यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. त्यांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणार्या महाराष्ट्रापुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला. महाराष्ट्रातील राजकारणाला अतिशय आदर्श असे मापदंड घालून दिले. व्यक्तिगत आणि क्षेत्रीय विचारांच्या पलीकडे राष्ट्रहितासाठी राजकारण महाराष्ट्रातील राजकीय चळवळीला लाभले. आपण राज्य करायला सत्तेत कुणासाठी बसलोय याचे भान त्यांना होते. यशवंतराव चव्हाण हे समाजाच्या दु:खाचे भान असलेले नेते होते. यशवंतराव चव्हाण हे आजच्या पिढीसाठी व सत्ताधाऱ्यासाठी समाजसेवेचा खरा आदर्श आहेत. त्यांचे विचार देशाला तारणारे व प्रेरक होते. संरक्षणमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली म्हणून देश मोठ्ठ्या अडचणीतून सहीसलामत बाहेर आला. महाराष्ट्राची नवनिर्मिती करणारा स्वच्छ चारित्र्याचा हा नेता राज्य व देश विकासासाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे….”
स्व. यशवंतरावांच्या शालेय व महाविद्यालयीन काळ लोकमान्य टिळकांचे युग संपून महात्मा गांधीच्या राजकारणाने सारा देश प्रभावित झालेला होता. 1929 सालच्या अखेरीस यशवंतराव चव्हाण काँग्रेस पक्षाकडे आकृष्ट होऊ लागलेले होते. दरम्यानच्या काळात ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसह काही रॉयवादी विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात आले व प्रभावितही झाले. मात्र यशवंतरावांचा मुख्यत: ओढा हा महात्मा गांधी व पं. नेहरू यांच्या विचारसरणीकडेच होता. पुढच्या काही वर्षांत मानवेंद्रनाथ रॉय यांचे काँग्रेसशी असलेले वैचारिक मतभेद टोकाला गेले. त्या वळणावर आपण काँग्रेसबरोबरच राहायचे हा निर्णय यशवंतराव चव्हाण यांनी मनाशी ठामपणे घेतला.
ज्या सहकाराला हाताला धरून आजचा महाराष्ट्र यशवंतरावांनी उभा केला त्या सहकाराला पुन्हा स्फुरण देऊन, भ्रष्टाचार मुक्त करून सशक्त आणि आर्थिक संपन्नेतेचे माहेरघर महाराष्ट्राला बनवण्यासाठी सर्वांनी मुख्यतः तरुणांनी पुढे यायला हवे असे त्यांना वाटत होते. भांडवलशाही स्वतःलाच गिळंकृत करत असतांना आणि समाजवाद भरकटत जात असतांना पुन्हा लोक सहभागाची, लोकांची लोकांसाठी आर्थिक व्यवस्था अतिशय महत्वाची आहे अशी त्यांची मते होती. काही पाश्चिमात्य देशात शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे त्यांचे औद्योगिक धोरण भारतात आणणे चुकीचे आहे. कृषीकडे दुर्लक्ष केल्याने देशात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. सहकार व कृषी औद्योगिक विकास आणि ग्रामीण विकासाची यशवंतराव चव्हाण यांची मांडणी आज हवी तशी स्वीकारली जात नाही. सद्द्यस्थितीत महाराष्ट्राला त्याचीच आवश्यकता आहे.
यशवंतरावांच्या जन्म शताब्दी वर्षात काही संकल्प :-
१) समजूतदार, शिकलेल्या आणि पुरोगामी विचारांच्या राजकारण्यांची निर्मिती, २) ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन आणि मदत, ३) सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी नव्या पिढीवर तसे संस्कार, ४) साहित्य, खेळ आणि माणूस म्हणून जगतांना लागणाऱ्या सर्व मुल्यांची नव्याने येणाऱ्या पिढ्यांना पुन्हा ओळख.
सध्याच्या पिढीला यशवंतरावांसारखा राजकीय नेता झाला होता हे सांगितले तर खरच विश्वास ही बसणार नाही इतकी दुर्दैवी अवस्था आज राजकारणाची झाली आहे; आणि म्हणून चांगले लोक या पासून चार हात नव्हे तर चार-पाच किलोमीटर लांबच राहतात. यशवंतरावांनंतर त्यांच्या विचारला गवसणी घालून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे एकही नेतृत्व आज राहिले नाही. महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांत मागे राहिला आहे. यशवंतरावानंतर जातिवादावर अस्मिता जपणारे संघटन वाढू लागले आहे पर्यायी चुकीची धोरणाने, भ्रष्ट व्यवस्था आणि जनतेचीच पुन्हा कुचंबणा व्हायला लागली याला मुख्य कारण म्हणजे यशवंतरावांसारखे नेतृत्व दृष्टी आड करणे, ते न अभ्यासाणे हेच होय.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येणारा एक ग्रामीण तरुण पुढे राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि उप-पंतप्रधान होतो; भारत-पाक युद्धात देशाची मान ताठ ठेवतो आणि सगळ्या सोबतच कविता, लेखक, शेतकरी, उद्योजक, कामगार आणि सामान्य माणूस यांच्यात सारखाच रमतो; हे चित्र आणि हा प्रवास आश्चर्यचकित करणारा आणि खूप प्रेरक आहे. त्यांच्या या विचारांच्या मुशीतून या देशाचा तरुण गेला तर, आर्थिक तर होईलच पण माणुसकीची महासत्ता म्हणून अव्वल राहणे या राष्ट्राला सहजच शक्य होईल.
गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी झेप घेतली. सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी इ.स. १९१३ मध्ये जन्मलेल्या यशवंतरावांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी-निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास भोगला. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) इ.स. १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.
इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या.
पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास), राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास) कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास) १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना) मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठाची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास), राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास), मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींपासून ते ना. धो. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.
यशवंतरावांची ग्रंथसंपदा
आपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)
ॠणानुबंध (आत्मचरित्रपर लेख) (१९७५)
कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४)
भूमिका (१९७९)
महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)
विदेश दर्शन – (यशवंतराव यांनी परदेशाहून सौ.वेणूताईंस पाठविलेल्या निवडक पत्रांचा संग्रह) (१९८८)
आपल्या बॅंकेच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे आपली पत्नी वेणूताई यांना परदेश दौऱ्यावर नेण्याची इच्छा असतानाही यशवंतरावांना घेऊन जाता आले नाही ही गोष्ट आत्ताच्या राजकारण धुरंधरांनी लक्षात ठेवावी अशी आहे. असो.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ व श्रेष्ठ व्यक्तिमत्वाला अभिवादन करून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष (१३ मार्च २०१२ ते १२ मार्च २०१३) या काळात साजरे करून त्यांच्या स्मृती कायम जागवत ठेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र..!!
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply