साहेब, आपल्या देशात कायदा कानून नावाची चीज अजिबात अस्तित्वात नाही. खरा कायदा इराकमध्ये आहे. इराणमध्ये आहे. आणि आबुधाबीमध्ये आहे. तिथे आज गुन्हा केला की उद्या लगेच शिक्षा होते. ती शिक्षाही इतकी भयानक असते की, तो गुन्हेगार तर सोडाच पण त्याचे शेजारी-पाजारी, गाववाले, शहरवाले, तिथे राहणार्या सात पिढ्या फक्त शिक्षा ऐकून चळाचळा कापतात. आणि आमच्या इथे! सगळा उलटा प्रकार. आम्ही तर इथे गुन्हेगारांना मस्तपैकी खाऊ-पिऊ घालतो. शेकडो लोकांना मारणार्या कसाबसारख्याला सुख-सुविधा देण्याविषयी काळजी घेतो. कितीही मोठे वाईट काम केले असेल अथवा कितीही मोठा गुन्हा केला असेल, त्याला आयुष्यभरात कधीच शिक्षा होत नाही. कित्येक वर्षानंतर एका न्यायालयाचा निकाल येतो. मग दुसरा आणि पुढे तिसरा. अपील करत करतच पीडित आणि गुन्हेगार आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवतात.
आणि साहेब …! नारायणला गप्प बसवत नाही. बोलतच राहतो. त्याच्या बोलण्यातून असं वाटतं की त्याच्या मनात कित्येक वर्षांचा राग खदखदत आहे. तो आमच्या सांगलीतल्या हौसिंग सोसायटीत पिठाची गिरण चालवतो. त्याची आणि माझी ओळख इतकीच की मी दुसार्यांदा त्याच्या गिरणीत गहू दळायला घेऊन गेलो होतो. आम्ही दोघेही एकमेकांसाठी अपरिचित होतो. बोलणं संपता संपता मीच त्याला त्याचं नाव विचारलं होतं त्यानं आपलं खरंखुरं नाव सांगितलं असावं कारण नंतर तो सावध होऊन माझ्याकडे पाहात होता. पण या अगोदर इतकं काही-बाही बोलला होता की मनात आणलं असतं तर वृतपत्राचं अख्खं पान भरून गेलं असतं.
गिरणीत गर्दी होती. दळपाची वाट पाहून पाहून ताटकळून गेलो होतो. म्हणून त्याने वाचायला पेपर देऊ केला. पेपर वाचल्याचे सांगून उलट त्याला मीच प्रश्न केला.’ आज तुम्हाला कोणकोणत्या बातम्या चांगल्या वाटल्या?’ त्यावर तो भडकलाच. साहेब, चांगल्या बातम्या आजकाल पेपरात छापून येतातच कुठं? खून, मारामार्या, चोर्या, बलात्कार या बातम्यांनीच पेपर भरलेला असतो. कुठे जागा राहिलीच तर तिथे भ्रष्टाचाराची बातमी देऊन जागा भरून टाकली जाते. आता आजचाच पेपर घ्या. दोघा बहीण-भावाला किती निर्दयीपणानं मारून टाकलंय. साहेब, गॅरंटीनं सांगतो. मारणार्याचं काहीही वाकडं होतं नाही. ते मोठं कोर्टसुद्धा सगळं होऊनही त्यांची सुटका करील. त्याला तर शिक्षा वरचा देवच देईल. तो बोलतच होता, गिरणीतल्या पट्ट्यासारखा! आणि मी फक्त आणि फक्त त्याचं ऐकत होतो. पण आत दडलेला पत्रकार स्वस्थ बसण्याचं नाव घेत नव्हता. शेवटी आतला पत्रकार बोललाच! नारायणराव, आपल्या देशात कायदयाचं राज्य आहे. ज्या देशाची तुम्ही मघाशी नावं घेतलीत, तिथे हुकुमशाहीचं राज्य आहे. इतकं ऐकल्यावर तर तो आणखी भडकला. कायदयाचं राज्य कोणासाठी आहे, सांगा. लोकांसाठीचं ना? पण काश्मिरपासून, कन्याकुमारीपर्यंत माणसं किड्या-मुंग्यासारखी मरत चालली आहेत. कुठे नक्षलंकडून तर कुठे अतिरेक्यांकडून. आणि कुठे कुठे गुंडांकडून! तुम्ही कुठल्या कायद्याच्या