नवीन लेखन...

लग्न आणि विघ्न गूढ

(आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या.)

सनईच्या मंगल स्वरात आमंत्रितांच स्वागत करण्यासाठी नटून थटून हळद कुकवांचे करंडे घेवून सुवासिनी सोबत अक्षता देत होत्या. प्रत्येकाच्या नटण्याची वेगळीच पध्दत, मनमोहक साड्या, बांगड्या, केशरचना, बाजूबंद, गजरे आणि घमघमणारा अत्तराचा सुवास. या सर्वांच निरीक्षण करतच मी कधी मंडपात पोहोचलो समजलेच नाही. पाहिलं तर मंडपातील सर्व खूर्च्या भलेल्या, मी अवघडून गेले. कोणी ओळखीचं दिसतं का ते शोधू लागले आणि मला माझी मैत्रिण सुनीता दिसली. मला जरा हायसं वाटलं. पण तिच्याजवळ जाऊन मला उभंच रहाव लागणार होतं. शेवटी मी मंडपात चौफेर नजर फिरवली. एका कोपर्‍यात चार पाच खूर्च्या एकावर एक ठेवलेल्या दिसल्या. परंतु त्याच्या अलीकडे सर्व पुरुष मंडळी बसलेली होती. शेवटी मी ख्युर्च्या घेण्यासाठी त्या दिशेने निघाले. तेवढ्यात स्वरुप आडवा आला. स्वरुपने मला नमस्कार केला, ताई केव्हा आलात आणि काय हवयं? त्यांच्या दिलखुलास हसण्यानं माझं टेन्शन हवेत विरुन गेले. स्वरुप तुझ्या ताईच्या लग्नासाठी आलेय. मग मला बसायला तेवढी खुर्ची आणून दे ना. स्वरुपने लगेच अहो ताई, एवढेच ना, असं म्हणत पटकन दोन खुर्च्या माझ्या पुढ्यात आणून दिल्या. माझ्या मुलाच्या गालावर हात फिरवत मुलांना हसून बोलून तो त्याच्या कामाला निघून गेला. त्याला लहान मुलांचा खूपच लळा होता. थोड्या वेळात देवाला जाऊन नवरदेव आला. घोड्यावर नवरदेव कसा दिसतो? हे पाहावे म्हणून आम्ही सर्वांनी माना वळवल्या तर काय? नवदेवाला त्याच्या मित्रांनी व स्वरुपनेही खाली ओढले. राेश म्हणजेच सुनीताचा होणारा नवा स्वतःच्या लग्नात दिलखुलास नाचला. स्वरुपचाही आनंद गगनात मावत नव्हता. शेवटी लगनघटिका जवळ आली म्हणून सर्वांनाच अक्षरशः ओढून लग्नमंडपात आणले.
सुनीताच देखणेपण थेट तिच्या आईवर होत. स्वरुप आपल्या बाबांसाखा स्मार्ट दिसत होता. त्याच्या बाबानंतर त्याच्या आईला गेले पंधरा वर्षे त्याला पाहिले की, त्याच्या बाबांची आठवण मनी दाटत असे. आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या. भटजींच्या सुरात मी एकदम विचारातून बाहेर आले. स्टेजवर नवरा-नवरीच्या मध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टका सुरु झाल्या.एक दोन आणि तिसर्‍या मंगलाष्टकेला मंजुळ, मधुर स्वर कानावर आले. काकू हो, काकूच मंगलाष्टका म्हणत होत्या. खरंच काकूचा आवाज खूप गोड वाटला. चक्क सासूबाईंनी माईक हातात घेतलेला पाहून राजेशही चमकला. पाच मंगलाष्टका झाल्या आणि दोघंही एकमेकांना सात जन्म साथ देण्यासाठी विवाहाच्या रेशमीबंधनात एकत्र आली. मग स्टेजवर लग्नातील महत्वाचे कार्यक्रम पार पडू लागले. व्हिडीओ शूटिंग, फोटो, छोटी बच्चे कंपनी आणि सर्वांचाच ओसंडून वाहणारा आनंद दुसरीकडे जेवणाच्या पंगती सुरु झाल्या. आहेराची घाई सुरु झाली. एकमेकांना काही तरी करण्याचा मोका शोधणार्‍या मंडळींनी स्टेजवर जाऊन प्रेझेंट देत – घेत फोटो काढून घेतले. जेवणाची दुसी पंगत सुरु झाली. राजेश आपल्या नववधू सुनीताबोबर वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढून घेण्यात दंग होता. काकू, स्वरुप व त्याचा मामा पंगतीला आग्रहाने वाढत होते. सर्व कसं उत्तम चाललं होतं.
“काका मी आलोच” काकांनी स्वरुपकडे पाहिले. इतका वेळ उत्साहाने रसरसलेला स्वरुप थोडासा उदास वाटला. काकांनी त्याला पाण्याचा ग्लास देत काय होतयं का? असं विचारल. पण काही नाही म्हणून स्वरुप पटकन मंडपाच्या शेजारील खोलीत गादीवर फॅनखाली जाऊन झोपला. तरी काकांना थोडी शंका आली. स्वरुपचे काका आपल्या वहिनींना म्हणजेच स्वरुपच्या आईला काही न बोलताच स्वरुपच्या मागे खोलीकडे निघाले. एवढ्यात काकांचा छोटा नातू त्यांच्याकडे धावत आला.
“बाबा, स्वरुपकाका झोपल्यावर त्याच्या तोंडातून काही तरी येतयं” काकांच्या पायाखालची जमीन हादली पाय लटपटू लागले. छातीत दुखतयं हे जाणवू लागलं. ते त्याही स्थितीत पळाले. त्यांच्या हालचालींवरुन बर्‍याच जणांच लक्ष त्यांच्याकडे गेलं. ते खोलीच्या दारात आले आणि पुढचं चित्र पाहून ते जवळ जवळ कोसळलेच. त्यांच्या पडण्याच्या आवाजाने मंडपातील आसपासचे सात-आठ जण पळत येऊन काकांनाच पाहू लागले. परंतु जेव्हा काकांनी आत स्वरुपकडे हात केला तेव्हा स्वरुपची स्थिती पाहून सर्वांना धक्का बसला. त्याच्या चुलत भावांनी त्याच्या जवळ जाऊन तोंडाचा फेस पुसला व त्याला हलवले. त्यासरशी तो ताठ झाला आणि .. आणि दुसर्‍या क्षणी लग्नमंडपात हाहाकार उडाला. स्वरुपला त्याच्या भावांनी उचलून रिक्षात घालून दवाखाना गाठला. एवढ्या सगळ्या गोंधळात कोणीतरी स्टेजवर जाऊन सुनीता व तिच्या आईला ही बातमी सांगितली. स्वरुपला चक्कर आली असं तिच्या आईला सांगितल होत. ती माऊली अस्वस्थ झाली. तिला काय बोलावं काय करावं सुचेना. सुनीता तर सरळ स्टेजवरुन पळत लग्नमंडपात आली. राजेशनी सुनीता व स्वरुपला घेऊन एका गाडीवरुन दवाखाना गाठला. बाकीच्या सर्वांनी काय झाल असेल याची जोरदार चर्चा सुरु केली. लग्न सोहळ्याच्या सार्‍या आनंदावर विरजण पडले.
इकडे दवाखान्यात त्याला दाखल करुन घेतले. ऑक्सिजन लावला. डॉक्टरांना काही कळेना? नक्की काय झालयं. कशाचा त्रास झाला. स्वरुपचे चुलत भाऊ बाहेर अस्वस्थपणे डॉक्टरांची वाट पहात होते. दुपारचे ४ वाजले असतील. डॉक्टर बाहेर येऊन सर्वांना धीर देण्याचा प्रयत्न करु लागले. राजेशच्या डोक्यावर फेटा हातात हळदीचा दोरा, हळकुंड हातात सोन्याच्या आंगठ्या व हातावर मेंदी, नेलपॉलिश सर्व पाहून डॉक्टरांना अंदाज आला. तुम्ही जा. आम्ही प्रयत्न करतोय. स्वरुप लवकरच शुध्दीवर येईल. अस सांगून डॉक्टर काकांकडे बघत सर्वात मोठे कोण आहे? याचा अंदाज घेत होते. शेवटी राजेशला व त्याच्या मित्रांना कार्यालयाकडे पाठविण्यात आले. काकांना डॉक्टरांनी बोलावून घेत. आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या १५ मि. काय ते सांगतो म्हणून ते ऑपरेशन थिएटरकडे गेले.
मंडपात राजेश येताच सर्वांनी त्याच्याभोवती गराडा घातला. थोड्या वेळात स्वरुप शुध्दीवर येईल असं डॉक्टरांनी सांगितल्याच सांगून तो सासूबाईंकडे वळला. सर्वांना असं अघटीत घडल्याने उदास वाटू लागल. सर्वांनी सामानाची आवरा आवर केली. सामान व नववधू सह सर्वजण राजेशच्या घरी पोहचले. नववधूचे स्वागत किंवा इतर कार्यक्रम करावे अशी मनस्थिती कोणाचीच नव्हती. नववधू ही बावरली होती.
स्वरुपच्या आईने आपल्या मुलासाठी देवाकडे धावा करण्यास सुरुवात केली. तिचं मन दवाखान्यात होतं. तनाने ती सर्वांबरोबर घरात आली. पण तिला स्वरुप केव्हा एकदा घरी येतो असं झाल. तिने आपल्या बछड्याच्या खूशी करता देव पाण्यात ठेवले. नववधू सासरी गेली. पण अर्ध्या तासात तर लगेच राजेशला घेऊन ती परतलीही.
इकडे दवाखान्यात डॉक्टरांनी सर्वांना बोलावून शांतपणे स्वतःचा व देवाचा निर्णय सांगितला. ”आय अॅम सॉरी काकांनी तर डोक्यालाच हात लावला. स्वरुपचे चुलत भाऊ स्वरुपच्या नावाने ओरडू लागले. स्वरुप तू आम्हाला फसविलेस स्वरुपऽऽ स्वरुप म्हणून त्यांनी त्याच्या शरीराला हलविले. चेहर्‍यावर हात फिरवला. परंतु स्वरुप केव्हाच निघून गेला होता. त्याने लग्न मंडपातच प्राण सोडला होता तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून डॉक्टरांनी ऑक्सिजन लावला व बरेच प्रयत्न करुन पाहिले. पण …. जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला.
दवाखान्याचे सर्व सोपस्कार पूर्ण व्हायला दीड दोन तास लागले. इकडे घरीही वार्ता स्वरुपच्या मावस बहीणीच्या नवर्‍याच्या फोनवर सांगितले. त्यांना काही सुचेना. ही बातमी घरात कशी सांगायची? त्यांनी एकवार घरात सर्वांवरुन नजर फिरवली. स्वरुप दवाखान्यात आहे. घरातील प्रत्येकाच्या चेहर्‍यवार उदासी होती. पण तो व्यवस्थित घरी येईल अशी आशा ही त्याच चेहर्‍यावर होती. लग्न घर असल्यामुळे प्रत्येकाच्या अंगावर नवकोरी वस्त्र, प्रत्येकाच्या हातात बांगड्या, नेलपॉलिश, प्रत्येकजण सोन्यानी नटलेला. लग्नामुळे दारात मंडप, घराला रंग, दाराला तोरण आणि रांगोळी. स्वरुपच्या भाऊजींना काही सुचेना शेवटी त्यांनी बाहेर पुरुष मंडळीत ही बातमी सांगितली. स्वरुपच्या आईला ही बातमी सांगण्याचे धाडस कोणाचेच होईना. त्यातील वयस्कर माणसांला तुम्ही ही बातमी स्वरुपच्या आईला सांगा ही जबाबदारी टाकली. पण काही केल्या कोणाचेही धाडस त्या माऊलीकडे जाण्याचे होईना. त्या माऊलीला तुझे लेकरु आता या पृथ्वीतलावर नसून ते स्वर्ग लोकी आहे हे सांगण्याचे धाडस होईना. परंतु हळूहळू ही बातमी लग्न घरातील बायकांमध्ये पसरली. एका वृध्द आजींने स्वरुपच्या आईच्या कानावर ही बातमी घातली. अन् आभाळच फाटलं.
स्वरुपच्या आईची स्थिती पाहणार्‍याचे काळीज फाटेल असा तिचा आक्रोश होता. तिला आता काय करावे काय म्हणावे काय झालयं? काय चाललयं? तेच कळेना. थोड्या वेळासाठी बाहेर जातानाही विचारणारा, बाहेर उशीर लागला तर फोन करणारा आईला बरं नसल्यावर सेवा करणारा स्वरुप. स्वरुपआहे तुम्ही सर्वजण खोट बोलताय? माझी अशी थट्टा करु नका. अहो मी माणूस आहे दगड नाही. २० वर्षांपूर्वी कोसळलेला डोंगर माझ्या लेकराकडे बघत सोसला. पण आज पुन्हा एकदा त्या देवाने माझी परिक्षा घेतली. स्वरुप तू मला न सांगता कसं काय गेलास? तू मला काहीच बोलला नाहीस. तुझा त्रास मला कसा जाणवला नाही. स्वरुप ऽऽ स्वरुप म्हणत त्याची आई धाडकन कोसळली.
स्वरुप धाकटा असल्यामुळे, शेंडफळ असल्यामुळे लाडका होता. सुनीता समंजस व मोठी त्यामुळे अबोल होती. मीतभाषीपणा तिला आवडे. स्वरुप शिक्षणासाठी आणि आता नोकरीसाठी परगावी. मात्र सुनीता पहिल्यापासून आईजवळ त्यामुळे आईला स्वरुपची व स्वरुपला आईची खूप समज. एक मुलगी सुध्दा आईची सेवा करणार नाही एवढी सेवा स्वरुप आईची करत. वडिल गेल्यानंतर आईला आपल्या संसार रथासाठी नोकरी करावी लागली. तिला कामावर जायला उशीर झाला तर स्वरुप घरातल्या कामात तिला मदत करी. तिला गाडीवर सोडी. महिन्याच्या महिन्याला डॉक्टरांकडून चेकअप करी. रात्री पाय दुखले तर पाय दाबीत असे. नुकताच वकिलीची पदवी घेऊन दुसर्‍या मोठ्या वकीलाच्या हाताखाली तो जात होता. आपल्या पगारातून त्याने पहिल्यांदा आपल्या आईला साडी घेतली. मग सुनीताला आणि स्वतःलाही कपडे घेतले. सोसायटीत स्वरुपचा स्वभाव सर्वांना आवडे. गोरापान स्मार्ट नेहमी हसतमुख असणारा स्वरुप सर्वांच्या उपयोगीपडे परोपकाराय परम धर्माय हा मंत्र त्याला आईने दिला होता. आईच्या मांडीवर डोके ठेऊन झोपायला त्याला आवडे. दिवसातून एकदा तरी तो मांडीवर निजे. आयुष्य कमी म्हणून सारे सद्गुण देवाने त्याला एकट्याला दिले कोण जाणे.
आज लग्नात तो नवरदेवासारखाच वाटत होता. त्याला कोणितरी चिडवेलेही काय स्वरुप तुझा बार केव्हा उडवायचा? त्यावर स्वरुप किंचित थोडा लाजला व आईकडे बघत लवकरच असं म्हणाला. आईला तो लग्न विषयी कधीच बोलला नव्हता. एकदा फक्त मी ही खुप चान मुलगी तुझी सून म्हणून आणणार तिने तुझी सेवा केली पाहिजे. आयुष्यभर तू कष्ट केलेस आता ती आली की तू स्वयंपाक घारातून रिटायर व्हायचं नुसत खूर्चीवर बसून ऑर्डर सोडायची आणि बरच काही बोलला. पण तेही एकदाच सोसायटीत सर्वांच्या मदतीला धावणारा स्वरुप आज हरवला. सर्वांच्या परस्पर. कुणालाही न सांगता निसटला.
स्वरुपची आई शुध्दीवर आली तेव्हा स्वरुपला तिच्या समोर झोपवण्यात आले होते. तिला असं वाटले आपला जीव काढून स्वरुपमध्ये घालावा. तिचा आर्त टाहो ऐकून त्यांच्या घराच्या भिती घरातील प्रत्येक वस्तू व्यक्ति हळहळली रडली. आईने स्वरुपशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित व्याक्तिंना देव किती निष्ठूर आहे असे वाटू लागले. हरणासारखी अवस्था त्या माऊलीची झाली. कि पुन्हा पुन्हा स्वरुपच्या तोंडावरुन हात फिरवत होती. केसातून बोटे फिरवीत होती. छातीवर डोके ठेवत होती. वेडी माया, वेडी आर्त हाक त्या पिलाला उठविण्याचा प्रयत्न करत होती. लहानपणापासूण आजपर्यंत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची उजळणी त्या मातेच्या डोळ्यांनी व तोडांने केली.
“माझ्या मांडीवर ये मी तुला शांत निजविते, मला तू का फसविलेस? स्वरुप तू जिंकलास आणि फसवून निघून गेलास” त्या मातेचा आर्त टाहो प्रत्येकाचे मन हेलावून सोडत होता. सुनीता व राजेशची स्थितीही तशीच होती. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत सोबत राहणारा तिचा भाऊ काही न बोलता निघून गेला होता. दगडालाही पाझर फुटेल अशी स्थिती देवाने निर्माण केली होती. एकाच दिवशी घरात लग्न आणि विघ्न घडले. सुख कितीतरी वर्षांनी डोकावले. परंतु दुःखाने त्याला हुसकावून लावले. सुनीता आईला आदार देण्याचा प्रयत्न करीत होती. पण खरे तर ती पूर्णपणे दुःखात कोसळली होती.
शेवटी स्वरुपला घराबाहेर आणून बाकीचे विधी उरकण्यात आले. एकाच घरात दोघांची लग्ने वेगवेगळ्या वेळी लागली एकाचे नवरदेवाबरोबर तर एकाचे नियती बरोबर क्रूर चेष्टा करण्याची ही वेळ देवाने अचूक साधली होती का? एखाद्याला खंबीर घट्ट बनविण्याचा हा मार्ग होता का? स्वरुपची आई कोणत्याही परिस्थितीत स्वरुपला सोडायला तयार नव्हती. पण शेवटी ती वेळ आली. माय माऊली आपल्या डोळ्यांनी ते रुपडे पाहिल. व ती बेशुध्द पडली. सर्वजण स्वरुपला घेऊन पुढील क्रियाकर्मासाठी घेऊन गेले. जेव्हा स्वरुपची आई जागी झाली तेव्हा आपली मांडी पाहू लागली आज पुन्हा तिचा आक्रोश पाहून सर्वांची मनेच काय पण नयनही रडले.
स्वरुप मात्र सुनीतावर जबाबदारी सोपवून गेला. तो तिला सुनीतादादा म्हणायचा. तू दादा असतीस तर मला प्रत्येक खेळ खेळण्यासाठी जोडीदार मिळाला असता. असं म्हणायचा. पण जीवनाच्या डावात मोठी जबाबदारी टाकून सुनीताला फसवून मोठी बाजी मारुन न सांगता तो निघून गेला न सांगता गेला दूर प्रवासाला कधी ही न परतण्यासाठी.
आशा पाटील, सोलापूर.
(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

— आशा पाटील, सोलापूर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..