साधारणतः लठ्ठपणा व गोड यांचा छत्तिसाचा आकडा असतो, मात्र याला अपवाद असतो मधाचा. मध गोड असला तरी कफ-मेदावर अप्रतिम काम करतो.
सकाळी उठल्यावर पाण्यासह मध घेतल्याने (साधारणतः कपभर पाण्यात एक चमचा मध) लठ्ठपणा कमी होतो.
फक्त मध शुद्ध, कोणतीही भेसळ नसलेला व मधमाशांनी तयार केलेला असण्याची खात्री असायला हवी.
खडीसाखर सुद्धा लठ्ठपणामध्ये खाता येते. गोड मिठाया बंद केल्या तरी थोड्या प्रमाणात दुधाबरोबर आहारात खडीसाखर घेण्याने कफ-मेद वाढत नाहीत.
वजन वाढले की भात खाणे सहसा बंद केले जाते. मात्र देशी वाणाचे, साठेसाळी, रक्तसाळी, जिरगा, काळी गजरी वगैरे तांदूळ पचायला सोपे असतात, त्यातही जर शिजविण्यापूर्वी ते थोड्या तुपावर परतून घेतले व कुकरऐवजी भांड्यामध्ये शिजवले, तर ते कफ-मेद वाढवत नाहीत.
रोज सकाळी तांदळाचा मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्ती कृश होते.
“उकळलेले गरम पाणी‘ हासुद्धा वजन कमी करण्यासाठी सोपा; पण प्रभावी उपाय होय. एकंदर आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी जे पाणी उकळून घ्यायचे ते साधारणतः 15-20 मिनिटांसाठी उकळणे अपेक्षित असते. आयुर्वेदातील शारंगधर संहितेत उष्णोदक म्हणजे पाणी उकळण्याची विशेष पद्धत दिलेली आहे.
अष्टमेनांशशेषेण चतुर्थेनार्धकेन वा ।
अथवा क्वथनेनैव सिद्धमुष्णोदकं वदेत् ।।
श्लेष्मामवातमेदोघ्नं बस्तिशोधनदीपनम् ।
कासश्वासज्वरहरं पीतमुष्मोदकं निशि ।।…शांरगधरसंहिता
अगोदर गाळून घेतलेले स्वच्छ पाणी पातेल्यात ठेवून अष्टमांश, चतुर्थांश किंवा अर्धे शिल्लक राहीपर्यंत अग्नीवर उकळावे व गरम असतानाच प्यायला द्यावे. हा पाण्याचा काढा वात व कफदोष शमवतो, अवाजवी वाढलेला मेद कमी करतो, लघवी साफ होण्यास मदत करतो, अग्निदीपन करतो, खोकला, दमा व तापामध्ये हितकारक असतो. ताप आलेला असताना तसेच जुलाब होत असतानाही या प्रकारचे पाणी पिण्याचा औषधाप्रमाणे उपयोग होतो.
लठ्ठपणामध्ये मिठावर सुद्धा निर्बंध येतात. अति प्रमाणात मीठ कोणासाठीच चांगले नाही, पण अजिबात मीठ बंद करून वरून मीठ घेणे किंवा कच्चे मीठ खाणे टाळणे चांगले. मात्र अन्न शिजवताना चवीपुरते सैंधव वापरण्यास हरकत नाही. याखेरीज आयुर्वेदिक अन्नयोग संकल्पनेवर आधारित पुढील काही नियम लठ्ठपणा कमी करण्यासाठी लक्षात घ्यावे लागतील.
अध्यशन न करणे – एकदा खाल्ले की ते अन्न पचण्यापूर्वी पुन्हा काहीही न खाणे. दोन खाण्यांमध्ये किमान 3-4 तासांचे अंतर असणे अपेक्षित होय.अहिताशन न करणे – स्वतःच्या प्रकृतीला अहितकर ते अहिताशन होय. स्थूल व्यक्तींनी प्रकृतीचे व कफ-मेदाचे भान ठेवून सुरवातीला सुचविलेल्या पथ्यकर गोष्टी सेवन करणेच आवश्यक.मात्रानिश्चिती – प्रत्येकाने अन्नाची मात्रा अग्नीच्या पचनसामर्थ्याच्या सापेक्षतेने ठरवायची असते.त्यामुळे लठ्ठपणातही पथ्यकर आहार, फार कमी नाही व फार जास्ती नाही अशा योग्य प्रमाणात सेवन करणे श्रेयस्कर असते. त्यातही द्रवपदार्थांवर भर दिला उदा., सकाळी फक्त भाताची पेज, रात्री फक्त सूप तर वजन कमी होण्यास निश्चित हातभार लागतो.अनाठायी डायट करून उपासमार करून घेण्याऐवजी या प्रकारे आहाराचे नीट नियोजन, आचरण, व्यायाम, औषधोपचार यांची सुयोग्य जोड दिली तर लठ्ठपणाची भीती राहणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
Leave a Reply