ढण्यासाठी समोर माझ्या कौरव होते
मला मारले ज्यांनी ते तर पांडव होते
जगात आहे ख्याती माझी कठोर म्हणुनी
तुला पाहिले की मन माझे वैष्णव होते
तुम्ही पुराचा उगाच तेव्हा बाऊ केला
नदी वळाली तेथे तेथे साकव होते
कविता लिहिण्यासाठी नव्हती एकच जागा
स्मशान होते, कुठे फुलांचे मांडव होते
इतरांसाठी तो तर होता पडका वाडा
माझ्यासाठी तेथे माझे शैशव होते
मराठीत मी गझला लिहितो कौतुक नाही
माझ्या सुंदर भाषेचे ते सौष्ठव होते
सुरू राहिली घरात माझ्या खमंग ये जा
शेजार्यांचे जगणे केवळ बेचव होते
तुला भेटण्या धावत येतो सशाप्रमाणे
तुला भेटलो की पायांचे कासव होते
तिकडे तू अन् इकडे मी पण भेट जाहली
अपुल्यापाशी इंद्रधनूंचे साकव होते
अखेरचा हा श्वास टाकुनी प्रेम म्हणाले-
एकेकाळी पृथ्वीवरही मानव होते
दुनिया कळली असे मला का वाटत होते?
दुनिया कळली नाही मजला वास्तव होते
फुले उमलली, मी गुणगुणलो, चंद्र उगवला
जे काही होते ते गडे तुझ्यास्तव होते
परस्परांचे आम्ही झालो याचे कारण?
इकडे मार्दव होते ! तिकडे लाघव होते !
मला वाटले मीच एकटा दुःखी आहे
जेथे गेलो तेथे माझे बांधव होते
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply