चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर “भूमिका’सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.
हंसाबाईंचा जन्म मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर. नृत्य-संगीताची त्यांच्या घरी परंपराच होती. रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. रतनवरचं पितृछत्र तिच्या लहानपणीच हरवलं. तेव्हा रतनला तिच्या आई आणि आजीनं वाढवलं. रतनला संगीत आणि नृत्याचे धडे देण्यासाठी तिच्या आईनं त्या काळातले मोठमोठे उस्ताद आणि गवई यांना पाचारण केलं होतं. परंतु रतनचा सूर त्यांच्याशी काही जुळला नाही. उस्ताद घरी आले की रतन एकतर घरातून पळ काढे किंवा कुठं तरी लपून बसे. तेव्हा बयाबाईंनीच आपल्या नातीच्या जडणघडणीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या स्वतः रतनला शिकवायला लागल्या. गाण्यातली एक ओळ किती वेगवेगळे भाव दाखवून गाता येते, याचं प्रशिक्षण त्यांनी रतनला दिलं. रतन आपल्या आजीला “जीजी’ या नावानं हाक मारीत असे. मराठी-हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. काही काळातच रतन तयार झाली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मामा वरेरकर या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटासाठी रतन साळगावकरचं “हंसा वाडकर’ असं नामकरण झालं. त्या काळात चित्रपटसृष्टीबाबत कोणी फारसं चांगलं बोलत नसे. त्यामुळे या क्षेत्रातील आपल्या प्रवेशाचे चटके आपल्या कुटुंबीयांना बसू नयेत, या विचारानं रतननं आपलं नाव आणि आडनाव दोन्हीही बदललं. अर्थात हे नाव पुढं आयुष्यभरासाठी त्यांच्याशी जोडलं गेलं. तो काळ असा होता, की मुलींची लग्न १५व्या- १६व्या वर्षी होत. चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या हंसाबाईंना समाजाच्या या रूढीपुढं नमावं लागलं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि इथून त्यांच्या वादळी आयुष्याची सुरवात झाली. हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते “प्रभात’च्या “संत सखू’ चित्रपटानं. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती. या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या “लोकशाहीर राम जोशी’ या चित्रपटामध्ये साकारली. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. “…सुंदरा मनामंदी भरली… हवेलीत शिरली… जरा नाही ठरली… मोत्याचा भांग….’ या रामजोशींच्या काव्यानं आणि हंसाबाईंच्या ठसक्याशनं बहार आणली. या दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. परंतु आपल्या अदाकारीनं हंसाबाईनं हे अंतर पुसून टाकलं. गोरा वर्ण, सतेज कांती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि या जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी… सात दशकांपूर्वीच्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अप्सरा होत्या.
“रामजोशी’ चित्रपट सुपरहिट ठरला आणि हंसाबाईंना व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी त्यांना मिळाली; मात्र अंगभूत गुणवत्ता, प्रचंड लोकप्रियता मिळूनही ती “कॅश’ करण्याची कल्पकता हंसाबाईंना दाखविता आली नाही. या काळात त्यांनी “रामशास्त्री’, “धन्यवाद’, “पुढचं पाऊल’, “मी तुळस तुझ्या अंगणी’, “नायकिणीचा सज्जा’, “सांगत्ये ऐका’ यांसारखे मोजकेच चित्रपट केले. त्याला मुख्य कारण ठरलं ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील संकटं. पतीबरोबरील मतभेदांमुळे त्यांनी एका क्षणी घर सोडलं आणि पुढं त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेलं. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक घडामोडींना कारकिर्दीपासून दूर ठेवण्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे चांगल्या भूमिका मिळण्याची संधी असूनही तिचा लाभ त्यांना उठवता आला नाही. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर जगतामध्ये वाहवत जाण्याची कारणमीमांसा त्यांनी “सांगत्ये ऐका’ या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. “चित्रपटसृष्टी म्हणजे एक जाळं आहे. या जाळ्यात जो अडकला त्याची सुटका नाही,’ असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. तो खरा की खोटा हा वादाचा विषय आहे. मात्र ग्लॅमर जगतामध्ये कलावंत जोपर्यंत प्रकाशझोतात आहे, तोपर्यंतच त्याचं सर्व काही सुरळीत सुरू असतं. एकदा हा प्रकाशझोत गेला की तो विस्मृतीच्या गर्तेत जातो. हंसाबाईंच्या उत्तरायुष्यात असंच काहीसं घडलं.
संकटं आली की ती एकट्यानं येत नाहीत, याचा अनुभव हंसाबाईंना आला. वैयक्तिक आयुष्यातील घसरण आणि कारकीर्द उतरणीला असतानाच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं गाठलं. या आजाराने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं. मुंबईतल्या ग्लॅमरस जगातून बाजूला होत त्या विश्रांतीसाठी बराच काळ महाबळेश्वारला जाऊन राहिल्या होत्या. एक काळ त्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यांच्या आजूबाजूला चित्रपटसृष्टीतील नामवंतांची गर्दी होती. स्टुडिओबाहेर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी असायची. परंतु ती गर्दी आता पांगली होती. एकटेपणा त्यांना अगदी असह्य झाला होता. आजारातून बरे होऊन पुन्हा कारकीर्द घडविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु हा लावण्यसूर्य जो ढळला तो ढळलाच. तो पुन्हा तेजोमय झाला नाही. आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी “सांगत्ये ऐका’ या आत्मचरित्राद्वारे लिहून ठेवली. त्यानं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर एके काळी खळबळ उडवून दिली होती. हे आत्मचरित्र “अभिनेत्री की आपबीती’ या शीर्षकानं हिंदी भाषेतही प्रसिद्ध झालं. या आत्मचरित्रावर वाचकांच्या उड्या पडल्या. चित्रपटसृष्टीतील नामवंतांचंही त्याकडे लक्ष गेलं. विख्यात लेखक-दिग्दर्शक श्यााम बेनेगल यांनाही त्याची भुरळ पडली आणि त्यांनी हंसाबाईंच्या चरित्रावर बेतलेला “भूमिका’ चित्रपट निर्माण केला. तोदेखील विलक्षण गाजला आणि या चित्रपटात हंसाबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हंसाबाईंच्या आयुष्यात वादळी घडामोडी घडल्या नसत्या तर आज त्यांना चित्रपटसृष्टीत खूप वेगळं स्थान मिळालं असतं. परंतु, तसं घडणारं नव्हतं. कारण हंसाबाई म्हणजे एक शापित सौंदर्य होतं. हंसा वाडकर यांचे निधन २३ ऑगस्ट १९७१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- मंदार जोशी /विकिपिडीया
Leave a Reply