पुण्यासारख्या शहरातील मॉल संस्कृती आता ग्रामीण भागातही पोहोचणार आहे. पण, हे मॉल शहरातील त्या मॉल्ससारखे नसतील. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता शासनातर्फे प्रत्येक तालुक्यात असा मॉल उभारण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात असे १५ मॉल उभे राहणार असून त्याचे प्रस्तावही मागविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची लोकसंख्या १ लाख १४ हजार इतकी आहे. अशा नागरिकांचा आर्थिकस्तर उंचावण्याच्या हेतूने शासनाची ही योजना असून रायगड जिल्ह्यात याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अलिबाग येथे अद्ययावत विक्री केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु होईल. त्यासाठी गरज लागल्यास जिल्हा नियोजन व विकास समितीकडे अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येईल, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विभास भोसले यांनी सांगितले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार २२८ बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. या बचत गटांना प्रत्येकी २५ हजार रुपयांपर्यंत फिरता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
या माध्यमातून बचत गटाचे सदस्य दुग्ध व्यवसाय, भाजीपाला विक्री, ओली-सुकी मासळी, खानावळ, लोणची, मसाले, पापड तयार करुन विकणे, तयार वस्तू आणून विकणे अशा प्रकारचे छोटे-मोठे उद्योग करीत असतात. त्यांनी उत्पादित केलेल्या बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विभागीय प्रदर्शनाबरोबर मुंबई, गोवा, जयपूर, दिल्ली येथील सरस प्रदर्शनांमध्ये संधी दिली जाते. असे असेल तरी ही पुरेशी ठरत नाही. शिवाय, उत्पादित नाशवंत माल (उदा. मासे, भाजीपाला, दूध) साठवून ठेवण्याची व्यवस्था नसते. हे लक्षात घेऊन या विक्रीसाठी गाळयांबरोबर शीतपेट्याही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याशिवाय, मॉलच्या आवारात वाहने उभी करण्याची जागा, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहांची सोय असेल.
आधुनिक खाजगी व्यापारी संस्थांच्या मॉलप्रमाणे या विक्री केंद्रांना कार्पोरेट लूक देण्यात येईल.
राज्य शासनाने सन २००९-१० या आर्थिक वर्षात कायमस्वरुपी विक्री केंद्रे बांधण्यासाठी विक्री केंद्रे बांधण्यासाठी राज्यातील सबंधित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा एकूण २३ कोटी २५ लाख रुपये इतके अनुदान अर्थसकल्पीय वितरण प्रणालीव्दारे वितरीत केले आहे. या मॉल्सचा आराखडाही शासनाने ठरवून दिला असून त्याप्रामाणे बांधकाम करण्यात येणार आहे.
Mahanews
— बातमीदार
Leave a Reply