नवीन लेखन...

सुधीर गाडगीळ यांचा गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यावरील लेख

सुप्रसिद्ध निवेदक, लेखक सुधीर गाडगीळ यांची खासियत म्हणजे नवनव्या चवी शोधणं, मनापासून खाणं आणि खाण्यावर बोलणं. त्यांचं ‘मानाचं पान’ हे पुस्तक म्हणजे आपल्या आवडत्या सेलेब्रिटींबरोबर मांडलेली पंगतच जणू. कलयांकित व्यक्ती काय खातात, त्यांच्या खाण्याच्या आकडीनिकडी याबाबत आपल्याला उत्सुकता असतेच. सुधीर गाडगीळ यांनी या विषयाला धरून घेतलेल्या खुसखुशीत मुलाखती लेख स्करूपात या पुस्तकात आहेत. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यावरील या पुस्तकातील लेख काळी गोल टिकली. त्यावर भांगापर्यंत रेखाटलेली काळ्या कुंकवाची उभी रेघ. नाकात लकाकणारी चमकी. डार्क ब्ल्यू किंवा मरून रंगाची सिल्क साडी. काठ ठळकपणे उठून दिसणारे, हाती तंबोरा – मैफलीपूर्वीची डोळे मिटलेली ध्यानस्थ स्तब्धता.आकाशवाणी धारवाड’ केंद्रावरचा फोटो वाटावा अशी आरती अंकलीकर – टिकेकरची प्रतिमा.रियाजाचं गांभीर्य सोडलं तर एरवी अवखळ, खटय़ाळ, खिदळणारी, जरा वरच्या स्वरात, अनुनासिक नादात खदखदणारी, चैतन्यदायी आरती.`अहो, तुमचं घर सापडायला फार वेळ लागला. ताडदेव डेपोपासून दोन चौक चालत यावं लागलं,’ असं फोटोग्राफरनं कुरकुरता क्षणीच `तुमचा वॉक चांगला झाला ना? गुड! तब्येतीला उत्तम!’ असा सट्टदिशी चौकार मारणारी आरती.

भरपूर खादाडणं, भटकणं, चेष्टामस्करी करणं आवडतं. मी सोशल प्राणी आहे, असं म्हणता म्हणता हळूच जीभ चावत, खालच्या पट्टीत म्हणून सोसलं तेवढंच गाते, असा `पी.जे.’ मारत कन्येची, स्वानंदीची टाळीही घेते. `माझ्या माहेरी लहानपणी घरात भाज्या कमी असायच्या. कर्नाटकाचा तो दुष्काळीच भाग. तीळ, कारळं, दाण्याच्या सुक्या चटण्या आणि पोळी. खूप आग्रह खाण्याचा. कुठलाही रोग झाला तरी `खाणं’ हेच औषध मानत. माझे काका तापातही शिस्तीत जेवायचे. एक ताप असला तरी `काही तरी खा’ असंच म्हणत. `आई अस्सल कानडी. बॉर्डरवरची असली तरी माझं बालपण मुख्यत्वे माटुंग्यातलं. आसपास सगळी अंबा भुवन, आनंद भुवन, नायक, मद्रास कॅफे ही किंग्ज सर्कलची टिपिकल उडपी हॉटेल. तिथे महिन्यातून एकदा इडली, डोसा खायचा म्हणजे ग्रेट ट्रीट. हॉटेल संस्कृती एवढी बोकाळली नव्हती; पण खाण्यात रस असायचा. वडील कुणाकुणाच्या गाण्याच्या मैफलींना घेऊन जायचे, तेदेखील `बटाटे वडा देईन’ हे आमीष दाखवून!’ `खवय्या सो गवय्या’ हे माझं आवडीचं तत्त्व. जो चांगला खातो, पितो तो गवई. त्यामुळे मी कुठलेही पथ्यपाणी करत नाही. पाण्यानं पोट बिघडतं, वगैरे मनाचे खेळ. कैरीचं लोणचं चाखताना, खोकला येणार असं मनात आलं तर खोकला येणारच; नाही तर काही होत नाही. खाणाऱ्यानं, गाणाऱ्यानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं!

`आरती, तुझं हे सकाळी हल्ली पेपरात प्रवचन येतं तसं चाललंय. तो तुझा स्वभाव नाही. थेट काय मन:पूर्वक खायला आवडलं ते सांग.’ `पालकाची मीठ पेरून भाजी, घट्ट साईचं दही, मेथीचं वरणं, त्यावर लाल सुक्या मिरच्यांची फोडणी आणि पुरणाचे कडबू प्रचंड आवडतात. मात्र खाताना गणित कच्चं पाहिजे, तरचं भरपेट जेवलं जातं. मुळात आम्हा धारवाडकडच्या लोकांना कुठल्याही प्रकारचे पोहे कधीही खायला आवडतात. झोप येत नसली तरी खा पोहे! हसू नका, खरंच सांगतेय! कार्यक्रमापूर्वी दोन दिवस मात्र पचायला हलकं खाणं पसंत करते. चहा रोज मी स्वत: करूनच पिते. ब्रेकफास्टला गरम पोळी भाजी. मग तासाभरानं दूध. जेवण संपूर्ण शाकाहारीच आवडतं, चाळीशीपर्यंत तिखट जास्त आवडायचं. वाचन, फिरणं वाढलं. जेवणातल्या व्हॅल्यूज कळल्या आणि मसालेदारपणा कमी केला. मात्र मिळमिळीत चालतच नाही. विशेषत: दुधीभोपळ्याची भाजी तर शक्यच नाही.’

उदय (टिकेकर) पक्का मांसाहारी. त्याला चिकन -फिश आवडतं. मी खात नसले तरी करते. कॉन्टिनेंटल ते भाकरी सगळंच करायला आवडतं. स्वानंदीच्या डिमांडस् पहिल्या पुरवते. जराशी तिखट, सर्व प्रकारची सँडविचेस, माझ्या हातचा डोसा सर्वांना आवडतो. पीठ कालवून तापत्या तव्यावर विशिष्ट लयीत, विशिष्ट प्रेशरनं फिरवणं ही कला आहे. डोशाखेरीज टम्म फुगलेली, एकही डाग नसलेली कागदासारखी भाकरी मी उत्तम बनू शकते. अर्थात, स्वयंपाक करायची वेळ कमी येते’.

एक तर माझ्या सासूबाई (सुमती टिकेकर) उत्तम स्वयंपाक करतात. त्या शेवयाची खीर, फ्रूट सॅलड, साजूक तुपातला शिरा, बासुंदी अप्रतिम बनवतात आणि उदयचं शूटिंगमुळे शेडय़ुल अनिश्चित असतं. तो रात्री उशिरा आल्यावर स्वयंपाकाचा सरंजाम मांडण्यापेक्षा आम्ही हॉटेलात जाणं पसंत करतो. चर्चगेटचं `पिझेरिया’, गिरगावातलं `ग्रीन हाऊस’, नाना चौकातला `श्रीकृष्ण’ उडपी किंवा आमच्या शास्त्री हॉलजवळचं `स्वाती स्नॅक्स!’

`स्वाती’मध्ये एकतर अतिशय स्वच्छता असते. शुद्ध पाण्याचा वापर असतो. `पानगी फदुरा खिचडी’ केळीच्या पानावर आली की मी फस्तच करते. फलाफल इथं मिळतं. सीताफळ शेक इथे उत्तम असतो. तुमच्या पुण्यात आले की माझ्या सर्व शिष्या आमच्या घरी जमतात. तिथे आठ तास रियाज, उरलेल्या वेळात पीठ पेरलेल्या पालेभाज्या आणि पोळ्या आम्हीच सगळ्याजणी करतो नि खातो. पुण्यात वाडेश्वरचा `डोसा’ आणि वैशालीची इडली आणि खूप चटणी.
`दौऱ्यात ठळकपणे लक्षात राहिलेली चव?’

`कोलकात्यातले टपरीवरचे रसगुल्ले, इंदौरचा सराफा, अमेरिकेत मॅकडोनॉल्डचं सॅलड, अमृतसरची गरमागरम तंदुर रोटी आणि काळी डाळ, ओ। हो।हो। सुभान अल्ला! जिथे जाते तिथून ताज्या भाज्या आणायला मला आवडतं. गाजर, मुळा, मटार, फ्लॉवर, कोबी घरी स्वयंपाक करताना त्या ताज्या भाज्यांच्या गंधात मूड लागतो. डोक्यात रुंजी घालत असलेला `राग’ गुणगुणणं सुरू होतं. जीवन पुरी किंवा अहीर भैरव गुणगुणायला लागले की, माझा उत्तम मूड जमल्याचं माझं मला जाणवतं.

लेखक – सुधीर गाडगीळ
संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..