यशाचा मार्ग दाखविणारे यशस्वी दुकानदारी
आपला प्रत्येकाचा दुकानांशी जवळ जवळ रोज संबंध येतो. पण दुकानदारीच्या जगाबद्दल आपल्याला काहीच माहित नसते. लहान मोठे दुकानदार त्यांच्या दुकानदारीच्या विविध तऱ्हा, त्यांचे अनंत प्रश्न, अर्थव्यवस्थेत रिटेल दुकानदारीचे स्थान, महत्व, व्यवसायाचे विविध पैलू यावर सांगोपांग विवेचन करणारे मराठीतील पहिले व एकमेव पुस्तक. उद्योग व्यवसायासंबंधी सातत्याने लिहिणारे प्रसिद्ध लेखक श्री. दिलीप गोडबोले यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. प्रत्येक मराठी उद्योग/व्यावसायिकाने अवश्य वाचावे, संग्रही बाळगावे आणि इतरांना भेट द्यावे, असेन अनमोल पुस्तक पृ. 158 किं. 160रू. ISBN : 978-93-80232-29-4
श्री. दिलीप गोडबोले यांचे “यशस्वी दुकानदारी” हे नागपूर येथील नचिकेत प्रकाशनने प्रकाशित केलेले उत्तम पुस्तक वाचण्यात आले. पुस्तकाच्या नावावरून कदाचित तुम्ही या पुस्तकाकडे दुर्लक्ष कराल. परंतु असे करू नका. अन्यथा तुम्ही एका चांगल्या पुस्तकाला मुकाल, असे येथे सांगावेसे वाटते.
पुस्तक प्रारंभापासून ते शेवटपर्यंत वाचनीय आहे. विशेष म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारातील मानवी पैलू पुस्तकात उलगडून दाखविण्यात आले आहेत.
पूर्वी चार पैसे वा चार आणे घेऊन गेलो तरी दुकानदार ग्राहकांना वस्तू देत होता. आज मात्र स्थिती फार बदलली आहे. आज पाच रुपयाला साधी फुलपुडी देण्यासही दुकानदार तयार नसतो. एक-दोन रूपयाच्या मिरच्या, कोशिंबीर देण्यास नकार देतात. कोणत्या परग्रहावरून हे गिऱ्हाईक आले आहे? अशा रीतीने दुकानदार ग्राहकाकडे बघतो. थोडक्यात दुकानदार व ग्राहक यांच्या स्वभावांचे वर्णन पुस्तकात रेखाटण्यात आले आहे. पूर्वीचे दुकानदार प्राप्त स्थितीत दुकान चालवीत असत. आज स्थिती पार बदलली आहे. आज दुकानदाराजवळ मोबाईल, संगणक, सीसीटीव्ही, कॅमेरे आदी वस्तू गरजेच्या झाल्या आहेत. आज अनेक मोठ्या शहरांत मॉल निर्माण होऊ लागले असले तरी दुकानदारी करण्याच्या व्यवहारात मात्र फारसा फरक पडलेला नाही. आज तुम्ही सोबत पैसा घेऊन जा आणि टाचणीपासून ते चार चाकी गाडीपर्यंतच्या वस्तू एकाच छताखाली मॉलमधून घरी घेऊन येऊ शकता. ग्राहकाला खूष करण्यासाठी, त्याला आकर्षित करण्यासाठी दुकानदार हरप्रकारे प्रयत्न करीत असतो. भारतात अनेक शहरांत मॉल उघडले असले तरी अनेक शहरात, महानगरांत एवढेच नव्हे तर लहान लहान गाव व खेड्यांत छोट्या दुकानांच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू असते. थोडक्यात दुकानांचे स्वरूप बदलले तरी दुकानदारी मात्र कायम राहणार आहे.
दिलीप गोडबोले यांनी “यशस्वी दुकानदारी” या पुस्तकातून लहानमोठ्या सर्व प्रकारचा व्यवसाय करणार्या दुकानदारांना कोणकोणत्या अडचणी येतात? त्यातून कसा मार्ग काढावयाचा? कोठे चुकत आहे? रोजच्या रोज हिशोब व भावाचा आढावा घेणे कसे आवश्यक आहे. आदींचे योग्य मार्गदर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. यशस्वी दुकानदार म्हणून कसे नावलौकिकास यावे, याबद्दल सांगितले आहे. लेखक स्वत: दुकान चालवीत मग हळूहळू कारखानदारीकडे वळल्यामुळे त्यास छोट्या दुकानदारांच्या समस्यांची चांगली जाणीव आहे. दुकानदारीपासून ते कारखानदारीपर्यंतचा त्यांचा प्रवास झालेला असल्याने त्यांच्या अनुभवांचे प्रतिबिंब या पुस्तकात पडलेले ठायी ठायी दिसून येते व म्हणूनच या पुस्तकाला एक वेगळा वजनदारपणा आला आहे.
या पुस्तकातील एकूण 30 प्रकरणांच्या माध्यमातून यशस्वी दुकानदार होण्यासाठी काय काय करावे व काय काय करू नये याची इत्यंभूत माहिती लेखकाने दिली आहे. तसे तर पुस्तकातील प्रत्येकच प्रकरण वाचनीय आहे. तरीही त्यात दुकानदारी का व कशासाठी? ग्राहक हाच राजा, दुकानाचे गुडविल, हिशोबाचे महत्व, दुकानदारीच्या प्रगतीची महत्वाची सूत्रे, स्पर्धेत टिकून राहण्याचे मार्ग, दुकानदारीतून व्यक्तिमत्व विकास, दुकानदारीची नीतीमूल्ये, छोटे दुकान-मोठे दुकान, आर्थिक नियोजन, विनम्रतेचे महत्व, दुकानदारीतील चोरी समस्या व जागता पहारा, दुकानदारांच्या समस्या व त्यांच्या समोरील यक्षप्रश्न आदी प्रकरणे दुकानदारीसाठी फारच उपयुक्त व महत्वाची आहेत.
आज बाजारात उद्योजक, व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु छोट्या दुकानदारांसाठी इतके तळमळीने लिहिलेले हे बहुधा पहिले पुस्तक असावे, असे वाटते. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात लहान दुकानदार मेटाकुटीस आला आहे, असे सांगत त्यातही आपली दुकानदारी यशस्वीपणे कशी टिकवून ठेवता येईल, याच्या चार युक्तीच्या गोष्टी लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध पैलूंवर अत्यंत सोप्या भाषेत विवेचन केले आहे. मुख्य म्हणजे पुस्तक वाचतांना अजिबात कंटाळा येत नाही.
दुकानदार हा उद्योजक म्हणून जरी समजला जात नसला तरी त्यातही छोट्या दुकानदारांची काही वैशिष्ट्ये आहेत, समस्या आहेत. स्वरूप आहे आणि व्यवसायाचे एक तंत्र आहे. या सर्वांचा या पुस्तकात लेखकाने परामर्श घेतला आहे.
158 पानांचे हे पुस्तक केवळ दुकानदारांसाठी नव्हे तर ग्राहकांसाठीही तितकेच उपयुक्त आहे. ग्राहकाच्या दृष्टीने दुकानदार कसा असावा? याचे यात विवेचन असल्याने कोणत्या दुकानात ग्राहकाला कशी वागणूक मिळते, त्यावरून दुकानदार यशस्वी वा अपयशी ठरत असतो.
एकूणच काय तर “यशस्वी दुकानदारी” हे पुस्तक लिहून दिलीप गोडबोले यांनी एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे पुस्तक दिले आहे. तर नचिकेत प्रकाशन अशा लेखकाचे विचार पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहे. प्रत्येक प्रकरणात सुसंगत चित्रे आणि प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी त्या प्रकरणाचा सारांश यामुळे पुस्तक अधिकच उठावदार झाले आहे. कोणतेही प्रकरण केव्हाही वाचले तर चालेल असे हे लिखाण आहे.
विलास कुळकर्णी पाने : १५८ किंमत : १६० रु.
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply