. आपला मोरू बाळ आहेच हुशार! उगाच इकडे तिकडे भलतीकडे तो जाणारच नाही!”

लांडोरीला धीर आला. मोर मान हलवत,झपझप चालत मोरुला शोधू लागला.इकडे तिकडे पाहू लागला.उड्या मारत,मान उंचावून,मोरुला जोरजोरात हाका मारू लागला, “मियाँ।।।, मियाँ।। मोरू ।।, मोरू।।। अरे मोरू।। बाळा।।”

इतक्यात झाडामागच्या गवतातून आवाज आला, “आ।।।ई, बा।।।बा मी इथे आहे … मी इथेच आहे ना!”

मोर पिसारा सावरत पळत-पळत मोरू जवळ गेला.जाताना बाळासाठी खाऊ घेऊन गेला.आई तर धावतच मोरू जवळ आली.

आईने मोरूला पंखाने दमदम थोपटलं. चोचीने मानेजवळ, गळ्याजवळ कुचूकुचू खाजवलं. बाबांनी आणलेले दोन टपोरे मऊमऊ किडे तिने मोरू बाळाला बळे-बळे भरवले. मोरुने किरकीरत किडे गिळले आणि…बाबांच्या पिसार्‍यावर चोच घासत मोरूने तोंड पुसलं!

मोरूला आपल्या गळ्याखाली घेत आई म्हणाली, “कुठे रे गेला होतास, न सांगता? आम्हाला किती काळजी वाटली ना! जीव नुसता गलबलून गेला. किती घाबरले ना मी! पुन्हा नाही हं असं करायचं. कुठं जायचं असेल तर नीट सांगूनच जायचं. आणि रात्री बेरात्री तर अजिबात कुठं म्हणून जायचं नाही हं.” डोक्यावरचा इवलासा तुरा, आईच्या गळ्याला घासत मोरू म्हणाला,“ऑ।़।़ई मला किनई काल रात्री झोपच नाही आली. मी मधेच डोळे उघडून पाहिलं तर तुम्ही सर्व गारेगार ढाराढूर झोपलेले!”

मला मात्र सारखा त्रास होत होता. सारखा कुटूकुटू त्रास!मग मी हळूच उठलो. अलगद चालत त्या झाडाजवळ गेलो. हलकेच उडून त्या समोरच्या बुटक्या फांदीवर जाऊन बसलो. सगळीकडे टुकूटुकू पाहिलं. तर, मीच एकटा जागा. बाकी सारे,म्हणजे सगळे पक्षी झोपलेले.सगळे प्राणी झोपलेले. आनंदाने झोपलेले.पण, मलाच एकट्याला त्रास! सारखा कुटूकुटू त्रास!मग मी तिकडनं उडालो आणि त्या तिकडच्या,नदीजवळच्या उंच दगडावर जाऊन बसलो. तिकडे बेडूक मामा जागे.माशा जाग्या. रातकिडे जागे.डासोपंत जागे.त्यांनी मला जाम भंडावूनच सोडलं. डराँव डराँव, गूंगूं गूंगूं, किर्रकिर्र किर्रकिर्र।़।़.आणि पुन्हा… ते सगळे आनंदात पण मलाच एकट्याला त्रास! सारखा कुटूकुटू त्रास!

मग मात्र,मी त्या झाडाखालच्या मऊमऊ लुसलुशीत गवतात हळूच लपलो आणि कधी झोपलो ते मला कळलंच नाही ग आई.आई मोरुला समजावत म्हणाली,“अरे मोरू बाळा,तुला त्रास झाला, झोप आली नाही तर तू मला नाही का हाक मारायचीस?”

मी मोरगाणी म्हंटली असती. तुला दमदमून थोपटलं असतं. माझ्या पंखांचं पांघरुण घातलं असतं. चोचीने तुझी पिसं विंचरली असती.बाबांनी पिसारा फुलवून तुझ्यासाठी सुंदर ‘थुई-थुई नाच’ सुध्दा केला असता रे! अं… ते बघ.बाबा तुझ्यासाठी छान-छान खाऊ घेऊन येताहेत.

मोरू किरकीरत म्हणाला,“मला नको तुझं गाणं. मला नको तुझं थोपटणं. मला नको तो बाबांचा नाच.मलाच एकट्याला होतो हा त्रास! सारखा कुटूकुटू त्रास!”

मोरू बाळाला आणखी जवळ ओढत लांडोर आई म्हणाली,ठअसा रागावतोस काय रे छकुल्या? काय झालंय तरी काय तुला?कुठला त्रास झाला? कुठला हा कुटूकुटू त्रास? मला काही कळत नाही बघ. तुझ्या काळजीने माझा जीव अगदी कासावीस होतो! सगळं काय ते,नीट सांग ना रे मोर्‍याआईने ‘मोर्‍या’ म्हणताच मोरू खुशीत आला.आईकडे पाहून त्याने ठसक्यात तुरा हलवला. एक पाय दुमडून मान टकाटका हलवली.इतक्यात बाबा खाऊ घेऊन आले.मोरुने बाबांच्या पिसाऱ्यावर हळूवारपणे चोच फिरवली आणि म्हणाला,“काल रात्रभर माझ्या पोटाला, पाठीला काहीतरी सारखं कुटूकुटू टोचत होतं. त्यामुळे मला झोपच नाही आली.फांदीवर बसलो तरीपण कुटूकुटू टोचतं.दगडावर बसलो तरीपण कुटूकुटू टोचतं.गवतात लपलो……..”हे ऐकताच, लांडोर आई आनंदाने किंचाळली,“मियाँ।।।,रे मियाँ।।।। रे, अरे माझ्या मोर्‍या, आता तू मोरू नाहीस, मोरू नाहीस! तू…आता….मोर….आहेस…..मोर!! पिसारा येण्याआधी प्रत्येक मोरुला थोडासा त्रास होतोच रे बाळा.पिसारा येण्याआधी पोटाला,पाठीला थोडसं कुटूकुटू टोचतंच रे मोर्‍या.अरे मोरू,आता तुला बाबांसारखा मस्त मोठा पिसारा येणार.आता पिसारा सांभाळत,तू ऐटित चालणार! ठुमकत-ठुमकत चालणार!!या वर्षी पावसाळ्यात, तू बाबांसोबत, तुझा सुंदर-सुंदर पिसारा फुलवून मस्त मस्त नाचणार.माझा छकुल्या मोरू…… आता तू मोर झाला रे मोर!!

आनंदाने आईचे डोळे ओलावले.मोरुकडे पाहात तिने सावकाश डोळे बंद केले.बाबांनी पिसारा फुलवला आणि नाचत-नाचत मोरुच्या भोवती गिरकी मारली.आणि अचानक! मोरूसुध्दा बाबांसारखाच नाचू लागला!!

लांडोर आईने डोळे किलकीले करून पाहिलं, तर……तिच्या समोर, नाचत होते, सुंदर पिसारा फुलविलेले …. दोन मोर!!

— राजीव तांबे

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..