११ सप्टेंबर १९११ रोजी तत्कालीन पंजाबातील (आता पाकिस्तानात) कपुरथळ्यात नानिक अमरनाथ भारद्वाज यांचा जन्म झाला. लाला अमरनाथ या नावाने ते सुपरिचित आहेत. ब्रिटिशअंमलमुक्त भारताचे पहिले कर्णधार ही त्यांची मैदानावरील ओळख वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच पण त्याहीपलीकडे भारतीय क्रिकेटमधील संस्थानिकांची मक्तेदारी मोडून काढणारे विभूतिमत्त्व म्हणूनही त्यांची सार्थ ओळख
आहे.
१५ डिसेंबर १९३३ रोजी प्रारंभ झालेल्या हिंदुस्थान-इंग्लंड संघांदरम्यान बॉम्बेतील जिमखाना मैदानावरील कसोटीद्वारे लालाजींनी कसोटीपदार्पण केले. हा हिंदुस्थानी भूमीवरील पहिलाच कसोटी सामना होता. पहिल्या डावात लालाजींनी ३८ धावा काढल्या. दुसर्या डावात मात्र त्यांनी केवळ ११७ मिनिटांच्या खेळीत शतक पूर्ण केले. एकूण १८५ मिनिटांच्या खेळीत २१ चौकारांसह त्यांनी ११८ धावा काढल्या.
ब्रिटिश वर्चस्वाखालील हिंदुस्थानातील एका ‘काळ्या’ खेळाडूने सभ्य गृहस्थांच्या खेळात त्यांच्याचविरुद्ध शतक काढावे ही ताज्जुब की बात होती. खेळ संपल्यानंतर लालाजींभोवती प्रेक्षकांचा गराडा पडला. त्यांच्या गळ्यात पुष्पहार मावेनासे झाले. अनेक महिलांनी आपल्या अंगावरील दागदागिने काढून लालाजींना भेट म्हणून दिले. राजे-महाराजांनीही लालाजींना बक्षिसी दिली. भारतातर्फे पहिल्यांदाच शतक काढणारे लालाजी हे खरोखरीचे हिरो ठरले. भारतीय राष्ट्रवाद जिवंत झाल्याचा हा ढळढळीत पुरावा होता. लालाजींना पुन्हा मात्र कसोट्यांमध्ये कधीही शतक काढता आले नाही.
१९३६ सालच्या इंग्लंड दौर्यात एक विचित्र घटना घडली. या दौर्यावरील भारतीय संघाचे कर्णधार होते विझियानगरम्चे महाराज कुमार. मायनर काउंटीजविरुद्धच्या एका सामन्यात लालाजी पॅड्स बांधून बराच वेळ बसून होते. कर्णधाराने मात्र त्यांना तसेच ताटकळत ठेवले. ऐरेगैरे आपल्याआधी फलंदाजीसाठी उतरत असल्याचे पाहून लालाजींचा पारा चढला आणि त्यांनी कर्णधार विझ्झींवर तोंडसुख घेतले. झाले ! शिस्तभंगाची कारवाई झाली आणि एकही कसोटी सामना न खेळता लालाजी मायदेश सुधारते झाले. लालाजींचे मिश्किल उत्तर होते : “पंजाबीतील शिव्याच जबर्दस्त आहेत त्याला मी काय करणार?”
पहिल्या
तीन कसोट्यांनंतर चौथ्या कसोटीसाठी त्यांना तब्बल १२ वर्षे वाट पहावी लागली. १९४६च्या इंग्लंड दौर्यात त्यांनी मंदगती गोलंदाजीत चमक दाखविली आणि दोन वेळा एका डावात ५-५ गडी बाद केले.
१९४७ साली ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार्या भारतीय संघाचे नेतृत्व लालाजींकडे आले. विजय मर्चंट यांनी माघार घेतल्याने कप्तानस्थान रिकामे झाले होते. पुढे भारत ब्रिटिशअंमलमुक्त झाल्यानंतरही ते कप्तानपदी कायम राहिले. १९४८-४९ नंतरच्या काळात मात्र लालाजींना क्रिकेटमधील घृणास्पद राजकारणाचा बळी व्हावे लागले. या काळात पैसा आणि इतरही गैरव्यवहारांबाबतच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अॅन्थनी डिमेलो नावाच्या एका ‘शक्तिमान’ सचिवाने ‘सततचे गैरवर्तन आणि शिस्तभंगाच्या नावाखाली’ लालाजींना पदच्युत केले. डिमेलोंचे समधर्मीय असलेल्या विजय हजारेंची कर्णधारपदी वर्णी लागली. ब्रिटिशांनी पाळलेल्या कुत्र्यांचा प्रयोग आता भूमिपुत्रच एकमेकांवर करणार होते.
त्यानंतर लालाजी लॅंकेशायर लीगकडून खेळू लागले. १९५१-५२ च्या हंगामात अखेर भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी-विजय साकार केला, त्या संघात खेळाडू म्हणून लालाजी होते. १९५२ मध्ये पाकिस्तानने दिल्लीत खेळून कसोटी-जगताचे मापटे ओलांडले तेव्हा लालाजीच कर्णधार होते – भारताचे ! हा सामना भारतीय संघाने जिंकला. नंतर त्यांच्या संघाने पहिला मालिकाविजयही साजरा केला. खेळाडू म्हणून मात्र ते फारसे चमकले नाहीत.
सर डॉन ब्रॅडमन त्यांच्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत एकदाच स्वयंचित झाले आहेत – गोलंदाज लाला अमरनाथ.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply