रग्बी हा खेळ पाश्चात्य देशांमध्ये खेळला जातो. या खेळात शक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. हा खेळ हळूहळू भारतातही रुजत असून राज्य आणि देशपातळीवरील विविध स्पर्धांमधून गुणी खेळाडू पुढे येत आहेत. अनेक बाबतीत अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य राखणार्या या खेळासाठी शक्ती, कौशल्ये आणि चापल्य यांचा त्रिवेणी संगम आवश्यक
असतो. आदित्य पागे या उदयोन्मुख रग्बी खेळाडूकडून समोर आलेली माहिती.’रग्बी’ हा खेळ धसमुसळा आणि शक्तीला अधिक महत्त्व देणारा असतो, या खेळाडूंमध्ये दुखापती होण्याचे प्रमाण अधिक असते आणि विशेष म्हणजे तो आपल्यासाठी नाही असाच सर्वसामान्य भारतीयांचा समज असतो. रग्बी या खेळात पाश्चिमात्य देश अधिक पुढे आहेत. पण, भारतातही हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो हे अनेकांना माहित नसेल. रग्बी या खेळात भारताचा क्रमांक 64 किवा 65 वा आहे. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर अगदी अव्वल दर्जाची कामगिरी करत नसलो तरी भारतीय संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतो हेही नसे थोडके.देशात प्रत्येक मोठ्या शहरांचे रग्बी संघ आहेत. तसेच राज्यांचेही आहेत. काही शहरांमध्ये एकाहून अधिक संघही आहेत. हे संघ वेगवेगळ्या स्तरांवर एकमेकांशी लढतात. देशात रग्बीची रचना डिव्हिजनप्रमाणे केली जाते. त्यात फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन आणि थर्ड डिव्हिजन अशा पातळ्यांवर स्पर्धा घेतल्या जातात. थर्ड डिव्हिजन्स स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघ सेकंड डिव्हिजनमध्ये खेळण्यासाठी पात्र होतात. सेकंड डिव्हिजन स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघ फर्स्ट डिव्हिजनमध्ये खेळण्यास पात्र ठरतात. सेकंड डिव्हिजनमध्ये तळाशी राहिलेल्या दोन संघांना थर्ड डिव्हिजनमध्ये खेळावे लागते. फर्स्ट डिव्हिजनमधील तळाच्या दोन संघांना सेकंड डिव्हिजनमध्ये खेळावे लागते. प्रत्येक
िव्हिजनमध्ये 12 संघांचा समावेश असतो. राष्ट्रीय संघाची निवड फर्स्ट डिव्हिजन स्पर्धांमधील कामगिरीवरून केली जाते.पुणे शहराच्या आरएफएस या संघाने ‘कॅलान कप’ या सेकंड डिव्हिजन स्पर्धेत उपविजेतेपद मिळवल्याने हा संघ आता पुढील
वर्षी होणार्या फर्स्ट डिव्हिजन स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. या संघातील उदयोन्मुख खेळाडू आदित्य पागे याच्याशी बोलण्याचा योग आला. आपला क्लब आणि क्लबचे संचालक यांच्याबद्दल आदित्य भरभरून बोलतो. तो म्हणतो, ‘पुण्यात रग्बी या खेळाची सुरुवात सुहृद आणि स्वप्निल या खरे बंधूंनी केली. दक्षिण अफ्रिकेत असताना त्यांची या खेळाशी ओळख झाली. पुण्यात परत आल्यानंतर इथल्या मातीत हा खेळ रुजवायचा म्हणून त्यांनी ‘कफँड्रा’ (खरेज फूटबॉल अॅन्ड रग्बी अॅकॅडमी) ही संस्था सुरू केली. त्यांच्या रग्बी संघाचे नाव ‘पुणे रग्बी’ असे होते. आता हा संघ ‘आरएफएस पुणे’ या नावाने ओळखला जातो. या क्लबमध्ये 8, 11 आणि 15 वर्षांखालील मुलांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच मुलींचेही संघ आहेत. सुहृद खरे यांच्या कठोर परिश्रमांमुळे सध्या 20 वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय संघात पुण्याच्या चार मुलांचा समावेश आहे तर महिलांच्या संघात पुण्यातील 11 महिलांचा समावेश आहे. पुण्याचा महिला संघ देशातील पहिल्या दोन संघांमध्ये गणला जातो.’देशातील रग्बीचा हंगाम जूनमध्ये सुरू होतो. या हंगामात 20 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धा होतात. तसेच बॉम्बे क्लब आणि पुणे क्लब या राज्यस्तरावरील स्पर्धाही होतात. या स्पर्धा थर्ड डिव्हिजनमध्ये मोडतात. कॅलान कप ही स्पर्धा सेकंड डिव्हिजनमध्ये मोडते. त्यानंतर ‘ऑल इंडिया’ ही थर्ड डिव्हिजन स्पर्धा होते. या स्पर्धेतील कामगिरीवरून राष्ट्रीय संघाची निवड केली जाते. आरएफएस पुणेचे मुख्य प्रशिक्षक सुहृद खरे आहेत तर यापूर्वी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व
केलेले आणि भारतीय लष्कराच्या संघातून खेळलेले संदीप सिंग आरएफएस पुणेमध्ये खेळाडू आणि ज्येष्ठ मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. रग्बी या खेळात 7, 10 किवा 15 खेळाडू खेळतात. खेळाडूंच्या संख्येनुसार त्या खेळाला सेव्हन्स, टेन्स आणि फिप्टीन्स असे म्हटले जाते. 15 खेळाडूंच्या रग्बीमध्ये मैदानावर 15 खेळाडू खेळत असतात तर पाच बदली खेळाडू (सब्स्टिट्यूट) असतात. म्हणजे एक संघ 20 ते 24 खेळाडूंचा असू शकतो.रग्बीमध्ये खेळाडूंना लागू नये म्हणून मठ्या प्रमाणावर पॅडिंग केले जाते ही समजूत चुकीची आहे. यात खांद्याला दुखापत होऊ नये म्हणून एक ते दोन इंचांच्या स्पंजचे पॅडिंग केलेले असते. डोक्याला खेळाडूंच्या बुटांमधील खिळे (स्टड्स) लागू नये म्हणून पातळ पॅडिग असते आणि तोंडाला माऊथगार्ड लावलेला असतो. या व्यतिरिक्त फारसे संरक्षण नसते. बरेचदा खेळाडू हे संरक्षणही नाकारतात. रग्बी आणि अमेरिकन फूटबॉलमध्ये बरेच साम्य असले तरी अमेरिकन फूटबॉल अधिक धसमुसळा असून त्यात दुखापतीची शक्यता असते. दोन्ही खेळांमध्ये बॉलचा आकार दोन्ही बाजूला चिचोळा असतो. या विशिष्ट आकारामुळे हवेचा प्रतिरोध कमी होऊन चेंडू अधिक दूरवर मारणे शक्य होते. रग्बीचा चेंडू अमेरिकन फूटबॉलच्या मानाने मोठा असतो. अमेरिकन फूटबॉलमध्ये फॉरवर्ड पास (पोलच्या दिशेने चेंडू घेऊन जात असताना आपल्या पुढे असलेल्या सहकारी खेळाडूकडे सोपवणे) करता येतो. परंतु, रग्बीमध्ये फॉरवर्ड पास करता येत नाही. चेंडू आपल्यापेक्षा मागे असलेल्या खेळाडूकडेच द्यावा लागतो नाही तर स्वत: घेऊन पुढे जात रहावे लागते.रग्बीमध्ये चेंडू पोलच्या पलीकडे नेऊन खाली ठेवल्यावर पाच गुण मिळतात. पेनल्टी मिळाल्यावर चेंडू दोन पोलच्या मधून गेला तर तीन गुण मिळतात. हा खेळ शरीराने धिपाड असलेल्या खेळाडूंसाठीच असल्याचाच आणखी एक गैरसमज आहे. या खेळात शक्तीबरोबरच
ेग आणि कौशल्यही महत्त्वाचे असते. पुण्याच्या संघात 64 किलो वजनापासून 120 किलो वजनापर्यंतचे खेळाडू आहेत. फूटबॉलप्रमाणेच रग्बीही दोन सत्रांमध्ये खेळला जातो. पहिले सत्र 40 मिनिटांचे असते. मध्ये दहा मिनिटांची विश्रांती आणि त्यानंतर पुन्हा 40 मिनिटांचे दुसरे सत्र असते. रग्बीचे मैदान फूटबॉलच्या मैदानापेक्षा काहीसे मोठे असते.या खेळात खेळाडूचा फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो. रग्बीच्या खेळाडूला 80 मिनिटे सतत धावत रहावे लागते. तसेच प्रतिस्पर्धी
संघाच्या खेळाडूंशी लढताना शक्तीचाही वापर करावा लागतो. टॅकल, स्क्रम्स,
लाईन आऊट्स यासाठी भरपूर शक्ती आणि स्टॅमिना लागतो. व्यावसायिक रग्बी खेळाडूंना रोजचा भरपूर व्यायाम आणि त्यानुसार खुराक घ्यावा लागतो. इतर खेळाच्या खेळाडूंना त्या त्या खेळाच्या मागणीनुसार हात, पाय, अप्पर किंवा लोअर बॉडीज अधिक विकसित करावी लागते. परंतु, रग्बीच्या खेळाडूंना संपूर्ण शरीर विकसित करावे लागते. हे खेळाडू इतर कोणत्याही खेळाच्या खेळाडूंपेक्षा फीट मानले जातात. कोणत्याही खेळाप्रमाणेच या खेळातही खेळाडूंना दुखापती होतात. परंतु, त्यांचे प्रमाण खूप असते असे नाही. एका पाहणीनुसार एका हंगामात रग्बीच्या खेळाडूंपेक्षा फूटबॉलच्या खेळाडूंना अधिक दुखापती झाल्याचे आढळून आले आहे. रग्बीच्या खेळाडूंना खांद्यांच्या दुखापती होण्याचे प्रमाण अधिक असते.भारतात सरकारकडून रग्बीच्या विकासासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत. रग्बीसाठी चांगल्या मैदानाची आवश्यकता असते. तशी मैदानेही कमी आहेत. खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाल्या तर भारतीय रग्बीचा विकास होऊ शकेल. जगातील न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेल्स हे संघ अव्वल मानले जातात. इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताची आगेकूच सुरू असताना रग्बीमध्येही चांगले मानांकन मिळावे
शी आदित्यची इच्छा आहे.
(अद्वैत फीचर्स)
या लेखासाठीचे फोटो www.rfspune.com या वेबसाईटवर आहेत. कृपया काढून घ्यावेत.
— महेश धर्माधिकारी
Niyam Kay aahet?