गणेशपुराणांतील सिंदुराख्यान व गणेशगीता या भागांवर (अध्याय १२६ ते १४८) मराठीत संजीविनी नावाची टीका लिहिणारा यदु माणिक हा मूळचा नेवाशाचा. नेवाशाची म्हाळसा ही त्याची कुलदेवता. त्याच्या नावातील माणिक हा शब्द वेरूळच्या कैलास लेण्यातील माणिकेश्वर या शिवस्थानाचे संक्षिप्त रूप आहे. या माणिकेश्वराच्याच कृपेने आपण हा ग्रंथ रचला असे तो म्हणतो. यदु माणिकने अजिंठा जवळच्या रूद्रेश्वर येथे गणेशाची उपासना केली आणि आपल्या तपाने गणेशाला प्रसन्न केले. त्याने आपली ही टीका खड्गापूर्णा नदीच्या काठी येळूर (वेरूळ) प्रांतात नागापूर येथे शके १६४७ इ.स. १७२५ मध्ये पूर्ण केली. यदु माणिकची तपोभूमी रूद्रेश्वर हे स्थान अजिंठा लेण्यापासून आठ मैलांवर पश्चिमेस डोंगराच्या अर्ध्या भागावर आहे. हे स्थान लेण्यांप्रमाणे डोंगरात खोदलेले असून अत्यंत एकांतपूर्ण आणि रम्य आहे. तेथे चार ते पाच फूट रूंदीची व सात फूट उंचीची गणेशाची भव्य मूर्ती आहे.
ताम्रांचे किंवा म्लेंच्छांचे अभ्युत्थान हे यदु माणिकाच्या मते कलीचे प्रमुख वैशिष्टय़ होय. गणेश शस्त्रसिद्ध होऊन कलीचे विध्वंसन करील आणि कृतयुगाचे पुनश्च अवतरण घडेल, अशी भविष्यवाणी यदु माणिक यांनी आपल्या ग्रंथाच्या अखेरीस केली आहे.
जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply