रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय ।
टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l
अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते. विरही मीरा विचार करीत आहे, गगन मंडल पे सेज पिया की , किस विध मिलना होय. जर कान्हा वृंदावनात असता तर मीरा नावाच्या गोपीची हाक ऐकताच, एका क्षणात धाऊन आला असता. पण आधीच रुक्मिणी, सत्यभामा समेत अनेक पत्नींचे लफडे सोडविता-सोडविता द्वारकाधीश कृष्णाला नाकी नऊ येत होते, त्यात मीरेची आणखीन भर कशाला. मीरेच्या नशिबी आता विरह व्यथाच.
असा विचार करत-करत मी स्वामी त्रिकालदर्शींच्या आश्रमात पोहचलो. नेहमी प्रमाणे स्वामीजी ध्यानमग्न होते. मी ही त्यांच्या समोर बसलो. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले, स्वामी जी एक शंका आहे, मी म्हणालो. स्वामीजी म्हणाले बच्चा, हीच न तुझी शंका, त्यांनी एक श्लोक म्हंटला:
मुँह में राम बगल में छुरी
मित्राने-मित्राला मारली मिठी.
मी प्रश्नार्थक मुद्रेने स्वामीजी कड़े पाहिले, स्वामीजींच्या चेहर्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले, बच्चा, दोघे ही रामभक्त, सतत राम नाम जपणारे, मंदिर बनविण्याची जागा शोधण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यात त्यांना ‘तिलोत्तमा’ समान एक सुन्दर अप्सरा भेटली, आता सुन्दर नार समोर दिसली की कलह हा होणारच. त्यांना मित्रतेचा विसर पडला, हातातली रामनामी माळ ही त्यांनी फेकून दिली आणि बगलेत लपवलेली छुरी हातात घेऊन सुन्द-उपसुंद प्रमाणे एक दुसर्यावर तुटून पडले. स्वामीजी बोलता बोलता थांबले. माझ्या डोळ्यांसमोर शिवाजी महाराज आणि अफज़ल खान ची भेटीचे दृश्य तरळले. एका दुसर्याच्या रक्ताने न्हालेले मित्र पुन्हा जवळ येणे शक्य नाही. आले तरी पहिले सारखे प्रेम उरणार नाही. मी म्हणालो, स्वामीजी, आता मला रहीमदासच्या दोह्याचा अर्थ कळला. पण तरीही एक शंका मनात येते. सांग बच्चा, काय शंका आहे, स्वामीजी म्हणाले. मी म्हणालो, स्वामीजी, अर्जुनाचा पौत्र परीक्षित हस्तिनापूरच्या गादीवर बसला होता. भारतीय युद्धात अर्जुनाने मोठा पराक्रम गाजविला होता, भीष्म पितामह, कर्णा सारख्या योद्धानां त्याने पराभूत केले होते, शिवाय असंख्य कौरव सैन्याला, आपल्या बाणांनी यमसदनी पाठविले होते. मोठा असला तरी काय झाले, युधिष्ठिरने युद्धात विशेष पराक्रम गाजविला नव्हता, हे सर्व पाहता कदाचित् युधिष्ठिरा एवजी अर्जुनच गादीवर बसला असेल. हा! हा! हा! स्वामीजी जोरात हसले, बच्चा, सद्य परिस्थिती पाहता, तुझे म्हणणे रास्त वाटते, कदाचित् असेही झाले असेल. पण त्या साठी पुन्हा एकदा महाभारत तपासून पाहावे लागेल, असे म्हणत स्वामी त्रिकालदर्शी पुन्हा ध्यानमग्न झाले.
— विवेक पटाईत
Leave a Reply