गोष्टी करता? अण्णा हजारे भ्रष्टाचार संपविण्यासाठी उपोषण- आंदोलन करताहेत. आणि त्यांचेच सहकारी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत आहेत. काय केलं तुमच्या ह्या कायद्यानं? तुम्ही जरा शहरातनं फिरून या. किती तरी माणसं हेल्मेट न घालता गाडी चालवताना दिसतील. त्यांचं कुणी वाकडं केलं आहे? आज म्हणे डॉक्टरांचा संप, उद्या वकिलांचा! तिसर्या दिवशी बस आणि रिक्षावाल्यांचा! या देशात कुठेही जा, तुम्हाला संप, बंदशिवाय काही दिसणारच नाही. अहो, तुम्हाला माहित नाही. आपल्याला एक डॉक्टर घडवायला त्याच्या बापाचे चार लाख आणि सरकारचे १० लाख खर्च होतात. आणि हा डॉक्टर बनल्यावर लोकांची सेवा तर जाऊ देच पण त्यांना लुबाडायला सुरूवात करतो. वर्षभरात त्याच्या दवाखान्याचे इमलेच्या इमले उभारलेले दिसतात. त्याच्याकडे इतक्या लवकर इतके पैसे आले कुठून? त्याला कोण आडवतं? कुणीच नाही.
सरकार चांगल्या चांगल्या योजना राबवत. पण त्याचा पैसा मधल्या मधे दलाल खाऊन टाकतात. साहेब, मिशा भादरून टाकीन, या कलमाडी आणि कनिमोझींना शिक्षा झाली तर…! तुम्ही कुठल्या कायद्याची बात करता..? तो आता थरथरत होता. खरं सांगतो, तिथल्या तिथे त्याचा ब्लड प्रेशर तपासला असता तर नक्कीच हाय असता! त्याच्या बोलण्याने सकाळी सकाळी माझीही खोपडी गरम झाली होती. बरं झालं, तेवढ्यात माझं दळप पूर्ण झालं. पैसे चुकते करून मी मुकाट्याने पिठाची पिशवी घेऊन गाडीकडे सरकलो. मला वाटलं, मी आणखी काही वेळ तिथे थांबलो असतो तर, माझाही बीपी हाय झाला असता. माझ्याविषयी त्याला काही माहिती नव्हती, ते एक बरे झाले! मी पत्रकार आहे, हे जर का त्याला कळले असते तर तो नक्कीच काही बोलला नसता. साहेब, तुम्ही तर पत्रकार, तुम्हाला सारं ठाऊक आहे. ( भलेही आम्हाला त्याची काही माहिती नसती तरीही…) असे म्हणून गप्प बसला असता. माझंच ऐकत बसला असता. माझं काही चुकलं असलं तरी पत्रकाराला नाराज का करा किंवा काहीशा भीतीपोटी गपगार बसला असता. घरी आल्यावर विचार करत होतो की आपण सगळे किती मूर्ख! पब्लिकला काही कळत नाही, अशा भ्रमात आपण जगत असतो. मग तो पत्रकार असो अथवा डॉक्टर! वकिल असो किंवा अधिकारी अथवा मग पुढारी. पण आपला तो भ्रम असतो. पब्लिकला सारं काही कळत असतो. पत्रकार काय लिहितो आहे, का लिहितो आहे? जनता सगळे ओळखत असते. डॉक्टर कोणतं औषध लिहितो आहे, का लिहितो आहे? तपासण्या कमी- जास्त का करतो आहे? हेसुद्धा त्याला ठाऊक असते. वकील तारखा का घेतो आहे? आणि डॉक्टर, कर्मचारी संपावर का जातो आहे? आणि भेसळ विरोधात कारवाई व्हायला लागल्यावर व्यापारी आपले दुकान बंद करून का जातो आहे, हे सगळं, जनता जाणत असते. आपण मात्र जे काम करतो आहे, ते काम आपल्याशिवाय कुणालाच माहित नाही, अशा अविर्भावात असतो. पण वास्तवात तसं नसतं. ये पब्लिक है, सब जानती ह ै…!
– मच्छिंद्र ऐनापुरे,संभाजी चौक, जत ता. जत जि. सांगली ४१६४०४ फोन- ९४२३३६८९७०
— मच्छिंद्र ऐनापुरे
Leave a Reply