लग्नपत्रिका जुळत नाहीत म्ह्णून हल्ली बरीच लग्ने जुळता – जुळता मोडताना दिसतात. इतकेच नव्हे तर प्रेम करून लग्न करण्याच्या निर्णय घेतलेली लग्ने ही लग्नपत्रिका न जुळ्ल्यामुळे मोडताना दिसतात तेंव्हा मनात एक विनोदी विचार न राहून येतो तो म्ह्णजे हल्लीच्या तरूण – तरूणींनी एकमेकांच्या लग्नपत्रिका पाहूनच प्रेमात पडायला हवं ! काही महाभागानी हा प्रयोग प्रत्यक्षात केल्याचे ही माझ्या पाहण्यात आहे. हल्ली समाजात घटस्फोटाचे आणि विवाहबाहय अनैतिक संबंध आणि कौटूंबिक कलहाचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर समाजात प्रेमविवाहांच प्रमाण ही वाढताना दिसतय. बहूसंख्य प्रेमविवाह हे पत्रिका न जुळविता झालेले असतात. प्रेमविवाह केलेल्या जोडप्यांमध्ये घटस्फोटाच प्रमाण अधिक दिसत त्या मागची कारणे फारच वेगळी असतात पण त्याचा संबंध विनाकारणच लग्नपत्रिका जुळविण्याशी लावला जातो. पत्रिका जुळल्या आणि मनच जुळली नाहीत तर ते लग्न कस यशस्वी होणार ? लग्न जुळविणे हा आता एक मोठा उद्योग झालेला आहे. ज्या उद्योगाच्या माध्यमातून आपले खिसे भरण्यासाठी अनेक उच्चशिक्षित, विद्वान आणि बुध्दीमान लोकही रोज नवनवीन क्लुप्त्या लढवत असतात.
लग्नपत्रिका जुळविण्याच्या फंदात पडल्यामुळेच आज समाजात कित्येक तरूण- तरूणींना मनासारखा जोडीदार मिळत नाही. त्याच्या परिणाम स्वरूप ही समाजात अनैतिक संबंधाचे प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे सहाजिकच समाजात घटस्फोटाच प्रमाण ही त्या तुलनेत वाढणारच आहे. या विश्वात भूत भविष्य आणि वर्तमान जर आपल्या जागी स्थिर असतिल आणि त्यात कोणी ही बदल करू शकत नसेल तर हया लग्नपत्रिका वगैरे जुळवून भविष्य सुरक्षित करण्याचा निरर्थक अट्टहास का केला जातो तेच कळत नाही. आजकाल लग्नपत्रिका जुळविण्याचा उद्योग करणारे किती ज्योतिषी ज्योतिष शास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत हा संशोधनाचा विषय आहे. लग्नपत्रिकेतील गुण जुळल्यामुळेच जर लग्ने टिकली असती तर बत्तीस गुण जुळत असणार्या जोडप्यांचा घटस्फोट झाला नसाता त्यांच्यात कमालीचे वादविवाद झाले नसते. अट्टावीस गुण जुळ्लेल्या नवरा- बायकोला रोज एकमेकांच्या उरावर बसताना मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. माझा एक श्रीमंत मित्र लग्नपत्रिका जुळत नसल्यामुळे आई- वडिलांच्या दबावाला बळी पडून हवाई सुंदरीशी लग्न करण्याची चालत आलेली संधी ती लग्नाला तयार असताना ही गमावून बसला. आमच्या आई-बाबांच्या काळात ही कोणाची लग्ने लग्नपत्रिका वगैरे जुळवून झाली नव्हती तरी ती लग्ने टिकलीच ना ? माझ्या मतानूसार व्यक्तीशः प्रेमविवाह करणारे विवाह करण्यापूर्वी जेंव्हा लग्नपत्रिका जुळवून पाहतात तेंव्हा त्यांच्या सारखे गाढव तेच असतात. आजचे उच्चशिक्षित अगदी डॉक्टर , इंजिनिअर आणि शिक्षक ही जेंव्हा जग्न करण्यापूर्वी पत्रिका जुळते का हे पाहतात त्यामुळे या अशा गोष्टी करण्याला पाठबळ्च मिळते आणि मग समाजात या अशा गोष्टी अधिक जोमाने फोफावायला लागतात. लग्न टिकण्यासाठी फक्त पत्रिका जुळवून भागत नाही तर लग्न करणार्या दोघांची मने, विचार आणि आवडी- निवडी ही जुळाव्या लागतात. इतकेच नव्हे तर आजूबाजूची परिस्थिती ही अनुकूल असावी लागते. आपल्या समाजात लग्न जुळविताना पत्रिका जुळविण्याला विनाकारणच अवास्तव महत्व दिल जातय. त्याच्या फार आहरी न जाता सुजान पालकांनी आपल्या मुला – मुलींची मने, विचार आवडी – निवडी एखाद्या बरोबर जुळत असतील पण पत्रिका जुळत नसतील तर त्याचा फारसा विचार न करता त्यांची त्यांच्याशी लग्ने लावून द्यायला हवीत. शेवटी सौ बात की एक बात लक्षात ठेवायची ‘ होनी को कोई नही टाल सकता’ मग सारच सोप्प होईल नाही का ?
— निलेश बामणे
Leave a Reply