माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची आराधना केल्यास सर्व रोग बरे होतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच सूर्याची आराधना केली जाते. रथसप्तमी याचा अर्थ सूर्याचा सारथी “आरुणी‘ सात घोडे असणाऱ्या रथाचे सारथ्य करीत असतो. मकरसंक्रांतीपासून सूर्य हा तीळ तीळ वाढत जातो. रथसप्तमीनंतर संक्रांतीची समाप्ती मानली जाते.
रथसप्तमीच्या दिवशी तुळशी वृंदावनाजवळ अंगणात सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी पाटावर रांगोळीने सूर्याची प्रतिमा किंवा काही ठिकाणी सूर्याची मंडळे काढली जातात. बारा आणि सात मंडळांचा गोलक असतो. ही संख्या शुभ मानली जाते. यावर विड्याची पाने, सुपारी ठेवून तांबडे गंध, तांबडी फुले वाहिली जातात. या दिवशी नैवद्याच्या खिरीला अत्यंत महत्त्व असते. मातीच्या सुगड्यात दूध, तांदूळ घालून ते भांडे अंगणात गोवऱ्या पेटवून दूध ऊतू जाईपर्यंत तापवितात. त्याचा प्रसाद कुटुंबीय ग्रहण करतात. यालाच “पायस‘ असे म्हणतात. या दिवशी नैवेद्याकरिता गुळाची पोळीदेखील करण्याची परंपरा आहे.
सकाळी सूर्याला सूर्यफूल टाकून अर्घ्य वाहिले जाते. “तुझ्याप्रमाणे माझे जीवन तेजोमय होऊ दे‘, अशी प्रार्थना सूर्याची 12 नावे घेऊन केली जाते. मात्र, ही पूजा सूर्याच्या साक्षीने अंगणातच करण्याचा दंडक आहे. सूर्याची उपासना आपल्याकडे हजारो वर्षांपासून रथसप्तमीच्या निमित्ताने करण्याचा प्रघात आहे. या दिवशी हळदीकुंकू वाटले जाते व सायंकाळी देवळात जाऊन संपूर्ण दिवस आनंदात घालविला जातो.
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply